अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा देश सम्राटांचा वा राजांचा नाही. तो संतांचा आहे. या देशातील एक पाऊलभर भूमी अशी नाही की जिच्यावर संतांचे पाऊल पडले नाही. हा देश जोडला आणि एकसंध ठेवला तो संतांनी. ही विनोबांची भूमिका होती. याही हेतूने त्यांनी मराठी संतपंचकांप्रमाणे अखिल भारतीय पातळीवरील संतांच्या शिकवणीचे सार काढले.

उत्तर भारतात, तुलसीदास आणि त्यांचे रामचरितमानस यांना अनन्यसाधारण स्थान आहे. विनोबांनी ‘मानसा’वर एक सुंदर लेख लिहिला. तो ‘मधुकर’ या त्यांच्या पुस्तकात आहे. ‘तुलसीदासांची बालसेवा’ असाही एक लेख आहे. रामचरित मानसात लहान मुलांना समजतील असे किती शब्द प्रयोग आहेत याची त्यांनी नोंद केली आहे. त्यामुळे मानस लहान मुलांसाठी आहे हे ध्यानात येते. हा लेख ‘जीवन दृष्टि’ या पुस्तकात आहे. ‘बायबल आणि शेक्सपिअर यांचा संगम म्हणजे मानस’ हे रामचरित मानसाचे त्यांचे आकलनही फार सुंदर आहे.

तथापि त्यांनी तुलसीदासांच्या शिकवणीचे सार ‘विनयांजली’ या नावाने सिद्ध केले. तुलसीदासांची ‘विनय पत्रिका’ म्हणजे विविध देवतांची स्तवने होत. विनयांजली हा त्यांचाच सारांश आहे. म्हणजे तुलसीदासांची भजनेच म्हणायची.

 त्यांनी कबीर महाराजांवर खूप लिहिले आहे फक्त त्याचा एकत्र संग्रह नाही. तुकोबा वाचले की कबीर आपोआप मिळतो ही त्यांची धारणा यामागे असावी. तथापि ‘कबीराने स्पर्श केला नाही असे जीवनाचे एकही क्षेत्र नाही,’ ही त्यांची भूमिका कबीर महाराजांची महती नेमकेपणाने नोंदवते. ‘बीजक’ त्यांचा आदर्श होता. टिळकांसोबत झालेल्या एकमेव चर्चेत, ‘तुम्ही कबिराचा बीजक वाचला आहे का?’ असे विचारले होते.

विनोबा आणखी एका संताला  शरण गेले. गुरू नानकदेव. शिखांचा जपुजी त्यांनी संपूर्ण संपादिला. त्यांच्या मते तो शिखांचा ‘हरिपाठ’ होय. प्रायोपवेशनाच्या टप्प्यावर त्यांना शीख गुरूंच्या उपदेशाचे स्मरण झाले. शीख धर्माची शिकवण ‘निरभय निरवैरु’ अशी आहे. विनोबांनी त्यात ‘निष्पक्ष’ची जोड दिली.

आसामच्या शंकरदेव आणि माधवदेवांची महाराष्ट्राला विनोबांनीच ओळख करून दिली. या संतद्वयीला ते आसामचे ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत.

त्यांच्या शिकवणीचे विनोबांनी ‘नामघोषा नवनीत’ या नावाने संपादन केले. यात माधवदेवांची शिकवण असली तरी शंकरदेवही येतात.

माधवदेवांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की ‘गुणनिवेदनम्’ ही माधवदेवांची शिकवण त्यांनी जीवनादर्श म्हणून अंगीकारली होती. म्हणजे स्वत:सह इतरांचे फक्त गुण पहायचे. गीता प्रवचनांची अखेर संत दादूंच्या वचनाने झाली आहे.

नामदेव आणि शीख धर्म, एकनाथ आणि तुलसीदास, तुकोबा आणि कबीर, ग्यानबा- तुकाराम आणि शंकरदेव-माधवदेव कबीर आणि तुकोबा, हरिपाठ आणि जपुजी असे ऐक्य त्यांनी दाखवले. लल्ला, मीरा, मुक्ता, अक्का, आणि अंडाळ या संतांकडे त्यांनी महिलांचे नेतृत्व दिले. यात संपूर्ण भारत येतो. अशा रीतीने त्यांनी देशाची जोडणी केली. मराठी मुलखाला व्यापक संतदर्शन घडवले.

हा संतकेंद्री इतिहास अनोखा आहे तो साम्ययोगाचा पायाही आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saint story of vinoba bhave vinoba bhave books zws
First published on: 13-01-2022 at 01:01 IST