चित्रपट-समीक्षेसाठी २००८ सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (स्वर्णकमल) आणि त्याच वर्षी, लघुपट विभागात ‘बलिया पितैर सोहोकी सोतल’ या लघुपटासाठी ‘रजतकमल’ अशी दुहेरी कामगिरी करणारे अल्ताफ मझीद रिजा हे पुरस्कारांच्या पलीकडले, आसामच्या मातीत रुजलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘जयमती’ हा १९३५ सालचा पहिलावहिला असमिया चित्रपट २००१ साली ‘डिजिटल’ स्वरूपात जतन करण्याचे श्रेय त्यांचेच! आसामातील निवडणुकांची धामधूम सुरू असताना बेंगळुरू येथे १३ एप्रिल रोजी मझीद यांचे अवघ्या ५९व्या वर्षी झालेले निधन, ही बातमी मात्र दुर्लक्षितच राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मझीद यांचे १२ लघुपट जरी गाजले, देशाचे त्यांच्याकडे लक्ष गेले; तरी कुठे गाजावाजा व्हावा किंवा कुणाच्या नजरेत भरावे ही त्यांच्या जगण्यामागची प्रेरणा कधीच नव्हती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर, आसामच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी सांभाळूनच त्यांची चित्रपट-कारकीर्द सुरू होती. जागतिक चित्रपट आणि असमिया चित्रपट यांविषयीचे त्यांचे लिखाण १९८०च्या दशकापासून प्रकाशित होऊ लागले, पण त्याच वेळी राज्यभर कामानिमित्त त्यांची भ्रमंती सुरू असे. आसामातील सध्याच्या लोकजीवनाची नस त्यांना पकडता आली, ती या नोकरीमुळेच. त्यातही, लोकजीवनातील जे अंश लयालाच जात आहेत, अस्तंगत होत आहेत, ते स्वत:च्या लघुपटांतून धरून ठेवण्याकडे त्यांचा कल होता. चित्रपटांखेरीज त्यांचा आणखी एक छंद म्हणजे जनप्रिय कादंबऱ्यांचे वाचन! केवळ फ्रेडरिक फोरसिथ किंवा जॅक हिगिन्स यांची इंग्रजी खूपखपाऊ पुस्तकेच नव्हेत, तर कोपऱ्यावरच्या वाचनालयात मिळणाऱ्या असमिया भाषेतील गुप्तचर कथाही ते आवडीने वाचत. ‘इफ्फी’पासून ‘मिफ’पर्यंतच्या अनेक लघुपट-महोत्सवांना ‘ज्युरी’ म्हणून निमंत्रण आल्यास ते आवर्जून जात आणि पाहिलेल्या लघुपटांवर भरपूर चर्चाही करीत.

‘ब्यक्तिगत अरु गोपनीय’ हा त्यांनी १९९२ मध्ये बनविलेला पहिला लघुपट कथात्म होता. पुढेही ‘जीबन’ (१९९८) आणि ‘लास वेगासात’ (२००४) असे आणखी दोन कथात्म लघुपट त्यांनी केले. ‘जीबन’ (१९९८) आणि ‘लास वेगासात’ (२००४) असे आणखी दोन कथात्म लघुपट त्यांनी केले. ‘लखतोकियात गोलाम’ (२००१) हा लघुपट मात्र कथाही न सांगणारा आणि ‘माहितीपट’ अजिबात नसणारा- किंबहुना बाहेरच्या जगाकडे पाहण्याऐवजी अंतर्मुखतेने आत पाहणारा, असा होता. ‘अवर कॉमन फ्यूचर’ आणि ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ हे सामाजिक विषयांवरले लघुपट असले, तरी कोणत्याही विषयामागल्या कथा आणि मनोव्यापार यांचा वेध घेण्याकडे त्यांच्या लघुपटांचा कल होता. यापैकी ‘भाल खबर’ (२००४), ‘क्रेझी ऑन दर रॉक्स’ (२००७), ‘कुनीर कुटिल दोष’ (२००८) हे लघुपट कमीअधिक प्रमाणात नावाजले गेले, पण नदीचे आणि नदीपालक देवाचे गाणे मांडणारा ‘बलिया पितैर सोहोकी सोतल’ राष्ट्रीय स्तरावर बाजी मारून गेला.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Altaf mazid rija
First published on: 27-04-2016 at 05:07 IST