ओदिशा म्हटले, की वादळे पाचवीला पुजलेली भूमी, गेल्या काही वर्षांत येथे वादळांनी घातलेले थैमान बघता नैसर्गिक आपत्तींचे रौद्र रूप सामोरे येते. याच भूमीतील चक्रीवादळतज्ज्ञ असलेले ‘सायक्लोन मॅन’ मृत्युंजय मोहपात्रा यांची भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकपदी झालेली नियुक्ती सयुक्तिक अशीच आहे.
ओदिशातील वादळांना तोंड देताना वेळीच अंदाज देऊन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची किमया ही हवामान विभागामुळेच साध्य झाली आहे. त्यात मोहपात्रा यांनी गट ‘जी’मधील वैज्ञानिक म्हणून केलेली कामगिरी ही महत्त्वाची ठरली आहे. देशातील हवामान अंदाज योग्य नसतील तर त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात बसत असतो. त्यामुळेच अधिक अचूक अंदाजांसाठी मोहपात्रा यांना हवामान विभागात वेगळी घडी बसवावी लागेल. वर्गीकृत हवामान अंदाज, प्रभावाधारित अंदाज यावर भर देण्याचा त्यांचा मानस आहे. रेल्वे वाहतूक, शेती, इतर क्षेत्रांना वेगळे हवामान अंदाज जारी करण्याची त्यांची कल्पना आहे. चक्रीवादळे, धुळीची वादळे, उष्णतेची लाट, हिमवृष्टी, पाऊस असे अनेक घटक हवामान अंदाजात येतात. त्या सर्वावर लक्ष ठेवून जास्तीत जास्त अचूक अंदाज देण्याची जबाबदारी मोहपात्रा यांच्यावर आहे. हे अचूक अंदाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी लागणार आहे. प्रादेशिक भाषेतून हे अंदाज देतानाच संकेतस्थळही वापरसुलभ करणे मोठे आव्हान आहे. मोहपात्रा यांनी हवामान खात्याच्या वादळ सूचना केंद्राचे अनेक वर्षे नेतृत्व केले. ते भौतिकशास्त्राचे पदवीधर. नंतर त्यांनी ओदिशातील चंडीपूर येथे संरक्षण संशोधन व विकास संस्थेतून कामास सुरुवात केली. त्या वेळी त्यांना ज्येष्ठ वैज्ञानिक व ‘मिसाइल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. १९८८ मध्ये झालेल्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या चाचणीत मोहपात्राही सहभागी होते. या मंतरलेल्या वातावरणातही त्यांचे मन रमत नव्हते, याचे कारण त्यांना हवामानशास्त्राची ओढ होती. त्यामुळेच कालांतराने ते हवामान खात्यात रुजू झाले. मोहपात्रा हे मूळ ओदिशातील भद्रक जिल्ह्य़ातले. तिथे लहानपणापासून त्यांनी वादळांनी केलेली वाताहत पाहिली होती. त्यातूनच आपण पुढे जाऊन वादळांच्या या प्रांतात मुशाफिरी करावी असे त्यांना वाटले. त्यात ते यशस्वीही झाले- २०१३, २०१४, २०१८, २०१९ अशी अनेक वादळे ओदिशाने झेलली, पण त्याचे ओरखडे फार कमी उमटले. आता मोहपात्रा यांना या विभागाचे नेतृत्व करताना केवळ वादळेच नव्हे तर अधिक व्यापक हवामान अंदाजाचे क्षेत्र हाताळावे लागणार आहे.