मार्टिन जे. शेर्विन

जपानवर अणुबॉम्ब टाकण्याबाबतच्या सार्वत्रिक समजास त्यांनी छेद दिला

दुसरे महायुद्ध संपुष्टात आणण्याचा एकमेव उपाय म्हणून जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आल्याचा सार्वत्रिक समज आहे. त्यास अनेकांनी छेद दिला. त्यापैकी एक प्रतिभावंत म्हणजे मार्टिन जे. शेर्विन. त्यांचे नुकतेच निधन झाले.

मार्टिन हे अण्वस्त्रप्रसार संशोधक आणि आण्विक इतिहासकार. अणुऊर्जा, अण्वस्त्रप्रसार आणि त्याचा अमेरिकेसह जगाच्या इतिहासावरील परिणाम हा त्यांचा आवडता विषय. डार्टमाऊथ महाविद्यालयातून त्यांनी इतिहासात पदवी संपादन केली. मात्र त्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता तो औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी. पण, आण्विक जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाविद्यालयीन जीवनातच सुटीच्या कालावधीत त्यांनी युरेनियम खाणीत काम केले आणि त्यांचे कुतूहल आणखी वाढले. चार वर्षे नौदलात काम केल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९७१ मध्ये इतिहासात (अण्वस्त्रसंबंधित विषय घेऊन) पीएच.डी. केली. या संशोधनाचा आधार असलेले मार्टिन यांचे ‘अ वर्ल्ड डिस्ट्रॉइड : हिरोशिमा अ‍ॅन्ड इट्स लीगसी’ हे पुस्तक गाजले. जपानवर अणुबॉम्ब टाकण्याबाबतच्या सार्वत्रिक समजास त्यांनी छेद दिला. अणुबॉम्बचा वापर केला नसता तरी जपानने शरणागती पत्करली असती आणि तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष हॅरी ट्रमन यांना ही बाब माहीत असूनसुद्धा अणुबॉम्बचा वापर झाला, असे त्यांचे म्हणणे होते. मार्टिन हे सर्वाधिक चर्चेत आले ते ‘अमेरिकन प्रोमेथस : द ट्रायम्फ अ‍ॅन्ड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपनहायमर’ या चरित्र-पुस्तकाच्या प्रकाशनानंतर. काइ बर्ड या सहलेखकासह मार्टिन यांनी लिहिलेले हे पुस्तक; त्यास पुलित्झर पुरस्कार मिळाला. ‘‘या पुस्तकावर काम सुरू केले तेव्हा मार्टिन यांनी आपल्याकडे खूप मोठे संशोधन असले तरी त्यात उणिवा आहेत, असे सांगितले होते. मात्र, मी ते सर्व संशोधन पाहिले तेव्हा त्यात कुठेही उणिवा आढळल्या नाहीत’’, असे बर्ड सांगतात. या पुस्तकासाठी मार्टिन यांनी सुमारे दोन दशके संशोधन केले. या पुस्तकास पुलित्झर पुरस्कारासह नॅशनल बुक क्रिटिक्स अवॉर्ड, युनियन बुक अवॉर्ड आदी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. त्यांचे आधीचे पुस्तक ‘अ वर्ल्ड डिस्ट्रॉइड’ हेसुद्धा नॅशनल (अमेरिकेपुरते) बुक अवॉर्ड आणि पुलित्झरसाठी नामांकन यादीत होते. गेल्या वर्षी त्यांनी ‘गॅम्बलिंग विथ आर्मगेडॉन’ हे पुस्तक प्रकाशित केले. शीतयुद्ध काळात अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत रशिया कसे अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर होते, याचा पट त्यांनी त्यात उलगडला आहे. आण्विक विध्वंसाचा धोका अद्याप कायम असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचा प्रत्यय वारंवार येत असताना अण्वस्त्रकाळाचा हा भाष्यकार हरपला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: American historian martin jay sherwin zws

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या