गेली १४ वर्षे आपल्या चौफेर फटकेबाजीने जगभरातील मातब्बर गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी’व्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मैदानावर सातत्याने नावीन्यपूर्ण कौशल्याची कला फक्त डी’व्हिलियर्सला अवगत होती. किंबहुना यामुळेच त्याला ‘मिस्टर ३६०’ (कोणत्याही दिशेला फटकेबाजी करू शकणारा फलंदाज) या नावाने ओळखले जायचे.दक्षिण आफ्रिकेतील डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीची सुरुवात २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याने झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेतील डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीची सुरुवात २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याने झाली. प्रारंभीच्या काळात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डी’व्हिलियर्सने त्यानंतर फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यास सुरू केले. २००७ मधील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याने संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. याच स्पर्धेत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना १३० चेंडूंत १४६ धावा काढल्या होत्या. २००८ पासून डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील सुवर्णकाळाला सुरुवात झाली. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावताना त्याने दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात युवा द्विशतकवीर होण्याचा मान मिळवला. पुढे २०११च्या विश्वचषकात त्याने सलग दोन सामन्यांत शतक ठोकून आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. याच वर्षी त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.  २०१५ मध्ये त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक (१६ चेंडू), वेगवान शतक (३१ चेंडू) आणि दीडशतक (६४ चेंडू) यांसारखे विक्रम आजही त्याच्याच नावावर आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही विक्रम त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केले. डी’व्हिलियर्सच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला २०१५चा विश्वचषक जिंकण्याची संधी होती, मात्र पुन्हा एकदा त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला व असंख्य चाहत्यांचे डी’व्हिलियर्सला विश्वचषक उंचावताना पाहण्याचे स्वप्न अधुरे राहिले. एखाद्या युवा खेळाडूला हेवा वाटेल, असे डी’व्हिलियर्सचे क्षेत्ररक्षण होते.

काही आठवडय़ांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीमारेषेजवळ त्याने उंच उडी घेत एकहाती झेल घेतला आणि क्रिकेटजगताला थक्क केले. त्यामुळेच स्पायडरमॅन हे आणखी बिरुद त्याने सार्थक ठरवले. अशा या अवलियाने कारकीर्दीच्या उच्च शिखरावर असताना घेतलेली निवृत्ती ही क्रिकेटविश्वासाठी धक्कादायकच म्हणता येईल.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ab de villiers south african cricketer
First published on: 25-05-2018 at 02:45 IST