तृप्ती मालती / भाऊसाहेब आहेर

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशु अतिदक्षता विभागातील आगीला सहा महिने पूर्ण झाले. या काळात अन्य सार्वजनिक रुग्णालये तरी संभाव्य धोक्यांसाठी सज्ज झाली का, याचा सहा जिल्ह्यांतून घेतलेला हा शोध.. 

महाराष्ट्रातील कोविडची दुसरी लाट अजून संपलेली नाही तोवर तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालेली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा तयारी करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून वाचायला मिळत आहेत. पण अलीकडे अनेक रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगींच्या घटना लक्षात घेता आपल्याला आणखी तयारी करण्याची गरज आहे हे लक्षात येते.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु अतिदक्षता विभागात ८ जानेवारी २०२१ रोजी लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देश हादरला होता. २०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले होते. तथापि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे आग लागल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

फेब्रुवारी २१ मध्ये परभणी जिल्हा रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागातील वरच्या भागात आग लागली. या आगीत तिथे ठेवलेले जुने  फर्निचर वगळता जीवितहानी झाली नाही, हे केवळ सुदैव. या रुग्णालयात आग लागण्याची ही दुसरी वेळ. विशेष म्हणजे या रुग्णालयाचे आग लागण्यापूर्वी फायर ऑडिट झाले होते. फायर ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींकडे रुग्णालय व्यवस्थापनाने लक्ष पुरवले होते का? किंवा, हे असे अडगळीचे सामान अधिक नुकसान करू शकते याकडे फायर ऑडिटमध्ये लक्ष देण्यात आले नव्हते का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.

मार्च २०२१ मध्ये मुंबईच्या भांडुप भागातील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ रुग्णालयाला पहाटे लागलेल्या आगीत दहाजणांचा मृत्यू झाला. त्यापैकी नऊ करोना रुग्ण होते. धुरामुळे गुदमरून त्यांनी प्राण सोडला. तसेच एप्रिल २१ मध्ये विरारमधील विजयवल्लभ कोविड केअर रुग्णालयातील  अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आणि या तीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला झाला.

जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांत दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या या घटना घडल्या. भंडारा येथील आगीनंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय  रुग्णालयांतील अग्निशामक यंत्रणांचे लेखापरीक्षण करून घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार ८० टक्के रुग्णालयांचे अग्निशामक लेखापरीक्षण पार पडल्याचे वाचायला मिळाले.

फायर ऑडिटसारख्या प्रक्रिया किती महत्त्वाच्या आहेत, हे आपण भंडारा व इतरत्रच्या अनुभवांवरून शिकलो आहोत. या रुग्णालयांमध्ये विजेचा वापर अधिक असतो. त्यामुळे तेथील विजेच्या सर्व यंत्रणांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते. तसेच जर वीजवापरामुळे आग लागल्यास अशा तातडीच्या प्रसंगी त्यावर पटकन् उपाययोजना कशा करता येतील यासाठी किमान वर्षांतून एकदा या यंत्रणांचा अग्निशामक विभागाकडून आढावा घेतला गेला पाहिजे आणि त्यानुसार अग्निशामक विभागाकडून या यंत्रणा ‘काम करण्यास योग्य’ असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले असले पाहिजे. जर रुग्णालयात आग लागली तर तातडीने ती विझवण्यासाठी आवश्यक साहित्य, अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वाट दाखवणारे दिशादर्शक, आग लागल्याची सूचना सर्वत्र देणारी अलार्म यंत्रणा इत्यादी सुस्थितीत असणे आवश्यक असते.

सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अग्निशामक यंत्रणा किती प्रभावीपणे कार्यरत आहेत, हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक भागांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमार्फत महाराष्ट्रातील प्रातिनिधिक सहा जिल्ह्यांतील (अकोले, उस्मानाबाद, अमरावती, बीड, अहमदनगर, पुणे) ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय अशा २० रुग्णालयांतील परिस्थिती जाणून घेण्यात आली. सार्वजनिक आरोग्यसेवेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील सेवा देणाऱ्या या रुग्णालयांमध्ये ही सर्व रुग्णालये येतात. ग्रामीण भागातील कष्टकरी, गरीब लोकांना याच सेवेचा आधार असल्याने आरोग्यसेवेसाठी लोक या रुग्णालयांमध्ये येतात. त्यामुळे तिथे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि काम करणारे तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टर व इतर सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा अतिशय कळीचा मुद्दा आहे.

रुग्णालयांत फिरून यातील अनेक मुद्दय़ांची पाहणी करण्यात आली. उदा. आग लागल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्याचे दिशादर्शक, अलार्म, कॉल पॉइंट दिसतात का? अग्निसुरक्षेविषयीच्या सूचना, चिन्हे, साधने दर्शनी भागात लावण्यात आली आहेत का?

या पाहणीत प्रामुख्याने पुढील बाबी समोर आल्या : आग लागल्यावर वाजणारा आवाज (अलार्म) स्पष्टपणे दाखवणारी चिन्हे २० पैकी सहाच रुग्णालयांमध्ये लावलेली दिसली. तर आग लागल्यावर रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी  दर्शनी भागातील खुणा २० पैकी नऊ रुग्णालयांत दिसून आल्या. तसेच अग्निशामक यंत्रणा केवळ पाच रुग्णालयांत नीटपणे कार्यरत असल्याचे निरीक्षणात् दिसून आले.  काही रुग्णालयांमध्ये अग्निशामक सिलेंडर दिसले नाहीत म्हणून चौकशी केल्यावर ‘ते रिफिलिंगला पाठवले आहेत,’ असे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी ही पाहणी चालू असताना कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने, सततच्या पाठपुराव्याने नव्याने हे सिलेंडर बसविण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी अग्निशामक यंत्रणेची नियमित तपासणी होणे, कर्मचाऱ्यांना त्याविषयीचे पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे या पाहणीतून निदर्शनास आले. प्रत्यक्ष निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांतील अग्निशामक यंत्रणा सुधारण्यासाठी निश्चितच वाव आहे. फायर ऑडिट केले असे सांगितले जात असले तरी बऱ्याच ठिकाणी दर्शनी भागात आवश्यक त्या सूचना लावलेल्या नाहीत. अलार्मचा आवाज रुग्णालयाच्या सगळ्या भागांपर्यंत नीट ऐकू येत नव्हता, तर काहींचा आवाजच येत नव्हता. आग-प्रतिबंधासाठी कर्मचाऱ्यांचे जुजबी प्रशिक्षण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे अग्निशामक यंत्रणेची  नियमित तपासणी होत नाही. या यंत्रणा आवश्यक असेल तेव्हा योग्यरीतीने काम करण्यासाठी त्यात सुधारणा होणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आरोग्य विभागाने याची वेळीच दखल घ्यायला हवी. बऱ्याच आरोग्य संस्थांमध्ये विजेच्या तारा (वायर्स) उघडय़ावर लटकत असतात. सॉकेट तुटलेले असतात. तुटलेल्या तारा जुगाड करून जोडलेल्या असतात. ज्या कंत्राटदाराला वायरिंगची कामे दिली जातात तो कोणत्या प्रतीची वायर व इतर साहित्य वापरतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक रुग्णालयांवर फायर ऑडिट पूर्ण करून घेण्याचा दबाव असल्याने ते काम करण्यात आल्याचे दिसले. परंतु अग्निशामक यंत्रणा जर नीट काम करू शकली नाही तर सार्वजनिक आरोग्य रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी नाही. सर्वच रुग्णालयांच्या अग्निशामक यंत्रणा तातडीच्या वेळी योग्य पद्धतीने काम करतील याकडे त्यासाठी लक्ष देणे आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, हे या २० रुग्णालयांच्या पाहणीवरून स्पष्ट समजून येते. शिवाय ज्या ज्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण दाखल केले जातात त्या सर्व संस्थांमध्ये उत्तम प्रकारची अग्निरोधक यंत्रणा तर असायलाच हवी. त्याचबरोबर कंत्राटदार हलक्या प्रतीची वायर वा इतर साहित्य वापरत नाहीत ना, याबद्दलही खबरदारी घेतली गेली पाहिजे.

सध्या कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा आरोग्य यंत्रणेवर आणि विशेषत: सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेने हा ‘अलार्म’ गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. नुसते अग्निरोधक यंत्रणेचे फायर ऑडिट करून चालणार नाही, तर या रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरविणाऱ्या आणि अन्य जीवरक्षक यंत्रणेचीही नियमित तपासणी होऊन त्यांचीही देखभाल व दुरुस्ती व्हायला हवी. तरच ‘मागच्यास ठेच, पुढचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे आपण वागू शकू.

लेखक आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.

truptj@gmail.com  bhausahebaher@gmail.com