शालेय परिसरातून तो तुरुतुरु चालत प्रासादापर्यंत पोहोचला तेव्हा महत्प्रयासाने मिळवलेल्या भेटीची वेळ होतच आली होती. तेवढ्यात भवनातून तोही रुबाबदार पावले टाकत येताना दिसला. तसे दोघेही शिक्केच. पण हा गोल व त्यावर उठून दिसणारी राजमुद्रा, तर आपण नुसते चौकोनी, हा फरक ध्यानात येताच शाळावाल्याच्या मनात असूया दाटून आली. ती झटकत त्याने सुरुवात केली, ‘‘हे बघ, तुझा अधिकार मोठा. तू फाशी थांबवू शकतोस. तुझा ठसा उमटला की कायदा आकाराला येतो. तुझ्या मागेपुढे एवढा लवाजमा. बुद्धीचा वापर तुला नसेलही करावा लागत, पण तुझा थाट मोठा. तरीही वेतनावरून तू तुझी तुलना आमच्याशी केली? तुझे वेतन आयकरमुक्त, आमचे नाही- हेही तुला ठाऊक नाही की काय? आता तुलना केलीच आहेस म्हणून सांगतो. आमचीही अवस्था सध्या तुझ्यासारखी झालीय. बुद्धीचे कामच उरले नाही आता. कधी शिरगणती कर, कधी करोनाचे रुग्ण शोध, कधी दारूच्या गुत्त्याची रखवाली कर, तर कधी चेक नाक्यावर वाहने तपास- अशीच कामे करावी लागतात आम्हाला. वेतन बुद्धीचा वापर करण्यासाठी मिळते, पण कामे मात्र भलतीच…’’ त्याला थांबवत गोल म्हणाला, ‘‘अरे, माझा हेतू तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. या प्रासादात आल्यापासून मीच माझ्यातून हरवून गेलो आहे. बुद्धीला दगदग नसल्याने आधी केलेली वकिलीसुद्धा पार विसरून गेलोय. कमी बोलायचे. कुणी भेटायला आले तर नुसते हूं हूं करायचे. ‘देखता हूँ’सुद्धा म्हणायचे नाही. उत्स्फूर्त सोडून छापील भाषणे वाचायची. कागदावर उमटण्याआधी मनातले प्रश्न मनातच गिळून टाकायचे. वेळापत्रक पाळायचे म्हणून नुसते घड्याळाकडे बघत बसायचे. या अशा अवस्थेत ‘ते’ वाक्य तोंडातून निसटून गेले असेल…’’ त्याला अडवत चौकोनी म्हणाला, ‘‘वापर न झाल्याने गंज चढलाय तुला. शिकवण्यासाठी होत नसेल आमच्या बुद्धीचा वापर, पण आयकरातून सूट कशी मिळवायची यासाठी करावाही लागतो विचार आम्हाला. तेवढे सोडले तर साक्षांकित होण्यापलीकडे कामच नसते आम्हाला. तुझ्याकडे तर एवढा नोकरवर्ग आहे. तोही सांगत नाही का तुला तुझ्या वेतनाचे काय होते ते?’’ त्यावर लगेच गोल म्हणाला, ‘‘नसत्या चौकशा करायच्याच नाहीत असे आधीच बजावून ठेवले होते त्यांनी. तसेही तिथे पैशाचे कामच पडत नाही. त्यामुळे त्याबाबत विचारायची हिंमतच झाली नाही कधी. साहाय्यक नेईल तिकडे फिरत राहायचे. कधी या, तर कधी त्या टेबलावर. वैताग आलाय रे नुसता! त्यातूनच अशी वारंवार फजिती व्हायला लागलीय.’’ हे ऐकून चौकोनी म्हणाला, ‘‘हे बघ, बुद्धीचे एक वेळ ठीक, पण सुखासीनतेमुळे डोळे दिपून घेऊ नको. वेतनपावती नेहमी बघत जा. आयकराच्या नावावर पक्षासाठी निधी तर कापून घेतला जात नाही ना, या शंकेवर जरा डोळसपणे विचार कर.’’ हे ऐकताच गोलाकारचे डोळे चमकले, ‘‘तू म्हणतो त्यात तथ्य असेल तरी विचारायची सोय नाही रे आमच्या वर्तुळात.’’ ही खंत ऐकून चौकोनी म्हणतो, ‘‘मग तू सध्या विचार करण्याचे काम पूर्णपणे थांबवणेच उत्तम. राहा तसाच रबरी. जायच्या आधी ही ओवी ऐक : मी शिक्का, तू शिक्का। तुझ्या भाळी भारी बुक्का। तरी आम्हाला दिला धक्का। यासी काय म्हणू?।’’ हे ऐकून गोलाकार पुन्हा प्रासादाकडे पावले टाकू लागला. त्याची रुबाबदार चाल आता डळमळीत झाली असे चौकोनाला  वाटू लागले…