हवेच्या प्रदूषणाने जगभरात दरवर्षी लाखो लोक रोगांना बळी पडत असतात. वातावरणात असलेल्या कणांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रिया तपासणे त्यामुळेच महत्त्वाचे असते. हे अवघड काम करण्यात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या बार्बरा फिनलेसन-पिटस् यांना यंदा ब्रिटनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा पर्यावरण पुरस्कार जाहीर झाला आहे. बार्बरा या कॅलिफोर्निया विद्यापीठात रसायनशास्त्राच्या प्राध्यापक. त्यांनी आतापर्यंत हवा प्रदूषणाचे रसायनशास्त्र उलगडण्याचा केलेला प्रयत्न हा प्रशंसनीयच आहे. ‘एअर यूसीआय’ या हवा अभ्यास संस्थेच्या त्या सहसंचालकही आहेत. त्यांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान हवा प्रदूषणाच्या अभ्यासात कामी आणले. विशेषकरून त्यांचे संशोधन पर्यावरणात होणाऱ्या प्रकाशरासायनिक प्रदूषणाच्या रासायनिक प्रक्रियांबाबतचे आहे. पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या वातावरणात ज्या रेणवीय क्रिया घडतात त्यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. पण ‘माझ्याबरोबर प्रयोगशाळेत अथक परिश्रम करीत प्रयोग करणाऱ्या सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे’ असे त्या म्हणतात.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत हवामान बदलाच्या मुद्दय़ाला फारच कमी लेखले असले तरी बार्बरा यांनी हवामान बदलांबाबत नेहमीच धोक्याचा इशारा दिला आहे. काही वेळा आम्लवर्षां होते. काळसर रंगाचे थेंबही पडू शकतात, हे वातावरणात पसरलेल्या प्रदूषकांमुळे घडत असते. वातावरणातील असंख्य वायू कणांच्या रेणवीय क्रिया याला कारणीभूत असतात त्यांचा अभ्यास बार्बरा यांनी केला आहे. ओंटारियोतील ट्रेन्ट विद्यापीठातून विज्ञानात पदवी घेतल्यानंतर बार्बरा यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच.डी. केले. पुढे कॅलिफोर्निया विद्यापीठात रसायनशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून त्या स्थिरावल्या. तीच त्यांची कर्मभूमी ठरली. वातावरणात नायट्रिक ऑक्साइडचे रूपांतर नायट्रोजन ऑक्साइडमध्ये कसे होते; ओझोन, नायट्रिक आम्ल व कार्बनी नायट्रेटस् कसे तयार होतात, यावर त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून नायट्रोजन ऑक्साइड्स बाहेर टाकले जातात. ते वायुरूप हायड्रोजन क्लोराइडशी अभिक्रिया करतात. त्यातून वातावरणात धुक्याची निर्मिती करणारी संयुगे जन्म घेतात. घातक रसायने यात मिसळून काळे धुकेही तयार होऊ शकते. पाण्याची वाफही या अभिक्रियेत मदत करीत असते असे त्यांच्या २००९ मधील शोधनिबंधात म्हटले आहे. आपल्या सभोवतीच्या हवेत क्लोरिन-नायट्रोजन संयुगे बनत असतात. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाईट पद्धतीने होत असतो हे त्यांनी दाखवून दिले. क्लोरिनचे आयन हे ओझोननिर्मितीस मदत करतात, तर ब्रोमीनचे आयन त्याचा नाश करतात हा महत्त्वाचा निष्कर्षही त्यांनी मांडला. त्यातून वातावरणातील ओझोन थराच्या ऱ्हासाचे कोडे उलगडण्यास मदत झाली. व्रुडो विल्सन फेलोशिपसह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.