‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ अशा जाहिराती आपल्याकडे ७० ते ८० दशकांत भिंतींवर पाहायला मिळत. विसाव्या शतकात याच ‘देवीने’ तीन ते पाच कोटी बळी घेतले. भारतात इसवीसन १००० पासून (म्हणजे किमान हजार वर्षे) ठाण मांडल्याचा इतिहास आहे.  या भीषण आजाराचे जंतू जगातून नामशेष व्हावेत यासाठी डोनाल्ड अ‍ॅन्स्ली हेण्डरसन यांनी आयुष्य वेचले. मित्रांमध्ये ते डी.ए. या टोपणनावाने ओळखले जात. अशा या ‘देवी’ नष्ट करणाऱ्या देवदूताचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच अमेरिकेत निधन झाले.या ‘देवी’ नष्ट करणाऱ्या देवदूताचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच अमेरिकेत निधन झाले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’त (डब्लूएचओ किंवा ‘हू’) मोलाचे योगदान दिलेल्या हेण्डरसन यांनी देवी नष्ट होऊ शकतो हा विश्वास दिला, तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा उडवली. मात्र त्यांची धडपड कमी झाली नाही. केवळ प्रयोगशाळेत किंवा कार्यालयात बसून संशोधन न करता, जेथे देवीच्या आजाराचा गंभीर प्रादुर्भाव झाला आहे तेथे ते दाखल व्हायचे.. ‘व्हॅरिओला मेजर’ विषाणूमुळे होणारा हा आजार संसर्गजन्य असूनही, त्याच्या विरोधातील आव्हान त्यांनी पेलले. हा आजार बळावलेल्या युगोस्लाव्हियातून त्यांची ‘लढाई’ सुरू झाली होती. ‘हू’ची ही मोहीम भारतासह ७० देशांत पोहोचली. १९७४ मध्ये ते नवी दिल्लीतही आले होते. भारतातून जर देवीचा रोग हद्दपार केला तर मी जीपचे टायर खाईन असे आव्हान ‘हू’च्या एका अधिकाऱ्याने त्यांना दिले होते. मात्र रोग हद्दपार होताच हेण्डरसन यांनी त्याला आठवण करून दिली. तेव्हा या अधिकाऱ्याने गमतीने बोलल्याची सारवासारव केली!

१ जानेवारी १९६७ रोजी ‘हू’ने देवी निर्मूलन कार्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे जगभरात कार्यरत असलेल्या या संघटनेच्या एक लाख कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याची संधी त्यांना मिळाली. तरीही मार्ग काही सरळ नव्हताच. शीतयुद्धाच्या कालखंडात त्यांनी रशिया व त्यांच्या मित्र देशांशी सौहार्दाचे संबंध जपत आपले ध्येय गाठलेच. ९ डिसेंबर १९७९ रोजी ‘देवी’ निर्मूलनात संपूर्ण यश आल्याचे जाहीर करण्यात आले.

जॉर्ज बुश (धाकटे व थोरलेही) तसेच बिल क्लिंटन या तीनही राष्ट्राध्यक्षांच्या काळात अमेरिकी प्रशासनात विज्ञान व तंत्रज्ञान धोरणाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्यानंतर सरकारने आपत्कालीन सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. जागतिक आरोग्य संघटनेतील कार्याबद्दल १९८५ मध्ये औषधशास्त्रातील अल्बर्ट श्वाइट्झर आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच २००२ मध्ये अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदकाने त्यांना गौरवण्यात आले होते.

भारतात आरोग्यविषयक माहिती नीट ठेवली-वापरली जात नाही, ही त्यांची त्या वेळची तक्रार मात्र त्यांच्या निधनानंतरही कायम आहे.