गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या टीमविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अजित पै यांची अमेरिकेतील संचार आयोगाच्या प्रमुखपदी नियुक्ती करून तेथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात निर्वासितांना त्यांच्या देशांत परत पाठवण्याची भाषा ट्रम्प यांनी केली होती. म्हणूनच पै यांच्या नियुक्तीला महत्त्व प्राप्त होते.

एका विशेष कायद्याद्वारे संचार आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ही एक स्वतंत्र यंत्रणा असून सर्व जिल्ह्य़ांतील रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्या, उपग्रह, केबल सेवांचे नियंत्रण करणे ही आयोगाची मुख्य जबाबदारी असते. शिवाय ब्रॉडबॅण्ड, माध्यमे, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांवरही आयोगाला लक्ष केंद्रित करावे लागते. आयोगात १७०० कर्मचारी कार्यरत असून त्याचे वार्षिक अंदाजपत्रकही ४० कोटी डॉलरच्या घरात असते. अशा आयोगाचे प्रमुखपद पै यांना मिळाले आहे.

न्यू यॉर्कमधील बफेलो भागात १० जानेवारी १९७३ रोजी जन्मलेल्या अजित यांनी हार्वर्ड विद्यापीठातून बीए ऑनर्सची पदवी मिळवली. नंतर ते शिकागो येथे गेले. तेथील विद्यापीठातून त्यांनी विधि शाखेतील पदवी मिळवली. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हणून ते विद्यापीठात ओळखले जात. यामुळेच विद्यापीठातर्फे काढण्यात येणाऱ्या लॉ रिव्ह्य़ूच्या खंडांचे संपादकपद त्यांच्याकडे चालून आले होते. पदवी मिळाल्यानंतर अजित यांनी अमेरिकेच्या विविध न्यायालयांत तसेच न्याय विभागात जबाबदारीची पदे भूषविली. १९९६ मध्ये अमेरिकेचा दूरसंचार कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या सुलभ अंमलबजावणीसाठी सरकारने एक विशेष कृती दल स्थापन केले होते. तेथे त्यांनी अत्यंत कौशल्याने आपली जबाबदारी पार पाडली. तेथून ते व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स नावाच्या एका कंपनीत बडय़ा पदावर रुजू झाले; पण तेथे ते फार काळ रमले नाहीत. पुन्हा न्याय विभागात आले. विविध विषयांतील कायद्यांची त्यांना सखोल माहिती असल्याने २०१२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी संचार आयोगाचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. माझा जन्म जरी इथलाच असला तरी माझ्या कुटुंबाची मुळे भारतात रुजलेली आहेत. ४३ वर्षांपूर्वी माझे आईवडील १० डॉलर आणि एक रेडिओ घेऊन अमेरिकेत आले होते. आता रेडिओ, टीव्ही, वाहिन्या यांच्याशी संबंधित आयोगात काम करण्याचा आनंद वेगळाच आहे, असे पै तेव्हा म्हणाले होते. आधुनिक जगात ब्रॉडबॅण्डला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी आजही अनेक अमेरिकी नागरिक यापासून दूर आहेत. त्यांच्यासाठी आता मला काम करायचे आहे, असे ते म्हणतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते आहेत. वृत्तपत्रांतील पत्रकार काही घटनांचे वृत्तांकन करतात, तर काही घटनांना ते स्पर्शही करीत नाहीत. हे असे का होते यासाठी काही संशोधकांना वृत्तपत्रांत पाठवावे, असे संचार आयोगाने ठरवले तेव्हा पै यांनी त्यास विरोध केला होता. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर र्निबध आणणे चुकीचे आहे, असे त्यांनी ठामपणे तेव्हा सांगितले होते.  मोबाइल फोनचे जाळे अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न करण्याचेआश्वासन पै यांनी दिले आहे. निक्की हेले, सीमा वर्मा आणि प्रीत भरारा यांच्यानंतर अजित पै या चौथ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीस प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे.