वयाची साठी जवळ आली की माणसाला निवृत्तीचे वेध लागतात. असेल तेवढे आयुष्य सुख-समाधानाने घालवण्याची इच्छा मनात बाळगून पुढची वाटचाल सुरू होते. पण चंद्रकांत बाबाजी ऊर्फ सी. बी. नाईक ऊर्फ सीबी काका या माणसाने जीवनाच्या या टप्प्यावर, क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर, नव्याने ‘गार्ड’ घेऊन आयुष्याची दुसरी इनिंग नव्या दमाने सुरू केली आणि कोकणात विज्ञानप्रसाराची पताका खांद्यावर घेऊन पुढच्या सुमारे पाव शतकाच्या वाटचालीत नव्या क्षितिजाला गवसणी घातली. हे सीबीकाका नुकतेच निवर्तले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांचा सीबींवर मोठा प्रभाव होता. त्यांच्याच सल्ल्यानुसार त्यांनी १९९५ मध्ये बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ-नेरूरपार या ठिकाणी वसुंधरा वैज्ञानिक केंद्राची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात घरातूनच कामाला प्रारंभ झाला. मग एका बँकेने फिरत्या प्रयोगशाळेसाठी गाडी दिली. त्या गाडीतून ‘सायन्स ऑन व्हील’ची कल्पना साकार करत सीबी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या शाळकरी मुलांना छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग दाखवू लागले. पण अशा उपक्रमासाठी खर्चही सुरू झाले. हळूहळू भवतालचे लोक मदत करू लागले. काही वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून निधी संकलन सुरू झाले. दोन खोल्यांच्या घरातून चार खोल्यांच्या भाडय़ाच्या जागेत केंद्राचे स्थलांतर झाले आणि त्यानंतर थोडय़ाच काळात गावातील सुमारे साडेचार एकर जमिनीवर सीबींच्या स्वप्नातील वसुंधरा केंद्राची टुमदार वास्तू उभी राहिली. काळाच्या ओघात गरज व निधीच्या उपलब्धतेनुसार या केंद्राचा विविधांगी विस्तार झाला. या केंद्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या खेडोपाडी विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच सीबींनी अ. भा. मराठी विज्ञान संमेलनासह अनेक उपक्रम या छोटय़ाशा गावातील साधनसामग्रीबाबतच्या मर्यादांवर मात करत यशस्वीपणे आयोजित केले. तसेच आपल्याकडील सुविधा इतर स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्याचा, कोकणात सहसा न आढळणारा उदारपणाही ठेवला.   या प्रवासात अनेक अडथळे आले. पण कामावरील सीबींच्या अविचल निष्ठेमुळे प्रभावित होऊन मदतीचे अनेक ज्ञात-अज्ञात हात पुढेआले. येथे केलेली मदत सत्कारणी लागेल, हा विश्वास त्यामागे होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’मधील ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या मालिकेत या केंद्रावरील लेख प्रसिद्ध झाला त्या वेळी व्यक्त केलेल्या मनोगतात सीबी म्हणाले होते की, मी आयुष्यात कधी फार पैसा नाही मिळवला, पण माणसं भरपूर जोडली. त्याचा प्रत्यय या केंद्राच्या यश्स्वी वाटचालीत पदोपदी येत राहिला आहे. ते संचित गाठीशी घेऊन हा विज्ञानविचाराचा पाईक अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: C b naik profile abn
First published on: 22-04-2020 at 00:01 IST