‘‘पीपल आर स्टिल द की टू एनी बिजनेस..’’ नियुक्तीनंतर कार्ल स्लिम यांनी दिलेल्या या ‘उपदेशा’ने टाटा मोटर्समधील तत्कालीन ‘सरकारी’ सहकाऱ्यांनाही विचार करायला भाग पाडले. त्यावर अंमलबजावणी केली ती रतन टाटा यांनी. निवृत्तीपूर्वीच्या टाटा मोटर्समधील शेवटच्या सर्वसाधारण सभेत रतन टाटा यांनी कंपनीसाठी मिहद्रची स्पर्धा भविष्यात काळजी निर्माण करणारी आहे, असे म्हटले आणि बिकट वातावरणात आपल्या उद्योगाला कार्ल हेच पुढे नेऊ शकतील, असा विश्वास त्यांच्यावर व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी टाकून निर्माण केला.
टाटा मोटर्ससह एकूणच भारतीय वाहन उद्योग कमी विक्रीच्या फेऱ्यात अडकलेला असताना कार्ल यांची नियुक्ती झाली होती. जनरल मोटर्सच्या माध्यमातून कार्ल यांची भारताबरोबर तशी खरी ओळख २००७ मध्ये झाली. मुख्य जनरल मोटर्सच्या भारतातील व्यवसायाची सलग पाच वर्षे ते जबाबदारी पाहत होते. चीनची वाहन बाजारपेठ तशी अव्वल. तेथे भारतीय कंपनीने जम बसवावा यासाठी कार्ल यांच्याच नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने जग्वार, लॅण्ड रोव्हरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. शेजारच्या देशात टाटाच्या माध्यमातून पहिली भारतीय वाहन कंपनी तेथे शिरकाव करणारी ठरली ती कार्ल यांच्यामुळेच.
नॅनोचे विपणन करण्यातील चूक रतन टाटा यांना कार्ल यांच्यामुळेच उमगली. (वरचे कार्ल यांचे वाक्य ते त्यामुळेच.) छोटय़ा कारऐवजी स्वस्तातील कार अशी चुकीची बिरुदावली नॅनोमागे लावली गेली, याची खंत टाटा यांनी बोलून दाखविली. अखेर नॅनोलाही कार्ल यांनी बदलले. प्रवीण कडले, प्रकाश तेलंग या मराठी माणसांनंतर टाटा मोटर्सची धुरा कार्ल यांच्याकडे योग्य ‘बायो-डाटा’मुळेच आली होती. भारतीय प्रसारमाध्यमांना काहीसे तिरकस घेणारे आणि प्रसंगी सहकारी, उत्पादन यावरून विनोदाच्या मैफलीही जमविणारे ब्रिटिश कार्ल भारतभूमीवर असताना क्रिकेट आणि बॉलीवूडमध्ये खूप रमायचे. टाटा मोटर्सच्या डिलरच्या लग्नातही ते नाचत आणि बैठकांसारख्या व्यासपीठावर ते गंभीरही होत.  हसवणाऱ्या जोकरच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या चेहऱ्यावरील रंगरंगोटीत पुसून जातात, तसेच आपल्या विनोदी गुलाबी चेहऱ्यामागील कटू प्रसंग दडवून कार्ल निघून गेलेत. कार्ल यांना अगदी जवळून ओळखणारे मग ते टाटा मोटर्समधील, त्यांच्या जुन्या कंपन्यांमधील सहकारी असोत अथवा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना त्यांची अनुपस्थिती यंदाच्या ऑटो शोमध्ये अधोरेखित करील. कार्ल यांच्याच संकल्पनेतील वाहने यंदा नवे रूप घेऊन या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अवतरत आहेत. मात्र हा शोही त्यांच्याविनाच असेल; अगदी जोकर नसलेल्या सर्कशीसारखा..