स्थळ- शिवाजी पार्कचे मैदान.. अखिल भारतीय कंपाऊंडर सेनेच्या वतीने संजय राऊत याच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे. काही दिवसापूर्वीच स्थापन झालेल्या व देशभरात लाखोंनी सदस्य नोंदणी झालेल्या या संघटनेच्या कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीने मैदान फुलले आहे. अधून मधून कंपाऊंडर जिंदाबाद, राऊतसाहेब आगे बढोच्या घोषणा घुमताहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील डॉक्टर आपली रुग्णसेवा बंद करून बघत आहेत. राऊतांच्या चेहऱ्यावर विजयी भाव. समाजातील आणखी एक उपेक्षित घटक पक्षाशी जोडला जाण्यास आपण निमित्त ठरलो या भावनेने ते कमालीचे सुखावलेले आहेत. सकाळीच साहेबांनी केलेला अभिनंदनाचा दूरध्वनी त्यांना वारंवार आठवतो आहे. हा विषय उकरून काढल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे आपली चूक तर झाली नाही ना, अशी शंका आता त्यांच्या मनातून पार हद्दपार झाली आहे. शेवटी संघटना विस्तार महत्त्वाचा, डॉक्टरांचे नंतर बघून घेऊ असे विचार त्यांच्या डोक्यात घोळत आहेत. तेवढय़ातच संघटनेचे अध्यक्ष बोलू लागतात. ‘‘रुग्णालयात डॉक्टरच तज्ज्ञ असतात, बाकी सारे पढतमूर्ख या समजुतीला छेद दिल्याबद्दल मी राऊतसाहेबांचे जाहीर अभिनंदन करतो. (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट) साहेबांनी वास्तव समोर आणले. सत्तास्थापनेच्या काळात आजारी असताना त्यांना रुग्णालयात हाच अनुभव आला. अनुभवाने माणसे मोठी होतात पण साऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आम्ही लहानच राहिलो. आजही दाखल झालेल्या रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यावर कोणते औषध द्यायचे हे लगेच आमच्या ओठावर येते. आजवर डॉक्टरांचा आदर ठेवत चूप बसलो. आता साहेबांमुळे आम्हाला हिंमत मिळाली. दहा, वीस वर्षे रुग्णालयात नोकरी केल्यावर आमचे अनेक बांधव खेडोपाडी दवाखाना थाटून रुग्णसेवा करतात. त्यामुळेच ग्रामीण भाग सुदृढ राहिला आहे. हे सत्य जनतेसमोर आणण्याचे काम साहेबांच्या एका विधानाने केले. आता खऱ्या अर्थाने रामराज्य स्थापन झाले आहे. रामाच्या राज्यात कुणावर अन्याय होत असेल तर हनुमान त्याला वाचा फोडायचा. आमच्या बाबतीत साहेबांनी हनुमानाचीच भूमिका बजावली आहे. (प्रचंड टाळ्या). आम्ही डॉक्टरांच्या विरोधात नाही. त्यांच्या ज्ञानाचा आम्ही आदरच करतो पण आम्हाला काहीच येत नाही या मताशी आम्ही सहमत नाही. संघटनेची स्थापना केल्यावर हजारो रुग्णांनी फोन करून आम्हाला पाठिंबा दिला. यावरून आमच्या रुग्णनिष्ठेची साऱ्यांना कल्पना येईल. आजवर विस्कळीत असलेला आमचा वर्ग साहेबांच्या एका वक्तव्याने एकत्र आला. या एकजुटीसाठी व आमचे प्रश्न सोडवाल या अपेक्षेसह आम्ही साहेबांचा सत्कार करीत आहोत.’’ भाषण संपताच राऊतांचा शाल, श्रीफळ, पांढरा अॅप्रन व एक स्टेथॅस्कोप देऊन सत्कार झाल्यावर, भारावलेल्या साहेबांचा कंठ दाटून येतो. चष्म्याची फ्रेम सावरत ते म्हणतात. ‘‘खरे तर मी मस्करीत हे विधान केले होते पण त्याचा इतका मोठा लाभ पक्षाच्या पदरात पडेल याची कल्पना नव्हती. मी हनुमान असेन तर राम कोण हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तेव्हा या रामराज्यात तुमच्यावर अन्याय होणार नाही असे वचन मी देतो.’’ कार्यक्रम संपताच गर्दी पांगू लागते. सभास्थानी उरलेले पदाधिकारी ‘मस्करी’ या शब्दाने बुचकाळ्यात पडलेले दिसतात. शेवटी अध्यक्ष म्हणतात. ‘यंदा आपण मस्कऱ्या गणपती बसवायचा’.. मग साऱ्यांचे चेहरे उजळतात.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2020 रोजी प्रकाशित
‘मस्कऱ्या’..
स्थळ- शिवाजी पार्कचे मैदान.. अखिल भारतीय कंपाऊंडर सेनेच्या वतीने संजय राऊत याच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-08-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article on sanjay raut abn