सत्ता हा एक शक्तिशाली चुंबक असतो आणि त्याला चिकटून राहण्यातील आनंदही काही औरच असतो. बंगालमध्ये ममता नावाच्या चुंबकाची जादू चालू झाल्यानंतर काँग्रेसी चुंबकाची शक्ती क्षीण होत गेली आणि कालपर्यंत त्या चुंबकाला चिकटलेली माणसे सत्तानंद देणाऱ्या चुंबकाकडे आकर्षित होऊ लागली तर काय होणार, या जाणिवेने प्रदेश काँग्रेसला अस्वस्थ करून सोडले आहे. बंगालच्या काँग्रेसमधील चुंबकत्व कसेबसे टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शपथपत्राचा नवाच फंडा राबविला. आता या प्रयोगाकडे देशभरातील काँग्रेसनिष्ठांचे डोळे लागले असतील. तो यशस्वी झाला तर काँग्रेसी अस्तित्वाला संजीवनी सापडेल, या आशेची पालवीही निष्ठावंतांच्या उदास मनांवर उमलू लागली असेल. पक्षाच्या उरल्यासुरल्या आमदारांनी सत्तेच्या चुंबकाकडे आकर्षित होऊन अगोदरच दुबळ्या झालेल्या स्वपक्षाची स्थिती आणखी केविलवाणी करू नये, यासाठी त्यांना सोनिया व राहुलनिष्ठेची शपथ घालण्याचा हा कायदेशीर प्रकार वरकरणी अजब आणि असाहाय्य अपरिहार्यता वाटत असला, तरी त्यातून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची पक्षनिष्ठा तरी संशयातीतपणे समोर आली आहे. पक्ष सावरण्यासाठी काहीही करण्याची सर्वोच्च तयारी दाखविण्याचा बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा हा प्रयोग कदाचित पक्षनिष्ठेचा नवा आदर्श ठरेल. पडत्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची आणि पक्षविरोधी कारवाया न करण्याची शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमी घेऊन प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या आमदारांकडून कायदेशीर बांधिलकी घेतली. पण त्याचे पालन केले नाही तर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने आमदारांनी बहुधा सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. राहुल आणि सोनियानिष्ठेच्या शपथबंधनात सतत अडकून राहण्याच्या कायदेशीर मार्गाला एक भावनिक पळवाटही असल्याचा आनंदही त्या आमदारांना झाला असेल. उलट अशी पळवाट ठेवली तरच काही काळ तरी पक्षाचे चुंबकत्व टिकवता येईल, असा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा होरा असावा. जेव्हा ताकद वाढविण्याचे प्रयत्न खुंटतात, तेव्हा ताकद टिकविण्याची तरी खटपट करत राहावेच लागते. महाराष्ट्राने असा प्रयोग यापूर्वीच अनुभवला आहे. मनगटावरची भावनिक भगवी बंधने पक्षनिष्ठेच्या कायदेशीर शपथपत्राइतकीच बंधनकारक ठरतील आणि सत्तानंद असला वा नसला तरी चुंबकाची शक्ती क्षीण होणार नाही, असा विश्वास त्या वेळी अनेकांना वाटलाच होता. आज जरी अनेक मनगटांवर बंधनाचे ते धागे दिसत नसले, तरी त्या भावनिक प्रयोगाचा गाजावाजा झालाच होता. चुंबकीय शक्ती टिकविण्याच्या त्या प्रयोगाने सत्ताकारणाच्या इतिहासात एका आगळ्या प्रयोगाची पहिली नोंद केलीच आहे. बंगालच्या शपथपत्र प्रयोगाला दुसऱ्या प्रयोगाचा मान मिळेल. तो यशस्वी ठरला, तर १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर कमी पडतील आणि कदाचित मरगळलेल्या चुंबकांना पुन्हा शक्ती मिळेल. देशाच्या राजकारणाचे भविष्य त्या दिवसाकडे कुतूहलाने डोळे लावून बसले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal assembly elections analysis
First published on: 26-05-2016 at 02:46 IST