पत्रकारिता केवळ हौसेपोटी करता येत नाही, त्यासाठी कमालीचे झपाटलेपण आवश्यक असते. सतत माहिती गोळा करत राहणे आणि तिचे विश्लेषण करण्याची क्षमता अंगी निर्माण करणे, हे काम ‘लोकसत्ता’चे श्रीरामपूर येथील वरिष्ठ बातमीदार अशोक तुपे सातत्याने करीत राहिले. शेतीमधील अनंत अडचणी, कृषी क्षेत्रातील संशोधन, शेतमालाच्या बाजारपेठेतील हालचाल, शेतकऱ्यांचे लढे अशा अनेक विषयांत तुपे यांना रस होता. हे त्यांच्या आवडीचे विषय असले, तरीही बातमीदारी करताना राजकारण, समाजकारण, कलाकारण या विषयांचाही अभ्यास असणे आवश्यकच असते, याचे त्यांना भान होते. त्यामुळे दुष्काळातही बाबा-बापूंच्या कीर्तनांच्या कार्यक्रमांवर कसा प्रचंड खर्च होतो, याबद्दल त्यांना अभ्यास करावासा वाटे. सगळ्या विषयांमधील आंतरसंबंध जोडण्याची त्यांची हातोटी हे त्यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण. कृषी विद्यापीठात कोणते नवे संशोधन सुरू आहे आणि त्याच्या व्यावसायिक वापराने शेतीच्या बाजारावर काय परिणाम होईल, यावर सतत माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करीत. स्वत: शेतकरी असल्याने भारतीय शेती सतत तोट्यातच का चालते आणि त्यासाठीच्या आंदोलनांचे हेतू काय असतात, यावर त्यांचा सतत अभ्यास चाले. जागतिक बाजारपेठेत काय सुरू आहे, यावरही त्यांचे बारीक लक्ष असे. प्रचंड जनसंपर्क आणि विषयाची नेमकी जाण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष. बांधावरच्या शेतकऱ्यापासून कृषिमूल्य आयोगाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी त्यांचा संपर्क असे. बातमीदाराने झपाटलेलेच असायला हवे, यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने बरोबरच्या सगळ्या बातमीदारांनाही ते कामाला लावत. त्यांना वडिलकीचा सल्ला देत; प्रसंगी सर्व काही मदतही करत. अशोक तुपे एकदा बोलायला लागले, की त्यांच्यासमोर असलेला/ली कोणीही फक्त श्रोत्याची भूमिका बजावत असे. मग ते मंत्री असोत की पत्रकार. राज्यात अहमदनगर जिल्हा राजकीय दृष्टीने अतिशय वेगळा. तिथे राजकारण्यांची अनेक घराणी. त्यांचे कर्तृत्व, त्यांच्यामधील वितंडवाद आणि त्यांचे योगदान याबद्दल तुपे नेहमी भरभरून बोलत. कोणत्याही राजकारण्याला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटे, ती केवळ त्यांच्या नि:स्वार्थी पत्रकारितेमुळे. ठरवून कोणाच्या मागे लागायचे नाही, परंतु चुका करणाऱ्याची गयही करायची नाही, असा तुपे यांचा खाक्या. ‘लोकसत्ता’च्या नगर आवृत्तीमध्ये सुरुवातीपासून काम करीत राहिलेल्या तुपे यांनी आजवर विविध विषयांना वाचा फोडली. ते विषय शेवटापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेले धाडस त्यांच्या अंगी होते, याचे कारण पत्रकारितेमधील चारित्र्यसंपन्नता त्यांनी बाळगली होती. ग्रामीण भागातील पत्रकारिता बव्हंशी राजकारण्यांच्या वळचणीला असते. तुपे यांनी या कल्पनेला छेद दिला. नवे विषय शोधणे आणि त्यांचा अभ्यास करणे हे त्यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण, जे ग्रामीण भागातील पत्रकारितेत क्वचित सापडते. आपल्याबरोबरच्या पत्रकारांनाही त्यांनी याच मार्गाला लावले. त्यामुळेच ते मित्र आणि मार्गदर्शक म्हणून सगळ्यांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या अकाली निधनाने एक सच्चा पत्रकार हरपला आहे. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok tupe profile abn
First published on: 24-04-2021 at 00:04 IST