लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यात आम्हांस मायेने गालगुच्चा घेणारी, प्रसंगी पाठीवर थापटपोळी देणारी आज्जीच दिसते. संस्कारी आज्जी. कशा दटावत असतात ना त्या लोकसभेत.. त्या गडबड-गोंधळ करणाऱ्या खासदारांना कधी कधी रागावतातही, परंतु तो राग असतो मायेपोटीचा. परवा या लोकशाहीवरच्या मायेतूनच त्यांनी पत्रकारांनाही चार सुसंस्कारी गोष्टी सुनावल्या. या पत्रकारांनाही कोणी जरा वाजवलेच पाहिजे. हातात पेपर असतो म्हणून काय नुसत्याच वाईट वाईट बातम्या द्याव्यात? निगेटिव्ह कुठले! सुमित्राआज्जींनी बरोब्बर त्यांना पकडून धम्मकलाडू दिले. दिल्लीत इंद्रप्रस्थ विश्वसंवाद केंद्रात देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान समारोह होता. म्हणजे तसा घरचाच कार्यक्रम. त्यांना खरे तर हे सांगायची गरज नव्हतीच. म्हणजे सुसंस्कारींना आणखी किती सुसंस्कारी व्हायला सांगणार? पण तरीही आज्जी म्हणाल्याच त्यांना, की बाबांनो, सतत काय ते खरे बोलायचे? माणसाने कसे गोड गोड लिहावे. छान्छान बोलावे आणि कशाला बरे सांगावीत ती कटू सत्ये? सत्यम् ब्रुयात रे बाबांनो. परंतु ते कसे हवे प्रियम्. अप्रियम् सत्यम् असेल तर ते आपले ना ब्रुयातच.. म्हणजे सांगूच नये. आता हे प्रियम् म्हणजे कोणास प्रियम् हे काही त्यांनी उलगडून सांगितले नाही आणि अप्रियम् म्हणजे काय हेही त्या काही बोलल्या नाहीत. पण सुसंस्कारी पत्रकारांना तेवढे तर समजायलाच हवे ना, की अप्रिय सत्य म्हणजे – चुकतात कधी सरकारी धोरणे, होतो कोणावर अन्याय, उशीर होतो निर्णयांना, त्याचे बसतात फटके लोकांना.. पण हे सारेच का सांगायचे असते? आपले सरकारी माहिती खाते सांगते का कधी तसे? वृत्तपत्रांनीही तशा गोडगोड गोष्टी सांगाव्यात आणि वाचकांनाही तसेच हवे असते हो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आपण पाहा, समजा सोसायटीतल्या उदाहरणार्थ साखरदांडय़ांच्या कमळीने वर्गात पहिला क्रमांक मिळविला की ती बातमी कशी सर्वाना सांगत सुटतो. तेच जर ती कमळी कोणाचा हात धरून पळून गेली तर करतो का त्याची चर्चा? मग? पत्रकारांना नको हे समजायला? त्यांच्या नकारात्मकतेवर बंदीच आणायला पाहिजे. म्हणजे मग ते कसे सुतासारखे सरळ नि:पक्षपाती बनतील. आज्जींनी त्यांना हाही सल्ला दिला आहेच. यापुढचे मात्र माध्यमांनी पाहून घ्यावे, की गोड गोड बोलायचे, छान्छान लिहायचे आणि वर नि:पक्षपातीपण राहायचे, तर नेमके ‘कोणाच्या बाजूने’ नि:पक्षपाती राहायचे? आज्जींनी तेही ‘पॉझिटिव्हली’ स्पष्ट केले असते, तर बरे झाले असते..