मराठी शब्दांच्या व्युत्पतीचा विचार करताना फारसीकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. साधारण पाच शतके महाराष्ट्रात मुख्यत: मुस्लिमांनीच राज्य केले. ते तुर्की, अफगाण, इराणी, पठाण, अरब, मुघल इत्यादी विभिन्न वंशांचे असले तरी सर्वाची राज्यकारभाराची भाषा कायम फारसी हीच राहिली. कारण इराणचे (पर्शियाचे) साम्राज्य त्या परिसरात सर्वाधिक सामर्थ्यवान होते व फारसी ही त्यांची भाषा होती. प्रदीर्घ संपर्कानंतर मराठीवर फारसीचा खूप प्रभाव पडणे स्वाभाविक होते. कारण शेवटी ती जेत्यांची भाषा होती. साहजिकच आवाज, इशारा, एल्गार, खंजीर, गर्दी, इमारत, इनाम, तारीख, परवाना, तहसील, तपास, अर्ज, मोबदला, मिळकत, बिदागी, गुलाम, आजार, इलाज, अत्तर, अंजीर, पैदास, नगारा, तमाशा, ख्याल असे असंख्य फारसी शब्द मराठीने पूर्णत: स्वीकारले. माधवराव पटवर्धन यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ किंवा यू. म. पठाण यांचा ‘फार्सी-मराठी अनुबंध’ हा ग्रंथ याची साक्ष पटवायला पुरेसा आहे. 

संस्कृतमधून आले असतील असे वाटणारे अनेक मराठी शब्दही मूळ फारसी आहेत. उदाहरणार्थ, ‘जोष’ आणि ‘त्वेष’. संस्कृतात त्यांचा अर्थ अनुक्रमे ‘आनंद’ आणि ‘चकचकित’ असा आहे. फारसीतील ‘जोश’ आणि ‘तैश’ या शब्दांचा अर्थ मात्र मराठीप्रमाणेच ‘आवेश’ आणि ‘त्वेष’ हा आहे आणि त्याच अर्थाने ते फारसीमधून मराठीत आले आहेत.

कधी-कधी फारसी शब्द अर्थबदल होऊन मराठीत आले. उदाहरणार्थ, ‘दंगल’ हा मूळ फारसी शब्द. या नावाचा चित्रपट आमिर खानने बनवला. लोकप्रियतेचे सर्व तत्कालीन विक्रम मोडणारा. हरयाणातील कुस्तीगीर फोगट कुटुंबाची ती कहाणी. तिला ‘दंगल’ हे नाव का दिले, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कारण मराठीत दंगल हा शब्द ‘दंगा’ या अर्थाने वापरला जातो, कुस्तीशी त्याचा अजिबात संबंध नाही. पण मुळात दंगल हा फारसी शब्द असून ‘कुस्तीचा आखाडा’ असाच त्याचा अर्थ आहे व तोच आमिर खानने प्रमाण मानला.

-भानू काळे

bhanukale@gmail.com  

(((< सुरेश खोपडे यांचे मराठी पुस्तक व आमिर खानचा चित्रपट यांतील ‘दंगल’चा अर्थ निरनिराळा!