कोलातुर गोपालन

वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे, लंडनच्या रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्व मिळाले.

‘डॉक्टर आहेत ना तुझे वडील? मग ते लोकांना तपासत का नाही? औषधे का नाही देत’- शाळकरी मैत्रिणींच्या या प्रश्नांवर, कोलातुर गोपालन यांची मुलगी मालिनी म्हणे, ‘अगं ते जास्त मोठे डॉक्टर आहेत. एमबीबीएस नाही, एमडी आहेत आणि शिवाय नंतर पीएचडी झालेत. संशोधन करतात ते’! ‘हो? पण संशोधन म्हणजे काय? आणि कुठे बरं?’ या पुढल्या प्रश्नांवर, ‘अगं आपल्या कुन्नूरची पाश्चर इन्स्टिटय़ूट नाही का? तिथे ती जुनी जॅम फॅक्टरी होती ना? तिथेच आता अप्पांची ‘पोषण प्रयोगशाळा’ आहे’- या उत्तरानंतरही मालिनी यांच्या मैत्रिणींचे चेहरे कसनुसेच राहात.

या कोलातुर गोपालन यांचे निधन ३ ऑक्टोबर रोजी झाले. बेरीबेरी आणि पेलाग्रा या रोगांचे उच्चाटन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, ज्या कार्याचे महत्त्व लोकांना माहितीच नाही असे पोषणविषयक संशोधनाचे कार्य गोपालन यांनी केले. पुढे १९६२ मध्ये ही ‘पोषण संशोधन प्रयोगशाळा’ स्वतंत्र संस्था म्हणून हैदराबादला स्थलांतरित झाली आणि १९६९ मध्ये तिला ‘राष्ट्रीय पोषण संस्था’ (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन- एनआयएन) असे प्रतिष्ठेचे नाव मिळाले. ते मिळवून देणारे गोपालन, हेच या राष्ट्रीय संस्थेचे पहिले संचालक म्हणून नियुक्त झाले. १९७३ पासून ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’ या संस्थेचे संचालकपद त्यांनी सांभाळले. तीही संस्था वाढविताना हिवताप, कुष्ठरोग आणि प्राणीजन्य विकार यांसाठी स्वतंत्र संशोधन-संस्थांची स्थापना त्यांनी केली. सरकार कोणाचेही असो, त्याची तमा न बाळगता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रास साह्य़भूत ठरणाऱ्या संशोधनाची व्याप्ती वाढवत नेली. पोषण संशोधक या नात्याने, भारतीय अन्नपदार्थाचा ‘पोषण मूल्यांक तक्ता’ तयार करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. त्यासाठी ५०० अन्नपदार्थाचे विश्लेषण त्यांनी केले. अशा निरलस आणि समाजोपयोगी संशोधन कार्यासाठी त्यांना ‘पद्मश्री’ (१९७०) आणि ‘पद्मभूषण’ (२००३) हे किताबही मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे, लंडनच्या रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्व मिळाले. तरुणपणी कुन्नूरजवळील दुर्गम डोंगराळ भागात जाऊन, तेथील आदिवासींच्या खाद्यसंस्कृतीवर संशोधन करणारे गोपालन पन्नाशीत असताना एका राष्ट्रीय संस्थेचे संचालक या नात्याने देशभरातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला दिशा देत होते. पोषण- संशोधकांच्या ‘न्यूट्रिशन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना त्यांनी १९८०च्या दशकात केली आणि ‘फेडरेशन ऑफ एशियन न्यूट्रिशन सोसायटीज’द्वारे आशियाई पोषण-संस्थांचा महासंघ तयार होण्याआधी, ‘फ्रॅटर्निटी ऑफ एशियन न्यूट्रिशन सायंटिस्ट्स’ स्थापून त्यांनी आशियात संघटनकार्य केले. उच्चशिक्षणही त्यांनी मद्रासमध्येच घेतले होते, हे विशेष.

गोपालन यांना लोक ‘न्यूट्रिशन गोपालन’ याच नावाने ओळखत! त्यांचा १०१वा जन्मदिन येत्या २९ नोव्हेंबर रोजी साजरा झाला असता, त्याआधीच ते गेले. मुलीकडे- मालिनी (आता शेषाद्री) यांच्याकडेच त्यांचा मुक्काम असे. मालिनीदेखील आता सत्तरीपार. वडिलांच्या आठवणी त्यांनी गेल्याच वर्षी लिहिल्या होत्या. त्यांच्या शाळूमैत्रिणींचा ‘पण संशोधन म्हणजे काय?’ हा प्रश्न आजही अनेकांना पडतो, तो गोपालन यांना कधीही पडला नव्हता! बेरीबेरी वा पेलाग्रा हे कुपोषणजन्य रोग रोखणारी प्रथिने ग्रामीण, आदिवासी मातांनी कोठून मिळवावीत हे शोधणे म्हणजे गोपालन यांच्यासाठी संशोधनच होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coluthur gopalan profile