नितीनभाऊ गडकरी म्हणजे एकदम रसिक आणि बिनधास्त माणूस. त्यांचं जेवढं खाण्यावर प्रेम, तेवढंच गाण्यावरही. आवाजही बऱ्यापैकी. कदाचित संघशाखेवर ‘संघावाचुन कोण स्विकारिल काळाचे आव्हान..’ आणि ‘विकास मे विवेक, स्वप्न एक राष्ट्र का..’  म्हणता म्हणता आवाज तय्यार झाला असेल आणि गाण्याविषयी आवडही निर्माण झाली असेल. अशा या नितीनभाऊंना ‘नया दौर’मधील ‘साथी हाथ बढाना..’ हे गाणं इतकं प्रिय असेल, असं वाटलं नव्हतं. राबणारे आणि घामात भिजलेले कष्टकरी हात गडकरी यांना इतके आवडत असतील याची कल्पना नव्हती. त्यांची ही आवड उघड झाली अगदी परवा परवा. दूर तिकडे विदेशात चालकरहित गाडीची कोण कौतुकं चालली आहेत. गाडी चालवण्यासाठी चालक नाहीच.. सगळं काम आपोआप होणार, अशी त्या गाडीतील योजना. विदेशी थोतांडं नुसती. ‘अशा गाडीला भारतातील रस्त्यांवर चाक ठेवू देणार नाही’, अशी भीष्मप्रतिज्ञाच जणू गडकरी यांनी केली. आता, एकचालकानुवर्ती कारभाराची गडकरी यांना सवय असल्यानं त्यांना चालकरहित गाडीही आवडणार नाही, असं वाटेल कुणाला; पण असल्या गाडय़ांना विरोध करण्याचं कारण निराळं आहे. या गाडय़ा भारतात आल्या तर आपल्याकडील चालकांच्या पोटावर पाय येईल. लक्षावधी चालकांच्या हातांतील चलतचक्र हिरावलं जाईल, ही गडकरी यांना वाटणारी काळजी रास्तच. यांत्रिकीकरणाच्या नावाखाली माणसं बेरोजगार होणं परवडणारं नाही आपल्याला, हे त्यांचं म्हणणं शतप्रतिशत बरोबर. खरं तर गडकरी यांच्या हातात जे रस्तेवाहतूक मंत्रालय आहे त्याद्वारे अधिकाधिक हातांना रोजगार देऊन आपलं म्हणणं अधिक अधोरेखित करण्याची नामी संधी गडकरी यांना आहे. त्यांच्या खात्यामार्फत देशात सध्या रोज २० ते २२ किमी रस्तेबांधणी करण्यात येते. या कामातून अनेकांना रोजगार मिळत असतोच, पण या कामावर असलेली यंत्रं वजा केली तर रोजगार मिळणाऱ्यांची संख्या किती तरी वाढू शकेल. रस्तानिर्मितीसाठी आवश्यक सामग्रीचं मिश्रण करणारं यंत्र, खडी-डांबराची चादर पसरवणारं यंत्र, रस्ते तयार झाल्यानंतर त्यावर पांढरे पट्टे मारणारं यंत्र या सगळ्यांची खरोखरच गरज आहे का, याचा विचार गडकरीभाऊंनी करायला हवा. ही सगळी कामं माणसांकडूनच करून घ्यावीत. सामग्रीचं मिश्रण माणसांकडून करून घ्यावं. खडी-डांबर पसरवण्याचं काम माणसांवरच सोपवावं. अर्धकच्च्या रस्त्यावरून फिरवल्या जाणाऱ्या रोलरचं काम माणसं कसं करणार, असा प्रश्न पडेल एखाद्याला. पण इच्छा तिथे मार्ग. शारीरिकदृष्टय़ा वजनदार आणि भरभक्कम अशा आठ-दहा असामी निवडून त्यांच्याकडे हे काम सोपवता येऊ शकेल. अशा असामींना वाटल्यास विशेष वजन-भत्ता अदा करावा. या उपायांनी देशातील किती तरी जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागेल आणि अच्छे दिन आल्यामुळे ती मंडळी गडकरीभाऊंना दुवा देतील. आयुष्यात तेच तर महत्त्वाचं आहे सगळ्यापेक्षा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on nitin gadkari
First published on: 26-07-2017 at 03:50 IST