scorecardresearch

चेतासंस्थेची शल्यकथा : ‘डिस्क’च्या शस्त्रक्रियेचा इतिहास

 डिस्कच्या अन्यूलस या भागाच्या बाहेरील एकतृतीयांश भागालाच संवेदनेच्या नसांचा पुरवठा असतो हे इथं मुद्दाम नमूद करणं गरजेचं आहे

|| डॉ. जयदेव पंचवाघ

सन १८९० मध्ये केवळ अनुमानाधारित होणाऱ्या या शस्त्रक्रियांना आता साधनांचा नि एमआरआयचा आधार मिळतो..

मणक्यातील डिस्क फाटून आतला भाग घसरल्यामुळे होणारी वेदना किती तीव्र असते हे आपण मागे पाहिलं. अर्थातच यात दुखण्याबरोबरच पायातील स्नायूमधील कमजोरीसारखी इतर अधिक गंभीर लक्षणंसुद्धा दिसू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा आजार अत्यंत कॉमन आहे.. आणि म्हणूनच या लक्षणांचा अर्थ लावण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न माणूस हजारो वर्ष करत आला आहे. विशेषत: मागच्या शतकापासून या आजारावर निश्चित उपचार शोधण्याच्या प्रयत्नांना जोर आला.

 डिस्कच्या अन्यूलस या भागाच्या बाहेरील एकतृतीयांश भागालाच संवेदनेच्या नसांचा पुरवठा असतो हे इथं मुद्दाम नमूद करणं गरजेचं आहे. त्यामुळे डिस्कच्या आतील दोनतृतीयांश भागापासून सामान्यत: वेदना संभवत नाही.

 डिस्कचा मऊ भाग अन्यूलसच्या विणीच्या आतले पदर फाडून दोन पदरांमध्ये पसरतो, तेव्हा हे पदर प्रसरण पावल्यानं कंबरदुखी सुरू होते; शिवाय डिस्कच्या या भागाच्या रासायनिक गुणधर्मामुळे अन्यूलसचा दाह सुरू होतो आणि वेदना वाहून नेणाऱ्या नसांचे तंतू या भागात झपाटय़ाने फोफावतात. इथवर हे दुखणं बहुधा कंबरेपुरतंच मर्यादित असतं. कंबरेत पुढे वाकल्यावर डिस्क बॉलबेअिरगसारखी मागे जाऊन अन्यूलसमधील दाब वाढून हे दुखणं वाढतं. 

अशा परिस्थितीत काही कारणाने डिस्कच्या आतील दाब अचानक वाढला (खाली वाकून जड वस्तू उचलताना, जोरात शिंक किंवा खोकला आल्यास, प्रवासात गाडी/ रिक्षा अचानक खड्डय़ातून जाऊन हादरा बसल्यास.. इ.) तर अन्यूलसच्या विणीचा राहिलेला भागसुद्धा फाटून न्यूक्लिअस बाहेर येतो. या घसरलेल्या भागामुळे एका किंवा अधिक नसांवर दाब येऊन साएटिका किंवा ‘न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन’ कसं होतं ते मागच्या दोन लेखात आपण पाहिलं.

 मागच्या शतकाच्या सुरुवातीला भूलशास्त्र (अनेस्थेशिया), जंतू विज्ञानशास्त्र आणि शरीर – रचनाशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया सुलभ नव्हे तर प्रथमच ‘शक्य’ झाल्या.. त्यात मणक्याच्या शस्त्रक्रियासुद्धा होत्या.

मणक्यातील गाठ काढण्याच्या पहिल्या शस्त्रक्रिया १८९० ते १९१० या काळात केल्या गेल्या. त्या काळात  ‘एमआरआय’ किंवा ‘सीटी स्कॅन’ तर सोडाच; चांगल्या प्रतीचा एक्स-रेसुद्धा उपलब्ध नव्हता, म्हणजेच व्यक्तीच्या लक्षणांवरून (कंबर, मांडी व पोटरीत येणारी कळ वगैरे) आणि शारीरिक तपासणीवरूनच रोगनिदान होई, निष्कर्ष काढावे लागत. या (१९०० ते १९२० अशा) काळात ‘डिस्क घसरल्यामुळे साएटिकाची कळ येते’ याचा अंदाज न्यूरोसर्जनना (चेताशल्यविशारदांना) आला होता.

वॉल्टर डँडी या न्यूरोसर्जनने १९२९ साली साएटिकाची कळ येणाऱ्या चार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली; पण त्यात काढलेली डिस्क ही मणक्यात झालेली कूर्चेची ‘गाठ’ आहे असं त्याला वाटलं.

१९३०च्या दशकात एक्स-रेच्या दर्जात सुधारणा झाली.

शस्त्रक्रियेआधी डिस्क घसरल्याचं पक्क निदान करून वेदनामुक्तीसाठी शस्त्रक्रियेने ती काढण्याची पहिली शस्त्रक्रिया मिक्सटर आणि बार या दोघांनी १९३२ साली केली. यानंतरच्या आजवरच्या काळात शस्त्रक्रियेतील तंत्रामध्ये विलक्षण गतीने शोध लागत गेले आहेत. मणक्याच्या ‘एमआरआय’ तपासणीतसुद्धा अत्यंत अद्भुत आणि वेगाने सुधारणा झाली आहे.

आज रुग्णाची लक्षणं आणि तपासणी यांवरून जे डिस्कच्या व एकूणच मणक्याच्या आजारांचं जे निदान केलं जातं ते ‘सीटी स्कॅन’ आणि ‘एमआरआय’च्या तपासण्यांमध्ये अगदी स्वच्छ आणि अचूक दिसू शकतं.

मात्र कुठल्या स्लिप्ड डिस्कला नेमक्या कुठल्या उपायांची गरज आहे, हे तज्ज्ञ डॉक्टरलाच ठरवावं लागतं हे अगदी नीट समजून घेणं आवश्यक आहे. ते का हे मी पुढे सांगीनच.

न्यूरोसर्जरीतल्या पुढच्या ज्या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांमुळे डिस्कच्या शस्त्रक्रियेत झपाटय़ाने प्रगती झाली ते म्हणजे ‘न्यूरो मायक्रोस्कोप’चा शोध आणि ‘एमआरआय’चा शोध. प्रसिद्ध तुर्की न्यूरोसर्जन मेहमुत गाझी यासारगिल १९६०च्या दशकात उदयाला आला. आधुनिक न्यूरोसर्जरीचा जनक (फादर ऑफ मॉडर्न न्यूरोसर्जरी) म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या डॉ. यासारगिलनं स्वित्र्झलडमधल्या झुरिच च्या रुग्णालयात मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भातील अनेक शोध लावले.

विशेष प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाचा (मायक्रोस्कोपचा) उपयोग करून या नाजूक शस्त्रक्रिया करण्याचं तंत्र त्याने विकसित केलं. १९६७ साली ‘चेतासूक्ष्मदर्शी’ वा ‘न्यूरोमायक्रोस्कोप’चा उपयोग करून कंबरेच्या मणक्यातील घसरलेल्या चकतीचा तुकडा काढून रुग्णाला वेदनामुक्त केलं. ही मणक्याच्या शस्त्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची घटना! न्यूरोमायक्रोस्कोपमुळे महत्त्वाच्या व नाजूक नसा प्रखर प्रकाशात आणि अनेक पटींनी मोठय़ा दिसतात. अर्थातच या शस्त्रक्रिया अधिक परिणामकारक, सुलभ आणि त्वचेच्या लहान छेदातून होऊ शकतात. ही शस्त्रक्रिया ‘मायक्रो -डिस्केक्टॉमी’ म्हणून उदयाला आली आणि अगदी आजतागायत विकसित होत आहे.

पुढच्या, म्हणजे १९७०च्या दशकात फक्त न्यूरोसर्जरीच नाही तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रालाच नवी दिशा देणारा शोध लागला तो म्हणजे ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग – चुंबकीय संस्पंदी प्रतिमाकारक) तपासणीचा. मणक्याच्या एमआरआय चाचणीत मणक्याची हाडं, डिस्क, नसा अत्यंत स्पष्टपणे दिसतात. नेमकी कुठली डिस्क कोणत्या दिशेनं घसरली आहे आणि कुठल्या नसांवर तिचा दाब येतो आहे हे आजच्या एमआरआयमध्ये सुस्पष्ट दिसतं. १९८० पासून एमआरआयच्या दर्जात झपाटय़ानं सुधारणा होत गेली आहे.

१९९० नंतर- खरं तर मुख्यत्वेकरून गेल्या पंधरा वर्षांत- डिस्कच्या काही शस्त्रक्रियांमध्ये एन्डोस्कोप वापरणं शक्य झालं आहे. ही शस्त्रक्रिया- ‘एन्डोस्कोपिक डिस्केक्टॉमी’ – आजही झपाटय़ानं विकसित होत आहे. जर निदान अचूक असेल आणि एन्डोस्कोपमधून करण्यास योग्य शस्त्रक्रिया असेल तर आणि तरच ही बिनटाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वी होते ही त्याची दुसरी बाजू.

‘एन्डोस्कोपिक डिस्केक्टॉमी’मध्ये आज आम्ही रेडिओफ्रिक्वेन्सी आणि लेझर लहरींचा उपयोग करू शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच रुग्णामध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी ठरेल. ‘योग्य प्रकारच्या शस्त्रक्रियेची निवड करणं’ ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे हे नमूद करणं मला अत्यावश्यक वाटतं म्हणून हा मुद्दा मी प्रकर्षांनं मांडत आहे.

न्यूरोस्पाईन विभागात येणारे काही रुग्ण डिस्कवर ‘अमुकच पद्धतीने शस्त्रक्रिया करा’ असा आग्रह आणि कधीकधी हट्टसुद्धा धरतात. याचं मला अनेक वेळा आश्चर्य वाटतं. मला उपचारांनी किंवा शस्त्रक्रियेनं बरं वाटावं अशी रास्त अपेक्षा ठेवणं निश्चितच योग्य; पण शस्त्रक्रियेच्या पद्धतीचा आग्रह धरणं फक्त अयोग्यच नाही तर धोकादायकसुद्धा ठरू शकतं. याचं कारण म्हणजे शस्त्रक्रियेची पद्धत ठरवताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. डिस्क घसरण्याचा प्रकार, दिशा, तिचा मऊपणा किंवा कडकपणा, रुग्णाचं वय आणि वजन, खालच्या व वरच्या मणक्यांमधील बंध खिळखिळा झाला आहे किंवा कसं याचा विचार..  अशा अनेक गोष्टींचा विचार करून शस्त्रक्रियेची पद्धत ठरवावी लागते. तसं केलं नाही तर धोकादायक ठरू शकतं. मला वाटतं ही गोष्ट फक्त मणक्याच्याच नव्हे, तर शरीरातील इतर शस्त्रक्रियांनासुद्धा लागू आहे.

जाता जाता दोन गोष्टींचा उल्लेख गरजेचा वाटतो. पहिली म्हणजे कृत्रिम डिस्क बसवणे (आर्टिफिशियल डिस्क). मूळ डिस्क पूर्णपणे काढून त्याजागी स्प्रिंगसारखी रचना असलेली डिस्क बसवण्याची शस्त्रक्रिया आज उपलब्ध होऊ घातली आहे पण तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. याला अनेक कारणं आहेत. त्यांच्या फार खोलात जाण्याची ही जागा नाही पण भविष्यात या दिशेने काही शोध लागू शकतात हे लक्षात ठेवणं गरजेचं वाटतं.

दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्तीच्या उभं राहिलेल्या अवस्थेत, बसलेल्या अवस्थेत, किंवा पुढे व मागे वाकलेल्या अवस्थेत मणक्याची एमआरआय तपासणी करण्याची क्षमता विकसित होण्याची गरज. आज आपण व्यक्ती झोपलेल्या स्थितीतच एमआरआय करू शकतो. इतर अवस्थांमध्ये डिस्कच्या आकारात होणारे बदल, तिला येणारे फुगवटे इत्यादीचे मूल्यमापन करण्याची दुसरी पद्धत आज उपलब्ध नाही. या प्रकारचं एमआरआय करणारं यंत्र विकसित झालं तर निदान आणि उपचारात आपण फार मोठा पल्ला गाठू हे निश्चित.

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artificial disk history disc surgery vertebral disc pain that occurs akp