scorecardresearch

साम्ययोग : गीतेचे विनम्र भाष्यकार

तुकोबांच्या नावावर ‘मंत्रगीता’ आहे. तिच्याविषयी भिन्न मते असली तरी तुकोबांचे गीताप्रेम नि:शंक होते.

– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

‘‘अतस्तेद्विवरणे यत्न: क्रियते मया’’

(गीतेचे) विवरण करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

– आद्य शंकराचार्य

तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें ।

मियां उन्मेषें ठसेंठोंबसें ।

जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥ १५.५९४ ॥

-ज्ञानेश्वर.

‘मी’ कोठेच नसावा. नम्रतेच्या उंचीला माप नाही. (गीताईमध्ये) 

– विनोबा.

गीताईवर आद्य शंकराचार्य आणि संत ज्ञानेश्वर यांच्या चरित्रांचा ठसा आहे. आचार्याचे गीताभाष्य आणि ज्ञानेश्वरी यांना परमोच्च स्थान देऊन गीताईने सुलभ रूप धारण केल्याचे दिसते. भाष्यकारांच्या या त्रयीने गीतेवर आपल्या कृती साकारताना नम्रता जराही सोडली नाही. आपण कोणत्या ग्रंथाचे विवरण करतो आहोत याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.

शंकराचार्य आपल्या भाष्य ग्रंथांमध्ये स्वत:चा उल्लेख ‘एवं प्राप्ते ब्रूम:’ असा बहुवचनाने करतात. ज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार पाहता ते योग्यही म्हणायला हवे. तथापि हेच शंकराचार्य गीतेवर भाष्य करतात तेव्हा ‘गीतेचे विवरण करण्याचा मी प्रयत्न केला आहे,’ असा लीनभाव राखतात. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर ‘गीतेचे विवरण करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला गेला आहे,’ असा तो शब्दप्रयोग आहे.

आचार्याना, एखाद्या अभ्यासकापेक्षा गीतेचे थोडेसे अध्ययन करणारी, तिचे आणि विष्णुसहस्रनामाचे नित्य पठण करणारी, व्यक्ती अपेक्षित आहे. ‘भगवद्गीता किञ्चिदधीता’ अशी स्थिती असली की ‘यमे कुळगोत्र वर्जियेले’ अशी परिस्थिती निर्माण होते, असा आचार्यानी निर्वाळा दिला आहे.

मराठी संस्कृती ज्यांच्या शब्दाबाहेर नाही त्या‘ग्यानबा-तुकोबां’ची गीतेविषयीची भावना काय होती. मी भाष्यकारांना विचारत, समजले त्या मराठी भाषेत, ओबडधोबड पद्यरचना करत समजला तसा गीतार्थ सांगितला आहे. हे वर्णन गीतेची थोरवी आणि माउलींची नम्रता दाखवणारे आहे.

तुकोबांच्या नावावर ‘मंत्रगीता’ आहे. तिच्याविषयी भिन्न मते असली तरी तुकोबांचे गीताप्रेम नि:शंक होते. वेदांचा अर्थ काय असे एकदा गांधीजींनी विनोबांना विचारले. ‘या युगातला वेदांचा अर्थ काय?’ विनोबा उत्तरले

‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाची साधिला ।।

विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ।।

असा अर्थ आहे’’ विनोबांच्या या उत्तरातून तुकोबांचा अधिकार समजतो. या तुकोबांनी लेकीच्या लग्नात हुंडा म्हणून गीता दिली. गीतेच्या ‘व्यावहारिक’ उपयोगाची ही चरम सीमा म्हणायची.

हाच कित्ता गांधीजींनी  गिरवला. आश्रमात एखादा उत्सव झाला तर आश्रम भजनावली, स्वत: कातलेले सूत आणि गीता अशी भेट ते देत असत. गांधीजींना संपूर्ण गीता पाठ नव्हती. तुकोबा काय किंवा बापूजी काय यांनी आपल्या चरित्रातूनच गीतेवर भाष्य केले. याचा अर्थ निव्वळ आचरणातून गीतार्थ गवसतो.

विनोबा याच मालेचा पुढचा टप्पा. सबंध गीताईमधे कुठेही ‘मी’ नाही. नम्रतेची महती ते कोणत्या पातळीवर जाणत होते याचा उल्लेख वर आलाच आहे. गीतेचा अर्थ जाणून घ्यायचा तर श्रद्धा हवी. अर्थ लावायचा तर नम्रता हवी. या दोन्ही पातळय़ांवर आचरणाची जोड हवी. गीतेपासून गीताईपर्यंत ही त्रिसूत्री दिसते. तिच्या अभावी गीताच काय पण कोणताही सद्विचार टिकणार नाही.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave thoughts bhagavad gita zws

ताज्या बातम्या