वर्तमानकाळावर कोणत्या इतिहासाचा परिणाम झालेला आहे, हे हेरून इतिहासाचा तो पैलू अभ्यासणारे संशोधक म्हणून देवेन्द्रनाथ पाणिग्रही अनेकांच्या लक्षात राहातील. दिल्ली विद्यापीठ ते राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांत त्यांनी अध्यापन केलेले असले, तरी निव्वळ अकादमिक क्षेत्रात ते रमले नाहीत. कदाचित त्यामुळेच त्यांनी शिष्यवर्गाची प्रभावळ निर्माण केली नाही. मात्र त्यांची पुस्तके त्यांच्या निधनानंतरही, इतरांना अभ्यासाचे निमंत्रण देत राहातील.

इतरांपेक्षा निराळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न अभ्यासक म्हणून त्यांनी केलेला दिसतो. ‘इंडियाज पार्टिशन : द स्टोरी ऑफ इंपीरिअ‍ॅलिझम इन रिट्रीट’ हे फाळणीमागच्या वसाहतवादी प्रेरणांचा वेध घेणारे पुस्तक, ‘जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर- द कोल्ड वॉर अँड द वेस्ट’ हे काश्मीरप्रश्नात रशिया व अमेरिकेच्या  अफगाणिस्तान / पाकिस्तान/ भारत व चीनविषयक भूमिकांचा परिणामही कसकसा होत गेला याचा थांग शोधणारे पुस्तक, तसेच ‘द हिमालयाज अँड इंडिया-चायना रिलेशन्स’ हे त्यांचे अखेरचे ठरलेले (२०१६ सालचे) पुस्तक, ही पुस्तके विशेष  उल्लेखनीय आहेत. यापैकी अखेरच्या पुस्तकात त्यांनी ‘हिमालय’ हा भारतीय संस्कृतीचा जसा मानबिंदू आहे, तसा तो चिनी संस्कृतीचा नाही आणि हिमालयाची जवळीक भारताशीच आहे, हे अनेक दाखल्यांनिशी दाखवून दिले. हे पुस्तक वेदकाळापासून ते आजच्या- चीनने ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ प्रकल्प रेटण्याच्या- काळापर्यंतचा वेध घेते.

इतिहास-अभ्यासक म्हणून धोरणे आणि प्रशासकीय निर्णय, तसेच त्यांच्यावर प्रभाव पाडणारे घटक यांचा अभ्यास करण्याचा मार्ग त्यांनी प्रथमपासून निवडला होता. बस्तर जिल्ह्यात (आता छत्तीसगढ राज्य) जन्मलेल्या देवेन्द्रनाथ यांना पदवी शिक्षणासाठी देखील सागर विद्यापीठात जावे लागले. तेथून ते वयाच्या तिशीत लंडन विद्यापीठात गेले आणि ‘चार्ल्स मेटकाफचे प्रशासन – १८०६ ते १८३५’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली. दिल्ली विद्यापीठात प्रपाठक, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक, ‘एनसीईआरटी’मध्ये इतिहासाचे विषयतज्ज्ञ व प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. विशेष म्हणजे, अध्यापनासोबतच अभिलेखांच्या (आर्काइव्ह्ज) प्रशासनातही त्यांनी रस घेतला. आधी नेहरू मेमोरियलच्या सल्लागार मंडळावर, तर पुढे संसद भवन ग्रंथालय आणि अभिलेखागाराच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले होते. उत्तरायुष्यात त्यांनी ग्रंथलेखनावर लक्ष केंद्रित केले. वयाच्या ९१ व्या वषी, जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात अल्प आजारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.