चंद्रकांत काळे

स्वत:ला केवळ गायक म्हणवून घेणं अशी तुमची योग्यता नसतेच कारण ही योग्यता दहा-बारा गाण्यांनी मिळवताच येत नाही ना? स्वत:च्या मागे पंडित किंवा गायक लावणं ही मला मोठी तपस्या वाटते. पण कधी कधी नियती तुमच्याबरोबर कल्पनेपलीकडचे खेळ खेळते. तुमची मस्त थट्टा-मस्करी करते. कलावंत म्हणून तुमच्यावर वाकडे तिकडे फराटे मारण्याची आचरट लहर तिला येते. नियती तुमचं बोट धरून खेचत खेचत तुम्हाला एका स्टुडिओच्या माइकसमोर उभं करते. काचेबाहेर तमाम वाद्यमेळ जमलेला असतो. त्यांचे आवाज एकमेकात मिसळतात. रेकॉर्डिग रूममध्ये पं. हृदयनाथांचा प्रवेश होतो. माइकसमोर आपण जत्रेत हरवलेल्या मुलासारखे पण उसनं बळ आणून उभे असतो. रवींद्र साठे येतात. मनाला थोडी उभारी. आम्ही दोघे एक माइकवर असतो आणि शेजारच्या माइकवर अवतरतात स्वरांच्या लोभस साम्राज्याच्या सम्राज्ञी साक्षात लता मंगेशकर. एक तालीम होते आणि ते गाणं ध्वनिमुद्रित होतं. ते गाणं असतं, ‘मी रात टाकली – मी कात टाकली’ चित्रपट असतो ‘जैत रे जैत’. आणि तुमचा आवाज जन्मभर त्यांच्या या गाण्याबरोबर जोडला जातो.  त्या निमित्ताने ‘प्रभुकुंज’वर जाणं, पंडितजींनी घेतलेल्या तालमी. कधी माफक का होईना पण दीदींशी संवाद होणं, या सगळय़ा अशक्य आणि अविश्वसनीय गोष्टी घडतात. रेकॉर्डिगनंतर त्या जाता जाता म्हणतात, ‘छान सुरेल कोरस झाला.’ मी मनातल्या मनात पुन्हा ठार होतो. अशा घटना का घडवत असेल नियती? मी विचार करत नाही. पुढे उभा जन्म तुम्हाला मिरवता यावं आणि कायम तुम्ही कलाभ्रमात भटकावं म्हणून असेल कदाचित ही प्रारब्धखेळी. लतादीदींसारख्या स्वरयुग घडविणाऱ्या गानसम्राज्ञीच्या जाण्यानंतर त्याविषयी प्रतिक्रिया देण्याइतपत समोरच्या व्यक्तीत पात्रता असावी लागते, असा माझा प्रामाणिक समज आहे. तशी ती माझी नाही हेही मला व्यवस्थितच माहिती आहे. पण तरी त्यांच्या जाण्यानं काही तरी हादरा बसतो. काही तरी सच्चं कायमचं संपून गेल्यासारखं वाटतं. अशी देदीप्यमानता आयती, काही कष्ट न करता अनुभवण्याची चैन संपल्यानं विकल व्हायला होतं आणि हे मानवी आहे. याला मात्र पात्रतेची गरज नाही. जे कुणीही अनुभवू शकेल कदाचित. मला हेही कमी भाग्याचे वाटत नाही. माझ्या जन्मापासून मी या लखलखीत स्वर-युगात स्वच्छंद बागडत होतो, जगण्यासाठीचा आवश्यक आणि सौंदर्यानं बहरलेला श्वास मी घेत होतो, या विषयी मात्र मला अपार-अमर्याद आनंद आणि अभिमान वाटतो – वाटत राहणार. त्या अजिंक्य स्वराला मन:पूर्वक आदरांजली!