ज्येष्ठ इस्रायली लेखक आणि विचारवंत अमोस ओझ यांचे निधन इस्रायल आणि जगभरच्या साहित्यप्रेमींइतकेच शांतताप्रेमींनाही खंतावणारे ठरले. इस्रायलमध्ये युद्धोन्मादी आणि अतिक्रमणवाद्यांचा प्रभाव वाढत असताना, पॅलेस्टाइन प्रश्नावर विवेकवादी भूमिका घेणाऱ्या ओझसारख्या व्यक्तींची उणीव प्रकर्षांने जाणवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी उन्मादी इस्रायलींविरोधात स्पष्ट इशारा दिलेला होता. सहा दिवसांचे युद्ध जिंकल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाइनची भूमी व्यापल्याने त्या देशात जल्लोष सुरू झाला होता. अशा वेळी पॅलेस्टिनी भूमीवरील व्याप्ती किंवा ऑक्युपेशन इस्रायली समाजाची बुद्धी कायमस्वरूपी भ्रष्ट करेल, कारण या व्याप्तीची नशा आपल्याला चढेल, असे ओझ यांनी म्हटले होते. त्यांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची परिपक्वता इस्रायली नेतृत्वात आणि राष्ट्रवादी उजव्या पक्षांमध्ये आजतागायत आलेली नाही. आपल्या हयातीत तरी आपल्या देशबांधवांना शहाणपण येणार नाही. कारण द्वेष, संशय, भीती वर्षांनुवर्षे खोलवर रुजल्यामुळे त्यातून बाहेर पडायला खूप अवधी लागेल, असेही त्यांना वाटायचे. तरीही असा एक दिवस कधी तरी येईलच, ज्या दिवशी दोन्हीकडील नागरिक कायमस्वरूपी आणि व्यवहार्य तोडगा शोधून शांततेत राहू लागतील याविषयी ते अखेपर्यंत आशावादी राहिले. ५० वर्षांच्या प्रदीर्घ लेखन कारकीर्दीमध्ये ओझ यांनी विपुल राजकीय लिखाण केले आणि विविध साहित्यप्रकार हाताळले. ‘माय मायकेल’ (कादंबरी, १९६८), ‘इन द लॅण्ड ऑफ इस्रायल’ (निबंधमाला, १९८३), ‘अ टेल ऑफ लव्ह अ‍ॅण्ड डार्कनेस’ (स्मरणचित्रे, २००२) या साहित्यकृतींमधून इस्रायल-पॅलेस्टाइन, ज्यू-अरब बेबनाव त्यांनी उभा केला. मानवी संघर्ष आणि त्यातून प्रतिबिंबित होणाऱ्या मानवी मर्यादांचे त्यांनी मांडलेले चित्रण इस्रायली पाश्र्वभूमीशी संलग्न न राहता वैश्विक ठरते, हे त्यांचे यश. त्यांच्या कथानकांमधील पात्रांसमोर केवळ इस्रायली व्याप्ती किंवा पॅलेस्टाइनशी संघर्ष इतपत मर्यादित कॅनव्हास नसतो. जगाला इस्रायली माणसाविषयी असलेले आकर्षण किंवा घृणा ओझ यांचे साहित्य वाचताना विरघळून जाते, कारण त्यांनी उभा केलेला इस्रायली माणूस तुमच्या-आमच्यापेक्षा फार वेगळा नसतोच. ‘सीन्स फ्रॉम अ व्हिलेज लाइफ’ या लघुकथासंग्रहातून ओझ यांनी उभे केलेले गाव आणि गावकरी आपल्यांतलेच वाटतात. ‘अखेरीस.. प्रत्येक जण निराश आहे. पण जिवंत आहे!’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांचे हे शब्द इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष संपण्याविषयी आशावादी असलेल्या सर्वासाठीच अमृतवाणी ठरतात.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amos oz
First published on: 31-12-2018 at 00:11 IST