गेल्या दोन-तीन दिवसांपासून विमनस्क अवस्थेत वावरणाऱ्या प्रसादभाऊंनी सकाळी सकाळी तिरीमिरीतच शयनकक्षाचे दार घट्ट बंद करून घेतले व थेट मोठय़ा आरशासमोर जाऊन उभे राहिले. क्षणभर स्वत:ला न्याहाळल्यावर त्यांनी दोन्ही हातांनी स्वत:च्या गालावर थापडा मारायला सुरुवात केली. थोडे थकल्यावर मग ते उद्वेगाने स्वत:शीच बोलू लागले :

‘करशील, पुन्हा अशी चूक करशील? काय गरज होती भवनाच्या तोडफोडीची भाषा वापरायची? आपली संस्कृती काय, त्यांची संस्कृती काय, याचा जरा तरी विचार करायला हवा होता? आता तू अभ्यासूंच्या पक्षात आहेस, शाळा सोडून राडेबाजी करणाऱ्यांच्या नाही हेही लक्षात नाही आले तुझ्या! तुझ्यामुळे त्या नागपूरच्या भाऊंना बॅकफूटवर यावे लागले. तोडफोडीची संस्कृती आमची नाही असे सांगावे लागले. वारंवार चुका करायला हा काही घडय़ाळवाल्यांचा पक्ष नाही. इथे सर्वावर लक्ष असते. कोण काय करतो, काय बोलतो याची इत्थंभूत माहिती गोळा होत असते मुख्यालयात. ते बाहेरच्यांवरच नाही तर घरच्यांवरही पाळत ठेवतात हा साधा विचारही आला नाही तुझ्या मनात? कसा रे तू?’

असे म्हणत भाऊंनी पुन्हा दोन थपडा स्वत:ला मारून घेतल्या. दरवाजाच्या फटीतून कुणी बघत तर नाही ना याची खात्री करून पुन्हा त्यांचा स्वसंवाद सुरू झाला. ‘शेवटी बोललेच ना त्यांचे पक्षप्रमुख झापडा खाव्या लागतील म्हणून! तूच सांग काय इज्जत राहिली तुझी? अरे ती रस्त्यावरची माणसे. घ्या अंगावर म्हटले की सारेच त्वेषाने तुटून पडतात. तू सध्या जिथे आहे त्यांच्यात आहे का अशा लढाया लढण्याचा दम? बघितले ना त्या दिवशी भवनासमोर. कशी पळता भुई थोडी केली होती त्यांनी सर्वाची. अशा लाजिरवाण्या माघारीचा ‘अभ्यास’ करायचे सोडून पुन्हा तीच आव्हानाची भाषा? नाही शोभत रे तुला! अशा राडेबाजांना चाणक्य नीतीने उत्तर द्यायचे असते. इतके दिवस पक्षात राहूनही तुला हे सुचत नाही. कमालच आहे तुझी! बघितले ना त्या संपादकाने कशी एका वाक्यात टर उडवलेली तुझी. अरे, तू काहीही झाले तरी नेता आहेस. शाखाप्रमुख नाही. असले छप्पन्न प्रमुख तुझ्यामागे असायला हवेत. मग जरा नेत्यासारखा वाग ना! त्यांच्याजवळ किमान वादग्रस्त वास्तू पाडण्याचा तरी अनुभव आहे. तुझ्याकडे आहे का तो? नाही ना! तुझ्या पक्षाकडे अनुभव असला तरी ते कबुली द्यायला घाबरतात. मग तूच कशाला उगीच तोडण्याचे काम अंगावर घेतो? अरे, ज्या घरात राहायचे आहे त्यांच्या कलाने वागायचे असते हे साधे तत्त्व कळत नाही का तुला? वक्तव्ये अशी करायची की समोरचे चिडले पाहिजेत. त्यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर झाला पाहिजे. मग आपण सभ्यतेचा आव आणत निशाणा साधायचा. तूच बघ, पक्षातले इतर नेते कसे चतुराईने वागतात ते. अरे शीक काही त्यांच्याकडून. नुसता पैसा काही कामाचा नाही. जोडीला बुद्धिचातुर्य लागते तरच यश मिळते. जिथे राहायचे आहे तिथला वाण नाही तर गुण घेतला पाहिजे. आता यापुढे नेत्याला तोंडघशी पाडणार नाही अशी शपथच घे तू.’

तेवढय़ात बाहेरून कुणी तरी दार ठोठावत असल्याचा आवाज त्यांना आला. दारात पत्नी. आत  येऊन पतीकडे बघितल्यावर आश्चर्याने त्या म्हणाल्या,

‘अहो, तुमचे गाल का सुजलेत एवढे? दोन दिवसांपासून तर कुठे गेलाही नाहीत तुम्ही. थांबा मी बर्फ आणते चोळायला.’