या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि नि:स्पृह

अहंता ममता गेली झ़ाला तो शांति-रूप चि।  

                                             – गीताई अ. २

ब्रह्म शब्दाचा धातू आहे ‘बृह’. त्याचा अर्थ व्यापक होणे असा आहे. वेदांमध्ये गूढ शक्ती असणारे तत्त्व उपनिषदांच्या काळात ‘व्यापक’ झाले असे म्हटले जाते. थोडक्यात ब्रह्म म्हणजे अत्यंत व्यापक असे तत्त्व. त्याचा आविष्कार नेहमी पवित्र मानला जातो. विनोबांच्या, शिवाजीराव भावे लिखित चरित्रात त्यांचा जीवनपट सहा टप्प्यांमध्ये आला आहे.

‘ब्रह्मचर्य, ब्रह्मजिज्ञासा, ब्राह्मीस्थिती, ब्रह्मविहार, ब्रह्मविद्या मंदिर, ब्रह्मनिर्वाण’ असे हे सहा टप्पे आहेत. विनोबांच्या चरित्रात हे टप्पे प्रमुख आहेत. प्रत्येक टप्प्यावर ‘ब्रह्म’ येते. व्यापकतेला कवटाळण्याची विनोबांची उत्कट इच्छा या ‘ब्रह्म’ शब्दात नेमकी प्रकट होते.

अगदी सोप्या भाषेत हे टप्पे सांगायचे तर आजन्म संपूर्ण संयम, अध्यात्म विद्येची ओढ, व्यापक लौकिकात वावरणे, या विद्येची साधना करू इच्छिणाऱ्यांचा समूह उभारणे आणि एक दिवस व्यापक तत्त्वात कायमचे विसावणे. हे सगळे पैलू एकत्रित पाहिले की विनोबांचे चरित्र समजते. तपशील माहीत असतील तर ठीक, पण त्यावाचून फारसे अडत नाही. विनोबांच्या समग्र जीवनातून साम्ययोग साकारला आहे. इथे त्यांच्या साधनेच्या पहिल्या टप्प्याचा विचार करायचा आहे. हा अर्थातच गांधीजींकडे येण्यापूर्वीचा काळ आहे. मुंज होण्यापूर्वीच म्हणजे साधारणपणे सहाव्या-सातव्या वर्षी त्यांनी आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली. पुढील आयुष्यात त्यांना या प्रतिज्ञेची साधी आठवण ठेवण्याचीही गरज भासली नाही इतके ब्रह्मचर्य त्यांच्या अंगवळणी पडले होते.

वडिलांनी विवाहाची बोलणी सुरू केली आणि विनोबा सावध झाले असणार. त्यांचे स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीच्या वडिलांनी नरहरपंतांना स्पष्टपणे सांगितले, ‘असे धगधगीत वैराग्य मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. हा मुलगा कधीही लग्न करणार नाही.’ वडिलांना या गोष्टीची कल्पना असणारच. लौकिक शिक्षणात या मुलाचे मन रमण्याची शक्यता नसली तरी आईवडिलांकडून तो संस्कार घेत होते. शास्त्रग्रंथांचे परिशीलन करत होता. त्याप्रमाणे आचरणही करत होता. क्रांतिकारक होऊन देशसेवा करण्याची आपली महत्त्वाकांक्षा मात्र त्याने गुप्त राखली होती. शेवटी निर्णय झाला आणि त्याने बंगालऐवजी हिमालयास पसंती दिली. गृहत्यागानंतर वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांची मन:स्थिती नेमकेपणाने आली आहे. ‘‘..मी प्रवासास जात आहे. माझी काळजी करूं नये; प्रवासाशिवाय शिक्षणाची पूर्तता होत नाहीं असें पाश्चात्त्य शिक्षणशास्त्रज्ञांचेंही मत आहे. माझा हा प्रयत्न इतरांना जरी कोणाला पसंत पडला नाहीं तरी निदान ‘दासबोधाला’ तरी नक्की पसंत पडेल’’

वडिलांना वाटले की सगळी मुले कुठे तरी फिरायला गेली असावीत, तथापि आपण आता काशी क्षेत्री आहोत हेही विनोबांनी सांगितले. आपण संसार सोडला असेही त्यांनी कळवले. काशीला जाऊन आल्यावर काही तरी सोडण्याची प्रथा आहे. विनोबांनी सरळ संसारच सोडून दिला. त्याच पत्रात ‘ब्रह्मजिज्ञासा’ हे एकमात्र ध्येय असल्याचेही त्यांनी कळवले होते. काशीमध्ये विनोबांनी जे अनुभवले त्यातून अध्यात्माकडे पाहण्याची त्यांची वेगळी दृष्टी ध्यानात येते.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog mukkaam brahmajijnasa spirit of the word meaning extensive ysh
First published on: 07-04-2022 at 00:02 IST