‘घोट माझा गळा, मारून टाक मला’ असे आर्जव नायकाकडे करणारी ‘पॅट्सी’ ही ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटातील भूमिका तशी दुय्यम, पण अभिनयाला वाव देणारी. हा चित्रपट ऑस्करविजेता ठरलाच आणि पॅट्सीच्या भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचे ‘ऑस्कर’ ल्युपिटा एन्योन्गो हिच्या हाती आले. तिचा हा पहिलाच चित्रपट, पण त्यातील या भूमिकेसाठी तिला मिळालेला हा ३१वा पुरस्कार! ‘एखाद्या व्यक्तीचे दु:ख दुसरीसाठी आनंद घेऊन येते’ असे काहीशा भावुकपणे ल्युपिटाने अकॅडमी अवॉर्ड ऊर्फ ऑस्करच्या मंचावरून सांगितले, त्यामागे केवळ ऑस्करचा नव्हे तर सर्वच पुरस्कारांबद्दलचा आनंद होता. यशोशिखर गाठल्याचा हा आनंद ल्युपिटाला तिच्या मेहनतीतून मिळाला आहे, असेच तिची कहाणी सांगते.
मेक्सिकोत राज्यशास्त्र शिकवणारे आणि पुढे केनियात लोकप्रतिनिधी आणि मंत्रीही झालेले ल्युपिटाचे वडील आणि कॅन्सरग्रस्तांसाठी संस्था चालविणारी तिची आई, यांच्या प्रोत्साहनाने लहानपणीच ल्युपिटाला अभिनयाची गोडी लागली. वयाच्या १४ व्या वर्षी केनियाच्या ‘फिनिक्स प्लेअर्स’ या नाटय़संस्थेतर्फे ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्यूलिएट’मध्ये तिने ज्यूलिएट साकारली. जन्म मेक्सिकोचा, त्यामुळे आपोआप मिळालेल्या त्या देशाच्या नागरिकत्वाआधारे ल्युपिटा तेथे स्पॅनिश शिकण्यास गेली, पुढे अमेरिकेतील हॅम्पशायर विद्यापीठात नाटय़-चित्रपटाभ्यास शाखेतून तिने पदवी मिळवली. द कॉन्स्टंट गार्डनर चित्रपटाची केनियातील चित्रीकरण-व्यवस्था सांभाळताना अभिनेता राल्फ फिएन्स यांनी तिला अभिनय कर असे सुचवले. पण मायदेशातच राहून, गाजलेल्या ‘शुगा’ या टीव्ही मालिकेत भूमिका केली आणि ‘इन माय जीन्स’ हा केनियाविषयक लघुपट तयार केला. केनियातील ज्या ल्युओ समाजात (मूळच्या टोळीत) ती जन्मली, त्या टोळीचा हा वेध होता. अखेर, वयाच्या अठ्ठाविशीत पुन्हा अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या अभिनय अभ्यासक्रमास तिने प्रवेश घेतला आणि अनेक नाटकांतून भूमिकाही केल्या. येलमधील हे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच- नाटकांतील तिचा अभिनय पाहून ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’साठी तिला विचारणा झाली. सॉलोमन नॉर्थपच्या आत्मचरित्रातील पॅट्सीचा अभ्यास करण्यापासून ते या भूमिकेसाठी तब्बल ४० वेळा नामांकन आणि त्यापैकी ३१ वेळा पुरस्कार, इथपर्यंत ल्युपिटा या पहिल्या चित्रपटाशी संबंधित राहिली असली, तरी गेल्या वर्षी तिने लिआम नीसनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नॉनस्टॉप’मध्येही अभिनय केला.
व्हूपी गोल्डबर्ग, ओप्रा विनफ्रे यांना अभिनयासाठी; तर सुदानची सुपरमॉडेल अलेक वेक हिला मॉडेलिंगसाठी प्रेरणास्थान मानणारी ल्युपिटा ‘प्रादा’साठी मॉडेलिंग करते आहे. पण माझे कार्यक्षेत्र सिनेमाच, असे न्यूयॉर्कवासी झालेली ल्युपिटा सांगते.