रॉबी डिसिल्वा

अविवाहित असल्याने ते भाच्यांकडे राहात, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पापडी हे वसईतले गाव, मुंबईचे ‘जेजे’ उपयोजित कला महाविद्यालय, लंडन, ‘डिझाइन पंढरी’ समजले जाणारे मिलान शहर आणि पुन्हा मायदेशी परतून वसई, असा जागतिक दर्जाचे अभिकल्पकार (डिझायनर) रॉबी डिसिल्वा यांचा जीवनप्रवास गोव्यातील मुक्कामी नुकताच संपला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसन्मान त्यांना मिळाले होतेच, पण भारतात ‘पॅकेजिंग डिझाइन’चा पाया भक्कम करण्याचे काम त्यांनी केले.

त्यांचे वडील फ्रान्सिस हे रेल्वेत तुटपुंज्या पगारावर नोकरीला होते. घरी एक बहीण आणि चार भाऊ. ते चार वर्षांचे असताना आईचे निधन झाले आणि सावत्र आई आल्यानंतरही हलाखी संपली नाही. प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी रॉबी डिसिल्वांवर लिहिलेल्या पुस्तकातही हे उल्लेख सापडतात. पापडी गावातील गरीब घरात, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रॉबी यांनी जे.जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. उपयोजित कलेत ते प्रथम आले. शिष्यवृत्ती मिळवून ते लंडनच्या सेंट्रल स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. तेथेही त्यांनी पहिल्या दहा गुणवंतात स्थान पटकावले आणि पुढे ‘फेलो ऑफ चार्टर्ड सोसायटी ऑफ डिझायनर्स’ हा ब्रिटिश सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई ठरले. इटलीच्या मिलान शहरातील स्टुडियो बोजेरीने त्यांना मानाने बोलावून घेतले. तेथे त्यांनी दीड वर्ष काम केले. लंडनच्या प्रसिद्ध जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीतही ते होते. लंडनमध्ये जॉर्ज बेली, पॉल पीच, पीटर विल्बर्गसारख्या नामांकित अभिकल्पकारांसह त्यांनी काम केले. ‘पॅकेजिंग डिझाइन’ या प्रकारात काम करताना नव्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून त्यांनी या क्षेत्रात अभिनव क्रांती आणली. ब्रिटिश चीज ब्युरो, सिगारेटसाठी पॅकेजिंग व जाहिराती केल्या. १९८६ मध्ये ते भारतात परतले. एशियन पेण्ट्स, कॅडबरी आदी उत्पादनांचे बाह्यरूप पालटून टाकताना आणि असंख्य जाहिरातींतून किंवा ‘अडवाणी ऑर्लिकॉन’च्या दिनदर्शिकांमधून कल्पकता दाखवतानाच, वसईतील नानभाटच्या सेंट पॉल चर्चसाठी त्यांनी काचचित्र (स्टेन्ड ग्लास पेंटिंग) केले, तथागत गौतम बुद्धांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेले चित्र भारत सरकारच्या टपाल तिकिटावर आले. गावातील मुलांना उत्तम कलाशिक्षण घेता यावे, या ध्येयापायी वसईत पहिले दृश्यकला महाविद्यालय सुरू झाले. पण यानंतरही ‘जेजे’ तसेच मुंबईच्या आयआयटीतील ‘इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर’मध्ये अभ्यागत व्याख्याते म्हणून त्यांनी ज्ञानदान सुरू ठेवले होते. १९३० साली जन्मलेले रॉबी हल्ली थकले होते. अविवाहित असल्याने ते भाच्यांकडे राहात, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Designer robbie desilva profile zws

ताज्या बातम्या