सकाळी नऊपासूनच महामहीम राजभवनातल्या वऱ्हांडय़ात फेऱ्या मारत होते. वेळ जात होता तसतशी त्यांची अस्वस्थता वाढत होती. आज काहीही करून गेल्या वर्षभरापासून छळणाऱ्या ‘त्या’ विचारांपासून मुक्तीसाठी उपाय मिळवायचाच असा विचार करताच त्यांच्या हाताच्या मुठी आपसूकच घट्ट आवळल्या. त्यामुळे धेतराचा सोगा जरा जास्तच चुरगळला, पण त्याचेही भान त्यांना राहिले नाही. ज्यांचा सल्ला आपण आयुष्यभर प्रमाण मानला ते ऋषीकेशचे महाराज येताच त्यांना सर्व काही सांगून उपाय जाणून घ्यायचा असे मनाशी ठरवत असतानाच गाडीचा हॉर्न वाजला. महाराज उतरून त्यांच्याकडेच येत होते. साष्टांग दंडवत झाल्यावर दहाच्या ठोक्याला त्यांच्यात बैठक सुरू झाली. ‘‘ती बारा नावांची फाइल गेल्या वर्षभरापासून मला छळतेय. त्यावर विचार करायचा नाही हे वरिष्ठांनी सांगूनसुद्धा त्याचाच विचार सतत माझ्या मनात फिरत राहतो. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही. चिडचिड वाढलीय. काही तरी उपाय सांगा.’’ महामहीम थांबताच डोळे बंद करत महाराजांनी एक दीर्घ श्वास घेतला व काही क्षण गेल्यावर ते त्यांच्यावर डोळे रोखत बोलू लागले. ‘‘आता काळजी करू नका. त्या ‘अनिष्ट’ विचारांपासून मुक्ती मिळवून देण्याची जबाबदारी माझी. फक्त मी जे काही आता सांगेन, त्याचे ‘निष्ठापूर्वक’ पालन तुमच्याकडून व्हायला हवे.’’ महामहिमांनी त्वरेने हो म्हणताच महाराजांनी उपाय सांगायला सुरुवात केली. ‘‘समस्या फाइलमध्ये नाही तर बारा या आकडय़ात दडलेली आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही बारा ग्रहांचे खडे असलेली अंगठी घालायची नाही. बारा राशींचा समावेश असलेले पेपरमधले राशिभविष्य वाचायचे नाही. महिन्यातून एकदा बारा ग्रहांची शांतिपूजा भवनात दरमहा एकदा याप्रमाणे अकराच महिने करायची. भवनात गजरवाले घडय़ाळ असेल तर त्यात १२ चे ठोके पडणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना द्यावी. अभ्यागतांना भेटीसाठी बाराची वेळ देऊ नये. सार्वजनिक ठिकाणी भाषण देताना बाराखडी, बारमाही नद्या असे उल्लेख टाळावेत. उत्स्फूर्तपणे बोलताना ‘याचे बारा वाजले’, ‘गेला बाराच्या भावात’, ‘बारा गावचे पाणी प्यालेला’ अशा म्हणींचा उच्चार होणार नाही याची काळजी घ्यावी. बारा तारखेला कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत. या दिवशी भवनातल्या मोरांसोबत वेळ घालवावा. भवनात सर्वत्र लागलेल्या दिनदर्शिकांवर असलेल्या बारा तारखेवर पांढरा कागद चिकटवावा. भोज आयोजित करताना त्यात नेमके बाराच पाहुणे असणार नाहीत याची खबरदारी कायम घेत राहावी. जेवणाच्या टेबलवर नेमकी बाराच भांडी राहणार नाहीत याची सूचना सहायकाला देऊन ठेवावी. या प्रकरणात न्यायालयाने तुम्हाला दिलासा दिला असला तरी वरिष्ठांच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने कधी मनात विचार आला तरी ‘बाररूम’ हा शब्द डोक्यात घोळणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. जुन्या लोकांना कामे आठवावी म्हणून धोतराला बारा गाठी बांधून ठेवायची सवय असते तशी तुम्हाला असेल तर तात्काळ त्याचा त्याग करावा. एकूणच बारासदृश शब्द व गोष्टींपासून दूर राहिले की तुम्हाला हा विचारच सुचणार नाही.’’ महाराजांचे उपाय ऐकून कृतकृत्य झालेल्या महामहिमांनी त्यांना नमन केले. मग महाराज उठले. ‘‘चला बारा वाजले, माझी तपश्चर्येची वेळ झाली. मी निघतो.’’ त्यातला बारा हा शब्द ऐकून महामहीम चमकले. तेवढय़ात साहाय्यक आत आला व भेटीसाठी शिष्टमंडळ आल्याचे सांगितले. ‘कितने लोग है’ असे महामहिमांनी विचारताच तो ‘बारा’ असे म्हणताच ते चिडून ‘‘बादमें बुलाओ उनको’’ असे म्हणत थेट शयनकक्षात निघून गेले.