काय गुलाबराव तुम्ही? ते चावून चावून चोथा झालेले वाक्य पुन्हा वापरायची काय गरज होती? आणि रस्त्याच्या गुळगुळीतपणाला स्वप्नसुंदरीच्या गालाची उपमा कशाला? तुम्ही तर जळगावकडचे पाटील. केळीच्या बनात रमणारे! म्हणा की मग केळीच्या सालीसारखे पांढरे, चकाचक, थोडे निसरडे रस्ते तयार करतो म्हणून. अशी उपमा तुम्हाला केळीचा अपमान वाटत असेल तर तलवार आहेच की तुमच्याकडे! म्हणा मग तलवारीच्या पात्यासारखे चकाकणारे रस्ते तयार केले म्हणून. येऊन जाऊन गालच का आठवतो तुम्हाला? तोही त्या विद्यमान खासदार आणि माजी स्वप्नसुंदरीचा. ज्या लालूंनी हे पहिल्यांदा म्हटले त्यांचेही गाल पार खडबडीत होऊन गेले तुरुंगात राहून राहून. रस्ते तर दूरच राहिले. सत्ता गेली ती वेगळीच. रोज बोलावे लागते म्हणून काहीही बोलायचे आणि वाक्य तरी कुणाकडून उसनवारीने घेतले तर त्या मागास बिहारकडून. महाराष्ट्राची काही इज्जत आहे की नाही? सध्या तुम्ही पुरोगाम्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, हे विसरलात की काय? याच पुरोगाम्यांची सत्ता राजस्थानमध्ये आहे. तिथले एक मंत्री सत्तेच्या कैफात काही दिवसांपूर्वीच म्हणाले, सुंदरीच्या नाही तर कटरिनाच्या गालासारखे रस्ते करू म्हणून. काळानुरूप त्यांचे वक्तव्य बदलले, वृत्ती नाही. तुम्ही मात्र अजूनही जुन्याच जमान्यात. बरे, दरवर्षीच तुम्ही गुळगुळीत रस्ते तयार करता. पण वर्षभरही टिकत नाहीत ते. खाचखळगे लोकांच्या पाचवीलाच पुजलेले. त्यांच्या गालांचे तसे नाही. वर्षानुवर्षे त्यांनी हे सौंदर्य टिकवून ठेवले. तेही मेहनतीने. तसे कष्ट घ्यायला तुम्ही तयार नाही आणि चालले तुलना करायला. काळ बदललाय आता. जुन्या सुंदरींची जागा नव्यांनी घेतलीय. अलीकडेच त्यात आणखी एकीची भर पडलीय हे ठाऊक असते तर तुम्ही दिशाचे नाव घेतले असते. तुमचा हा जुनाटपणा बघून नव्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? या नव्यात सगळे आले. म्हणजे सुंदरी तर आल्याच पण गुळगुळीत रस्त्यावरून सुसाट धावणारी नवी पिढीसुद्धा आली. त्यांना किती वेदना होत असतील याचा विचार करा जरा. नवे रणवीरच्याही गुलाबी गालाची तेवढ्याच तन्मयतेने तारीफ करतात हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? कधी येणार तुम्ही आजच्या काळात? ‘परत या, परत या, गुलाबराव नव्या युगात परत या’ अशा घोषणा द्यायला लावायच्या का तुमच्याच काही सैनिकांकडून? तुमच्या धाकामुळे सैनिक तयार नसतील तर तुमच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या अनेक ताई आहेतच की राज्यात. त्या तत्परतेने राजी होतील. शेवटी घोषणा तर तुमच्याच पक्षाची ना! त्यांनाही काम मिळेल आणि तुम्हाला आत्मपरीक्षणाची संधी! अहो, तुमच्या नावातच गुलाब आहे. हे फूल म्हणजे सभ्यता व रसिकतेचे प्रतीक. किमान त्याची आठवण ठेवत तरी चांगले बोला ना! उगाच त्या फुलाखालच्या काट्याची आठवण कशाला करून देता?

 एक बरे झाले. हे काटे अनेकांना टोचल्याची जाणीव तुम्हाला लवकर झाली आणि तुम्ही माफी मागून मोकळे झालात!आता एकच करा. स्वच्छ हेतूने बरेच दिवस न केलेली दाढी करा व नंतर गुळगुळीत झालेल्या गालावरून हात फिरवत तीच वृत्ती जोपासायची असेल तर नव्या सुंदरींचेही काही सिनेमे जरूर बघा. नावे ठाऊक नसतील तर युवा सेनेच्या कोणत्याही कार्यकत्र्याला विचारा, तो पटकन सांगेल. नवे नायक, नायिका बघितल्यावर मग रस्ते कसे हवे याचा साक्षात्कार तुम्हाला जरूर होईल.  पण खरे सांगतो, हे गालबिल सोडा आणि एकदा रस्त्यांकडेच नीट पाहा !

chavadi lok sabha election 2024 maharashtra political crisis
चावडी : जागा चार आणि आश्वासने भारंभार !
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम