मंत्रतंत्र, जादूटोण्यासारख्या भंपक गोष्टी जगाच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेशा नाहीत, हे समाजाला समजावण्यासाठी विज्ञानयुगाची आणखी किती वष्रे वाया जाणार आहेत, हे समजेनासेच झाले आहे. विज्ञानाला अशक्य असे काहीही नाही असा डांगोरा एकीकडे पिटला जात असतानाही, पुराणकथांच्या कपोलकल्पित गोष्टींचे गारूड घालून समाजाला नादी लावणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी राज्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला, पण त्यालाही बगल देणाऱ्यांची दुकानदारी मात्र अव्याहतपणे सुरूच आहे. वशीकरण, संतती समस्या, पुत्रलाभ करून देणाऱ्या बंगाली बाबाच्या रेल्वेच्या डब्याडब्यांत दिसणाऱ्या जाहिराती असोत किंवा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर व्यवस्थित आध्यात्मिकतेचा आव आणत हीच दुकानदारी करणारे वैदू, बाबा-बुवा असोत, साऱ्यांची जातकुळी समाजाला भुरळ घालून लुबाडणाऱ्या भोंदूगिरीचीच असते. मुलगा-मुलगी भेद नको असा संदेश देत समाजाला पुरोगामित्वाची पाऊलवाट आखून देण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर करावयाचा, त्याच माध्यमांनी आपले अवघे ‘साम्राज्य’ अशा भोंदूंच्या चरणी अर्पण केल्यानंतर विज्ञानाच्या वाटा कशा टिकणार, हा साधा प्रश्नदेखील कुणाला पडू नये, ही आश्चर्याची बाब आहे. सुशिक्षित समाजालाही मूर्ख बनविणाऱ्या क्लृप्त्या वापरून त्याचा वारेमाप डांगोरा पिटत स्वत:च स्वत:वर साधुत्वाची झूल पांघरून घेणाऱ्या काही भोंदूंचे पितळ उघडे पडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे वरवर जे शुद्ध तांबे वाटते, ते तर कळकटलेले पितळ आहे, याचे पुरेपूर पुरावे आता समोर येऊ लागतील. एका अभिमन्यूने चक्रव्यूहभेदाचा संस्कार गर्भावस्थेत असतानाच श्रीकृष्णाकडून घेतल्याची एक पुराणकथा सांगितली जाते. आजच्या धकाधकीच्या जगण्यात सुखी संसाराचे संस्कार विकत देता येतात याची काही धंदेवाईक दुकानदारांना खात्री झाल्याने, ही कथा नव्या रूपाने मांडून गर्भसंस्काराचे वर्ग सुरू करणाऱ्या बुवांनी स्वत:वर चढविलेली तकाकी जरी तांब्याइतकी तुकतुकीत दिसत असली, तरी मुळात त्या मुलाम्याखाली धंदेवाईकपणाचे पितळ आहे, हे स्पष्ट होऊ लागले आहे. असे धंदे करून जे भोंदू स्वत:च ‘गुरुत्व’मध्यस्थानी जाऊन बसले, त्यांना आता तेथून पायउतार व्हावे लागणार आहे. शेजारच्या चौरंगावरील श्रीकृष्णाची मूर्ती जणू आपल्या तोंडून उपदेशामृत वदविते असा कृत्रिम देखावा निर्माण करून अधिकारीपदाचा आभास पसरविणारे उच्च पांढरपेशांचे भोंदू गुरुवर्य काय किंवा एखाद्या पडक्या झोपडीत दैवी संचाराची नाटके करणारे भंपक बंगाली बाबा काय, या साऱ्यांना एकाच तराजूत मोजण्याची गरज असताना, काही बाबांच दैव मात्र उच्चस्थानावरील अंधश्रद्ध लोकांच्या आशीर्वादाने फळफळते, तेव्हा विज्ञानालाही लाजेने मान खाली घालावीशी वाटत असावी. अशा लोकांच्या सावलीतच ‘बाल’पण सरून प्रौढत्वाची शारीरिक उंची गाठलेल्यांच्या बौद्धिक उंचीचे मोजमाप आता सुरू झाले आहे. ते पूर्ण होईल, तेव्हा तांबे आणि पितळ यांतील भेदही स्पष्ट होईल..