scorecardresearch

साम्ययोग : मंत्राचे मनन

गांधीजींच्या नंतर त्यांच्या कल्पनांना विनोबांनी नेहमीप्रमाणे मूर्तरूप दिले त्यामध्ये ‘जय जगत्’चाही समावेश होता.

अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

भारताला आणि जगाला मान्य व्हावा, असा मंत्र विनोबांनी दिला. तो मंत्र म्हणजे ‘जय जगत्’. ‘मननात त्रायते इति मंत्र:’ अशी मंत्र शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. मनन केल्यावर तारतो तो मंत्र. ही ताकद ‘जय जगत्’मध्ये आहे. ही घोषणा कशी प्रत्यक्षात आली त्याची एक गोष्ट आहे.

भूदान यात्रा १९५७ मध्ये अगदी जोशात होती. विनोबांची पदयात्रा कर्नाटकातील, तुमकुर जिल्ह्यात पोचली. तिथल्या ‘कडवा’ गावात विनोबांनी ‘जय जगत्’ हा घोष पहिल्यांदा दिला. आज हा नारा म्हणजे विनोबांची अतूट ओळख आहे.

खरे तर ‘जगताचे समग्र ऐक्य’ हा विचार महात्मा गांधींचा होता. त्यांनी, दुसऱ्या महायुद्धानंतर, ‘हे जग एक झाले नाही तर किमान मी तरी तिथे राहणार नाही,’ असे स्वच्छपणे सांगून टाकले होते. गांधीजींच्या नंतर त्यांच्या कल्पनांना विनोबांनी नेहमीप्रमाणे मूर्तरूप दिले त्यामध्ये ‘जय जगत्’चाही समावेश होता.

पुढे विनोबांनी आपल्या स्वाक्षरीत, या घोषणेचा समावेश केला. भविष्यात, ‘जय भारत’ किंवा कोणत्याही एका देशाच्या जयजयकाराने काम होणार नाही तर अखिल विश्वाचा जयजयकार करावा लागेल, असा विनोबांचा विचार होता. त्यांची कृतीही विचाराला साजेशीच राहिली. विनोबांनी १९५८ मध्ये या अनुषंगाने एक पुस्तकही लिहिले.

श्रीविष्णुसहस्रनामामध्ये पहिल्याच ‘विश्वम्’वर टिप्पणी करतानाही, त्यांनी जय जगत्’चा संदर्भ दिला आहे. वेद, उपनिषदे, पसायदान, संत परंपरा आणि सर्वोदय, असा व्यापक समन्वय त्यांनी ‘जय जगत्’मध्ये साधला. विचार-समन्वयाच्या त्यांच्या कार्यात या मंत्राला मोठे स्थान आहे.

विजय दिवाण लिखित ‘विनोबा चरित्रा’त हा घोष अत्यंत नेमकेपणाने उलगडून दाखवला आहे. दिवाण, ‘जय जगत्’ला एक मंत्र मानतात. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘शासनमुक्त अहिंसक समाजरचना निर्माण व्हावी म्हणून विनोबांनी अनेक विचार मांडले. त्यासाठी त्यांनी काही योजना आणि कार्यपद्धतीही आखून दिली. मात्र त्यांच्या विचारांचे सर्व सार, त्यांनी लिहिलेल्या ‘जय जगत्’ या मंत्रात आहे.’

‘जय जगत्’ हा मंत्र म्हणजे विनोबांचा संदेश आहे, उपदेश आहे, आदेश आहे. ‘जगाला संदेश, भारताला उपदेश आणि आपल्या अनुयायांना आदेश’.

विनोबांचे चरित्रकार स्व. शिवाजीराव भावे यांनी गांधी-विनोबांचा विचार थोडय़ा वेगळय़ा शब्दांत सांगितला आहे.

‘पू. विनोबाजींनीं तर सत्य, सेवा, संयम ही जीवनाची त्रिसूत्री सांगितलेली आहे. त्या दृष्टीनें विरोधकांची, दुष्टांचीही सेवा करावयाची, दुष्टतेशी सहकार करावयाचा नाहीं. हृदय-परिवर्तन, परिस्थिति-परिवर्तन आपलें व सर्वाचें सेवेनें करावयाचें हेच गांधी-विनोबांचें सांगणें होते.’ : विनोबा-जीवन-दर्शन ले. शिवाजी न. भावे (आबा)

स्थितप्रज्ञ लक्षणांचा प्रसार घरोघरी व्हावा अशी विनोबांची इच्छा होती. तथापि ते म्हणत, ही लक्षणे चित्तात ठसली की बाहेर आपोआप जातील. हेच तत्त्व ‘जय जगत्’ या घोषाला लागू आहे. मंत्राचाही तोच अर्थ आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinoba s pad yatra jai jagat campaign by vinoba bhave zws

ताज्या बातम्या