आज बऱ्याच दिवसांनी नाथाला पहाटेच जाग आली. आळोखेपिळोखे देत तो उठून बसला, आणि त्याने मोबाइल हाती घेतला. सकाळी जाग येताच मोबाइल पाहायचा हे शास्त्र असतं, असं त्याने स्वत:स बजावलेलं होतं, आणि ‘शास्त्र असतं’ म्हटल्यावर त्यावर प्रश्न विचारायचे नाहीत, असं आईनं लहानपणीच सांगून ठेवलेलं असल्याने नाथाने मोबाइल पाहण्याच्या शास्त्रावरही कधीच प्रश्नचिन्ह उभं केलं नव्हतं. हे शास्त्र शिस्तीत पाळल्यास फायदाच होतो, असा अनुभवही त्याला अनेकदा आला होता. सकाळीच व्हॉटस्अ‍ॅपवर येणारे ‘गुड मॉर्निग मेसेजेस’ पाहताना मन प्रसन्न होतं, आणि ते पुढे पाठविल्यास ग्रुपवरील मैत्री घट्ट होते, अशी त्याची भावना होती. त्यामुळे आजही नाथाने गुड मॉर्निग मेसेजेस उघडले. गुलाबाच्या टवटवीत आणि रंगीबेरंगी फुलांचे शेकडो गुच्छ त्याच्यासाठी सुप्रभातीचे शुभसंदेश घेऊन स्क्रीनवर अवतरले होते. आजची तारीख आठवून क्षणभर नाथा हुरळला.. गुलाबाच्या फुलांशी घट्ट ओळख कधी झाली ते आठवू लागला, आणि कॉलेजचे दिवस नाथाच्या नजरेसमोर तरळू लागले.. त्याच दुपारी त्याने चक्क दांडी मारून ‘टाइमपास’ पाहिला होता, आणि नंतर संध्याकाळपासून त्याच्या डोक्यात गाण्याचे तेच सूर घुमत होते.. ‘मज वेड लागले, प्रेमाचे!’.. नाथाच्या मनात गुलाबाची असंख्य फुलं डवरली होती, आणि त्याच्याच पाकळ्या काढून रस्त्यावर पखरत तो पुढेपुढे चालला होता.. याच पाकळ्यांच्या पायघडय़ांवरून ती समोर येईल, मनातल्या मोरपिसांचा फुलोरा फुलवून एक गुलाबी फूल हाती घेत आपण तिला ‘प्रपोज’ करू, असा विचार करत तो चालत होता, तोच ‘ती’ समोर अवतरली.. अनपेक्षितपणे समोर उभ्या राहिलेल्या त्या स्वप्नाला पाहून नाथा सटपटलाच. मनातल्या गुलाबाच्या पाकळ्या क्षणभर लाजल्या, आणि कल्पनेतला तो गेंदेदार गुलाब गेला कुठे या विचाराने तो अस्वस्थही झाला.. नाथाने मधाळ नजरेने तिच्याकडे पाहिलं, आणि तिच्या चेहऱ्यावरही गोड गुलाबी स्मितहास्य उमटलं. नाथाच्या मनात गुलाबांचा बगिचाच मोहोरला होता.. आपल्या प्रतिभेलाही मोहोर येत आहे, असं त्याला जाणवू लागलं, आणि मनाच्या कागदावर प्रेमकाव्याचे शब्द उमटताहेत असा भास त्याला झाला.. कसेबसे नाथाने ते प्रेमभारले शब्द मनावर कोरले, आणि घाईतच तो घरी आला. आता हेच काव्य गुलाबी रंगाच्या कागदावर लिहून प्रेमदिनीच्या मुहूर्तावर भेट म्हणून तिच्या हाती द्यायचे, असं ठरवून नाथा घरी पोहोचला, टेबलावरचा कागद खेचून त्याने आठवणीत साठलेली ती कविता लिहिण्यासाठी पेन उघडलं.. पण तो क्षण मागे गेला होता. मनातले गुलाबही गायब झाले होते.. अखेर नाइलाजाने नाथाने कागदावर शब्द लिहिले, ‘समजेना मजला काही, ते शब्द हरवले कोठे.. आता तर मिनिटाआधी, पेनाला लटकत होते’..

..आज ते सारं आठवताना, त्या दिवशी मनाच्या पटलावर उमटलेली ‘ती’ प्रेमकविता पुन्हा आठवण्याचा आटोकाट प्रयत्न नाथा करू लागला, पण ते हरवलेले शब्द त्यास सापडतच नव्हते.

नाथाने आळोखेपिळोखे देत खिडकीतून बाहेर पाहिलं. शेजारच्या फ्लॅटमधल्या गॅलरीत लव्हबर्ड्सचा चिवचिवाट सुरू होता..

गुंग होऊन ते सूर कानात साठवत असतानाच मागच्या टीपॉयवर कपबशी आदळल्याचा आवाज येऊन नाथा भानावर आला.. आज टिफिनमध्ये कोबीची भाजी असणार याचा नाथाला अंदाज आला होता. तरीही त्याने प्रेमळ तिरक्या नजरेने बायकोकडे पाहिलं, कारण त्याला कॉलेजच्या दिवसांतील गुलाबाचे गुच्छच आठवत होते.