गुणवत्तेला जिद्द आणि चिकाटीची जोड असेल तर तुम्ही गगनभरारी घेऊ शकता, हे देवेंद्र झाझरियाने पॅरालिम्पिकमध्ये दुसरे सुवर्णपदक पटकावून साऱ्या विश्वाला दाखवून दिले आहे. जी कामगिरी सुदृढ माणसांना जमली नाही ती अपघातामध्ये डावा हात गमावलेल्या या भालाफेकपटूने करून दाखवली आहे. यापूर्वी २००४ साली अथेन्समध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्रने पहिले सुवर्णपदक पटकावले होते, त्यानंतर आता रिओमध्ये त्याने दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्रचा जन्म आपल्या साऱ्यांसारखाच. अगदी सुदृढ. लहान मुलांसारखा तोही मस्तीखोर होता. देवेंद्र आठ-नऊ वर्षांचा असेल. एकदा झाडावर चढताना एका उघडय़ा वायरला त्याचा हात लागला. त्या वायरमधून ११ हजार व्होल्टचा झटका त्याला लागला आणि तो खाली पडला. त्याचा जीव वाचेल की नाही, याचीही शाश्वती नव्हती. पण या अपघातातून तो बचावला. शुद्धीवर आल्यावर आपला डावा हात अधू झाल्याचे त्याला समजले. हा विजेचा धक्का एवढा मोठा होता की त्याचा डावा हात अर्धा काढावा लागला. हात गेल्याचे दु:ख होतेच, पण या दु:खात त्याने स्वत:ची आहुती दिली नाही. खेळांची त्याला आवड होती. भालाफेकसारखा खेळ हातावर अवलंबून असलेला. एक हात नसला म्हणून काय झाले, आता याच खेळात कारकीर्द करण्याचा त्याने संकल्प केला. खेळायला सुरुवात केल्यावर काही महिन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली होऊ लागली. जिल्हास्तरीय स्पर्धा त्याने जिंकली आणि आपण निवडलेला मार्ग चोख असल्याचे त्याला जाणवले. स्पर्धासाठी विविध ठिकाणी जात असताना त्याला सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. कोणाच्या तरी वशिल्याने हा स्पर्धेला आल्याचे बोलले जायचे. देवेंद्र निमूटपणे सारे ऐकून घ्यायचा. पण स्पर्धा झाल्यावर मात्र तीच हिणवणारी मंडळी देवेंद्रला चॅम्पियन म्हणत अभिनंदन करायला यायची. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही. आपल्या कामगिरीतूनच तो साऱ्या टीकाकारांना उत्तरे देत आला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra jhajharia
First published on: 15-09-2016 at 03:34 IST