तमिळ नाटककार मोहन रंगाचारी हे ‘क्रेझी’ मोहन या नावानेच प्रसिद्ध होते. ‘क्रेझी थिव्ह्ज इन पालवक्कम’ या लोकप्रिय नाटकामुळे त्यांना ‘क्रेझी’ मोहन हे नाव मिळाले. ते उत्तम नाटय़कलाकार व पटकथाकार होते, अनेक तमिळ चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. अर्थात त्यांचे ‘क्रेझी थिव्ह्ज’ हे नाटक एस.व्ही. शेखर यांनी रंगमंचावर आणले, त्यांनीच ते दूरचित्रवाणीवरही सादर केले, त्या काळात हे नाटक विशेष लोकप्रिय ठरले.
क्रेझी मोहन व त्यांचे बंधू बालाजी यांनी अनेक नाटके लिहिली, त्यात भूमिका केल्या. त्या दोघांमध्ये तमिळनाडूतील प्रेक्षक विभागले गेले होते इतका त्यांचा वरचष्मा होता. नर्मविनोदी शैली हा क्रेझ मोहन यांचा स्थायीभाव होता, खटकेबाज संवाद हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़.त्यांनी ‘क्रेझी क्रिएशन’ ही नाटक कंपनी १९७९ मध्ये स्थापन केली होती. अपूर्व सागोधरागल, साथई लीलावती, मागलिर मट्टुम, कधला कधला, वसूल राजा एमबीबीएस हे त्यांचे विनोदी शैलीचे चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या चित्रपटात कमल हासन यांच्या भूमिका होत्या. मायकेल मदना कामराजन या चित्रपटामुळे कमल हासन यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. ‘कुणालाही क्लेश न देता केलेला विनोद’ हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांनी दुहेरी अर्थाचे संवाद कधीच लिहिले नाहीत त्यामुळे त्यांची अस्सलता वेगळी होती. विनोदी पात्राची संवादफेकच त्यांनी बदलून टाकली. त्यालाही त्यांनी अभिजात पातळीवर नेऊन ठेवले. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘हिअर इज क्रेझी’ ही मालिका केली होती. त्यांच्या नाटकांमधील विनोद हे मध्यमवर्गाशी संबंधित असत त्यामुळे मोठा चाहतावर्ग त्यांना लाभला. त्यांनी नाटकातील त्यांची प्रगल्भता ही चित्रपट क्षेत्रातही तितक्याच खुबीने वापरली. एका ओळीतील ‘शब्दखेळ’ हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते. ते त्यांचे वैशिष्टय़ पांचथानतिरम या चित्रपटात दिसते. के. बालचंदर यांच्या ‘पोइकल कुधीराई’ या चित्रपटातून त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मोहन यांनी रटचागन या चित्रपटासाठी संवाद लिहिले होते व त्या वेळी नायिका सुश्मिता सेन हिच्या वडिलांची भूमिका गिरीश कार्नाड यांनी केली होती. कलायमामणी या पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना लाभले. एकूण २५ नाटके त्यांनी लिहिली त्यात ‘ग्रेट बँक रॉबरी ते क्रेझी प्रीमियर लीग’ असा हा प्रवास होता. त्यांच्या निधनाने तेथील रंगभूमीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.