पुणेकर – हुश्श.. आलो एकदाचे पहिल्या क्रमांकावर. टाकले मुंबईला मागे. असेल तुमचे शहर राजधानीचे पण जगण्याची खरी रंगत इथेच. नि खाण्याचीसुद्धा! सकस आहारामुळे चेहरा आनंदी राहतो असे म्हणतातच की! एखादी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारायची आमची सवय नाही, पण आनंदी शहरांचा हा अहवाल मात्र अपवाद. मराठी भाषा व संस्कृती केवळ आम्ही टिकवून ठेवलीय या राज्यात. त्याचा आनंद चेहऱ्यावर झळकणारच ना! या शहराचा इतिहासही आनंदीबाई पेशवे ते डॉ. आनंदीबाई जोशी असा आनंदीच. होय, आजकाल वाहतूककोंडी सहन करतो आम्ही. पण, तीही हसऱ्या चेहऱ्याने, कुणाशीही वाद न घालता. हेल्मेटसक्तीला आम्ही विरोध का केला ते कळले ना आता? या सर्वेक्षणासाठी आनंदी चेहरा दिसावा म्हणून! ज्ञानाच्या क्षेत्रात तर आमचा हात कुणी धरूच शकत नाही हो. घरादारासमोरच्या नुसत्या पाटय़ा वाचल्या तरी त्याची साक्ष पटेल तुम्हाला. त्या वाचूनच अनेकजण आनंदी होऊन जातात. चर्चा, वादविवाद, मग ते पार्कातले, पेठांमधले वा डायनिंग हॉलमधले असोत. सारे बुद्धीला चालना देणारे. मग चेहऱ्यावर आनंद फुलणारच ना! ‘पुणे तिथे काय उणे’ उगीच नाही म्हणत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकर – कुण्या एका फुरसती माणसाकडून तयार करवून घेतलेल्या अहवालावरून फारच उडय़ा मारू लागलेत हे पुणेकर! अरे, जरा इथे येऊन धावपळीचे जिणे जगून दाखवा की! लोकलच्या गच्च गर्दीत प्रवास करून बघा; मग सांगा चेहरा आनंदी राहतो की काय ते. सध्या तर तीही सुरू नाही. तरीही पोटापाण्यासाठी पाचपाच तास प्रवास करून जगणे सुसह्य़ करतो आम्ही. ‘वाहतूक बंद, आता कसे’ असे म्हणत सुपारी चघळत घरी नाही बसत! प्रचंड कष्टांतून येणारा आनंद भले नसेल दिसत आमच्या चेहऱ्यावर, पण याच कष्टाच्या बळावर राज्याचा आर्थिक गाडा नीट चालतोय हे लक्षात ठेवा. तुमच्यासारखे दुपारी झोपत नाही आम्ही. आठ तासांच्या नोकरीसाठी सहा तासांचा प्रवास करतो आम्ही. आम्हीच बाहेर पडलो नाही तर राज्यावर उपाशी राहायची वेळ येईल. आमच्या जगण्याच्या ‘स्पिरिट’ची तुलनाच होऊ शकत नाही कुणाशी. गप्पांचे फड रंगवून आनंदी राहण्याची फुरसत नाही आमच्याजवळ. कामातून मिळणारा आनंद हाच आमच्यासाठी महत्त्वाचा. त्यातून मिळणारे समाधान सर्वेक्षणातून थोडीच दिसणार? म्हणे, मुंबईला मागे टाकले. अरे, आमच्यासारखे जीव मुठीत धरून जगणे शिका की जरा!

नागपूरकर – राज्याची उपराजधानी असल्याने कायम दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची सवयच आहे आम्हाला. त्यामुळे ‘आनंदी’च्या यादीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही हो! तसाही आळस आमच्या नसानसात भिनलेला. मग दुसरा काय आणि तिसरा काय! आहोत ना त्या यादीत, बस तेवढे पुरेसे! आमचे जगणे घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे नसतेच कधी, १२ ला बोलावले की १ ला पोहोचायचे. त्यामुळे कदाचित सर्वेक्षणवाल्यांनी खालचा क्रमांक दिला असेल. आहे त्यात समाधान मानण्याची आमची वृत्ती. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या शर्यतीत आम्ही नाहीच. घरटी एक पोरगा बाहेर नोकरी करतो म्हटल्यावर उरतात फक्त म्हातारे. त्यांच्या आनंदाचे मोजमाप कमीच भरणार ना! फक्त एकच शंका आहे, हा सर्वेक्षण करणारा पुणेकरच का? करोनाकाळात असे सर्वेक्षण करून इतरांना कमी लेखण्याचा हा कट तर नसावा ना? तसे असेल तर, अध्यक्षमहाराज, याची चौकशी झालीच पाहिजे, एवढे मात्र आम्ही नक्की म्हणू!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai vs pune marathi language mppg
First published on: 08-01-2021 at 00:57 IST