जर्मनीची अँजेलिक कर्बर ही जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याला साजेशी कामगिरी करताना प्रथमच टेनिस क्रीडा प्रकारातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन विजेतेपदाचा मान मिळवला आहे. मागील वर्षी कन्यारत्न झाल्यामुळे विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेणाऱ्या सेरेना विल्यम्सला यंदा सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. मात्र तिचे हे स्वप्न कारकीर्दीत फक्त दुसऱ्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणाऱ्या कर्बरने उद्ध्वस्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे ३० वर्षीय कर्बरला २०१६च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडूनच अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कर्बरने कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. फुटबॉल आवडणाऱ्या कर्बरला पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याची संधी २००७ मध्ये मिळाली. मात्र, पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. मग ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी कर्बरला तब्बल चार वर्षे वाट पाहावी लागली. २०१०च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने मॅरेट अनेला पराभूत करून पहिला विजय मिळवला. त्यानंतर तिच्या कारकीर्दीने उंच भरारी घेतली. २०११च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली.  २०१२ मध्ये कर्बरने पहिल्यांदाच विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. मात्र व्हिक्टोरिया अझारेंकाने तिला पराभूत केले. २०१३ मध्ये कर्बरने एटीपी वर्ल्ड टूर, इस्टोरील व कतार खुली टेनिस स्पर्धा जिंकून सर्वानाच धक्का दिला. महिला एकेरीशिवाय दुहेरीतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली. २०१६ हे वर्ष कर्बरनेच गाजवले. कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरून तिने एकाच वर्षी ऑस्ट्रेलियन व अमेरिकन अशा दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावले. त्याच वर्षी कर्बरने जागतिक क्रमवारीत अव्वल १० महिलांमध्येही स्थान मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत रौप्यपदक पटकावणारी ती जर्मनीची पहिली टेनिसपटू ठरली.  ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी विम्बल्डनचे जेतेपद पटकावून तिने ऐतिहासिक कामगिरी तर केलीच, शिवाय महिलांमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली विल्यम्स भगिनींची विजयी परंपराही तिने खंडित केली. कारकीर्दीत तिने चारपैकी तीन (ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, विम्बल्डन) महत्त्वाची ग्रँडस्लॅम जेतेपदे एकदा मिळवली असून फक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेने तिला हुलकावणी दिली आहे. मात्र या विजयामुळे टेनिसजगताला येणाऱ्या काळात कर्बरपर्व सुरू राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angelique kerber beats serena williams to win wimbledon
First published on: 16-07-2018 at 04:17 IST