पंधरा वर्षांपूर्वी त्यांचे नाव कुणालाही माहिती नव्हते. त्यांचे वडील पोस्टात काम करीत होते, तर आई पापड विकून संसाराला हातभार लावत असे. तिला पापड विकण्यासाठी दिवसा मदत करून ते रात्री अभ्यास करीत असत. हिंदूी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना विद्यार्थिदशेतच त्यांना गणिताची गोडी लागली ती कायमचीच. त्यांना अलीकडेच गणिताचे शिक्षण लोकप्रिय करून, गरीब मुलांना आयआयटी व इतर अवघड परीक्षांसाठी गणिताचे मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल नुकताच राजकोट येथील गणित संमेलनात ज्येष्ठ गणितज्ञ ‘श्रीनिवास रामानुजन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांचे नाव आहे आनंदकुमार.
१ जानेवारी १९७३ रोजी पाटणा येथे त्यांचा जन्म    झाला. गणितात कमालीचे प्रावीण्य मिळवलेल्या आनंदकुमार यांचे नाव आता जगभरात झाले आहे. त्यांनी हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम बिहारमध्ये ‘सुपर-३०’ नावाने सुरू केला. त्यांची संस्था या मुलांची चाचणी घेऊन तीस जणांची निवड करते व नंतर त्यांना आयआयटी व इतर अनेक परीक्षांसाठी गणिताचे प्रशिक्षण देते. डिस्कव्हरी चॅनेलने त्यांच्या या गणित वर्गावर एक तासाचा कार्यक्रम केला होता. जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने त्यांना या कार्याची शाबासकी दिली आहे. त्यांचे गणितातील शोधनिबंध ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम’ व ‘द मॅथेमॅटिकल गॅझेट’ या नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना केंब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता,  आर्थिक स्थितीमुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही. त्यांना पाटणा विद्यापीठाच्या वाचनालयात गणिताची परदेशी नियतकालिके मिळत नसत म्हणून ते सहा तास रेल्वे प्रवास करून वाराणसीला जात असत; यावरून त्यांची गणिताची आवड दिसतच होती. खरे तर त्यांना सहजपणे आयआयटीत जाऊन ऐषआरामाचे जीवन जगता आले असते, पण त्यांनी गणिताचा शिक्षक, संशोधक बनण्याचा वेगळा मार्ग निवडला. असे करायला फार धैर्य लागते. ते त्यांच्याजवळ आहे. त्यांना दिल्लीतील एका शिकवणी वर्गाने १९९८ मध्ये वर्षांला दहा लाखांची ऑफर गणित शिकवण्यासाठी दिली होती, त्यांनी ती नाकारली. १९९२ मध्ये त्यांनी ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ ही संस्था सुरू केली, त्या वेळी त्यांनी पाचशे रुपये भाडय़ाची खोली घेऊन मुलांना शिकवले.
 २००३ ते २०१३ या काळात त्यांच्या २८१ विद्यार्थ्यांची आयआयटीला निवड झाली. अनेक कंपन्यांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले, पण त्यांनी ही मदत घेतली नाही. आता ते गणितावर पुस्तके लिहीत आहेत. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांचे खास दूत रशाद हुसेन यांनीही त्यांच्या ‘सुपर ३०’ या उपक्रमाचे कौतुक केले आहे. मुलांना गणिताची गोडी लावली व चांगल्या पद्धतीने शिकवले तर ते नक्की त्यात यशस्वी होतात, असे त्यांचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh anand kumar
First published on: 01-02-2014 at 01:50 IST