भविष्यातील इतिहासाचे एक पान..

‘राजधानीच्या मदानावर रयतेचा महासागर कानात प्राण आणून छत्रपतींचे स्तुतिस्तोत्र ऐकण्यास आतुर होती.

काम मोठे कठीण होते. इतिहासाची जरादेखील मोडतोड न करता नवे कथानक तयार करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी ते दोघे विचारविनिमय करत होते. जाणत्या राजाच्या साक्षीने पार पडलेल्या एका सोहळ्याच्या कथानकाचा दस्तावेज भविष्यातील इतिहासाच्या बखरीसाठी तयार करावयाचा होता, आणि त्याची तयारी सुरू होती. एक जण कान खाजवत होता, दुसरा दातावर पेन आपटत होता. अखेर एकाने कागद पुढे ओढून लिहावयास सुरुवात केली..

‘राजधानीच्या मदानावर रयतेचा महासागर कानात प्राण आणून छत्रपतींचे स्तुतिस्तोत्र ऐकण्यास आतुर होती. छत्रपतींसह सारे मनसबदार, पेशवे मंचावर उपस्थित होते. जाणते राजे नेहमीप्रमाणे हाताची घडी घालून छत्रपतींशेजारील आसनावर स्थानापन्न होते. मदानावर छत्रपतींचा जयघोष सुरूच होता. सारे काही ठरल्यानुसार जमून आले होते. तुतारीचा ध्वनी मदानावर घुमला, आणि छत्रपतींच्या वाढदिवस सोहळ्यास सुरुवात झाली. ठरल्यानुसार रयतेच्या प्रतिनिधींनी छत्रपतींवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला, आणि ‘ते’ बोलावयास उभे राहिले. त्यांनी एकवार जाणत्या राजांकडे कटाक्ष टाकला. ते हाताची घडी घालून निर्वकिारपणे बसले होते. आता हीच संधी आहे, जाणत्या राजाचे बोल खोटे ठरविण्याची, हे ‘त्यां’नी ओळखले, आणि बोलण्यास सुरुवात केली. छत्रपतींच्या स्तुतिस्तोत्राचे पूर्वपठण अगोदरच केलेले असल्याने, अडखळण्याचा प्रश्नच नव्हता. अजूनही छत्रपती ते छत्रपतीच असतात, हे जाणत्या राजाला दाखवून द्यायचे होते. मागे एकदा त्यांनी इतिहासाचे काटे वर्तमानात उलटे फिरल्याची शंका व्यक्त केली होती. पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागल्याचा खवचट दाखला दिला होता. आज ते खोटे ठरवायचे होते. म्हणूनच ही वेळ योग्य असल्याची खात्री करून ते विराट सोहळ्यातील रयतसागराशी बोलू लागले. छत्रपती हे एक मुक्त विद्यापीठ आहे. त्याची घटना ते स्वत: लिहितात, नियम तेच तयार करतात, त्याची अंमलबजावणी तेच करतात, आणि त्याचे पालन न करणाऱ्यास शासनही तेच करतात, अशी प्रारंभिक स्तुतिसुमने त्यांनी उधळली, आणि रयतेने तोंडात बोटे घातली. आजही, आपल्यावर छत्रपतींचीच नजर आहे, त्यांचेच नियम बंधनकारक आहेत, आणि तेच शासनकत्रे, स्वायत्त, मुक्त आहेत, असे खुद्द ‘त्यांनी’च स्पष्टपणे बजावल्याचे ऐकून रयतेचे कान संतुष्ट झाले. पुन्हा एकदा छत्रपतींचा जयजयकार गगनात घुमला. छत्रपतींनी आसनावरूनच रयतेला दंडवत घातला, आणि समोरची बाटली उचलून पाण्याचा एक घोट घेत ते स्वत:शीच समाधानाने हसले. प्रत्यक्ष ‘त्यां’नीच आपल्या स्वायत्ततेवर मान्यतेची मोहोरे उमटविल्याचे पाहून खुद्द छत्रपती तर कमालीचे सुखावले होते. त्यांना समाधानाची छटा लपविता येईना. रयतेचा आनंदही मदानावरून ओसंडून वाहत होता. छत्रपतींनी जाणत्या राजांकडे एक कटाक्ष टाकला. राजे मनातल्या मनात हसत होते. आपले हसू चेहऱ्यावर उमटू न देता त्यांनी हाताची घडी थोडीशी तिरपी केली आणि मनगटावरील घडय़ाळाकडे कटाक्ष टाकून वेळेचे गणित केले..’

एवढा प्रसंग कागदावर उतरवून त्याने कागद दुसऱ्याकडे सरकवला, त्याने तो वाचला, आणि तळटीप टाकली- ‘हा प्रसंग काल्पनिक असून त्याचे अलीकडच्या कोणत्याही प्रसंगाशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Udayanraje bhosale sharad pawar

ताज्या बातम्या