भारताप्रमाणे संपन्नतेचा वारसा चालविणारी मुरलेली संस्कृती नसली तरी अमेरिकेला लोकगीत-संगीताची परंपरा आहे आणि त्याच्या लोकप्रियतेचे उदाहरण द्यायचे असेल तर पीट सीगर यांचे द्यावे लागेल. आपण त्यांच्या रचनेमुळे गाजलेली ‘वी शाल ओव्हरकम’ ऐकलेली नसते, पण गिरिजाकुमार माथुर यांच्या रूपांतरातून साकारलेले ‘हम होंगे कामयाब’ आपल्याला देशी वाटून जाते. ‘वी शाल ओव्हरकम’ हे तर अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीचे जणू स्फूर्तीगीत बनले. ‘टर्न टर्न टर्न’ हे बायर्ड्स बँडचे गाणे आपल्याला विविध संगीतवाहिन्यांवरून दिसलेले असते, मात्र त्याच्या कर्त्यांची आपल्याला माहिती नसते.
दुसऱ्या महायुद्धानंतर साठच्या दशकामध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांचे प्रश्न, नागरीहक्क प्रश्न, युद्धविरोधी मतप्रवाह, कामगार हक्क आदींबाबत ‘स्वातंत्र्या’च्या व्याख्या स्पष्ट करणाऱ्या चळवळी झाल्या, त्यांना इंधन पुरविले ते पीट सीगर यांच्या गीतांनी. आई व्हायोलिनवादक, वडील संगीत शिक्षक आणि काका कवी अशा कलासक्त कुटुंबात जन्माला आलेल्या पीट सीगर यांनी अगदी लहानपणापासूनच संगीताचे धडे गिरवले. लोकगीतांची रचना करणे, गळ्यात पाच तारी बेंजोलिन (सिंथॅटिक बँजो) किंवा बारा तारांचे गिटार घालून गावागावांत फिरून ही लोकगीते म्हणणे असा पीट यांचा जामानिमा असे. ते पक्के कम्युनिस्टधार्जिणे. त्यांच्या या कम्युनिस्टप्रेमामुळेच त्यांना रेडिओवर कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली होती.
 व्हिएतनाम युद्धात झालेल्या अमेरिकेच्या नाचक्कीवर भाष्य करणारे ‘वेस्ट इन बिग मडी’ या त्यांच्या गाण्यावरही नंतर बंदी आणण्यात आली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर पीट यांची प्रतिमा वादग्रस्त लोकगीतकार अशी बनली, असा आपला समज होईल. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच होती. राजकीय भाष्य असलेल्या त्यांच्या गीतांना जेवढी लोकप्रियता मिळाली त्याच्यापेक्षा कैकपटीने त्यांच्या लोकगीतांना ती मिळाली. त्यांना दोनदा ग्रॅमी पुरस्कारही मिळाले. यंदाच्या वर्षीही त्यांना ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. अलीकडे त्यांना गाणे म्हणता येत नव्हते. मात्र, तरीही सीगर लोकांमध्ये मिसळायचे. गाणी म्हणायचे. त्यांची गाणी प्रेक्षक पूर्ण करायचे. आपल्या घशातून आता सुरांऐवजी घरघरच जास्त बाहेर पडते, असे पीट गमतीने म्हणत. अशा या अवलिया गायकाने परवा जगाचा निरोप घेतला. लोकगीतगायक अरलो गुथ्राय यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, शालेय विद्यार्थ्यांच्या पिकनिकला कॅम्पफायर नावाचा एक प्रकार असतो. या कॅम्पफायरभोवती गोल रिंगण करून बसलेले विद्यार्थी जी जुनी लोकगीते गातात त्यातील बहुतांश गीतांमध्ये पीट सीगरच्याच गीतांचा समावेश असतो. हीच त्याच्या लोकप्रियतेची पावती!