अमेरिकेत ऑगस्टा येथे झालेली मास्टर्स स्पर्धा जिंकून टायगर वूड्सने गोल्फमध्ये दिमाखात पुनरागमन केले आहे. त्याचे हे १५वे ‘मेजर’ अजिंक्यपद. आता विख्यात गोल्फर जॅक निक्लॉसच्या विक्रमी १८ अजिंक्यपदांची बरोबरी करण्याच्या आणि तो मागे टाकण्याच्या दिशेने टायगरची वाटचाल सुरू आहे. पण १५ किंवा १८पेक्षाही टायगरच्या दृष्टीने महत्त्वाचा आकडा ठरतो ११! कारण तब्बल ११ वर्षांनंतर टायगरने प्रथमच ‘मेजर’ स्पर्धा जिंकून दाखवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जे महत्त्व तेच गोल्फमध्ये मेजर स्पर्धेचे. वर्षांतून अशा चार स्पर्धा, ज्यांतील तीन अमेरिकेत आणि एक ब्रिटनमध्ये होते. टायगरने २००८मध्ये यूएस ओपन जिंकली, त्यावेळी तो यशोशिखरावर होता. पण नंतर त्याची घसरण सुरू झाली- खेळ आणि व्यक्तिगत आयुष्य अशा दोन्ही आघाडय़ांवर!  १९९६मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी तो व्यावसायिक गोल्फपटू बनला आणि पुढच्याच वर्षी तीन स्पर्धाव्यतिरिक्त त्याने कारकीर्दीतली पहिली मेजर स्पर्धाही जिंकली. त्याच वर्षी म्हणजे १९९७मध्ये टायगर वूड्स जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोहोचला. इतक्या कमी वयात यश आणि मानमरातब मिळू लागल्यानंतर पुढील प्रवासात मनावर नियंत्रण ठेवणे हे सर्वाधिक मोठे आव्हान असते. बौद्धधर्मीय टायगरचा (त्याची आई थायलँडची, टायगरने तिचाच धर्म स्वीकारला) त्याच्या धार्मिक शिकवणीवर विश्वास होता. परंतु जसे यश मिळू लागले, तसे म्हणजे नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात व्यभिचार आणि मद्य व अमली पदार्थाचे सेवन हे विकार जडले. त्यातून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. दोन मुलांना जन्म देऊन त्याची पत्नी विभक्त झाली. मद्याच्या अमलाखाली मोटार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. जवळपास याच दरम्यान तब्बल चार वेळा त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. ही आव्हाने पेलतानाही टायगर जवळपास प्रत्येक वेळी मुख्य प्रवाहात खेळण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहिला. बौद्ध धर्मापासून दुरावलो आणि भरकटलो. अखेर या धर्मानेच आधार दिला आणि मार्गी लागलो, असे टायगर सांगतो. मिश्रवर्णीय टायगरला त्याच्या अडचणीच्या काळात कित्येक पुरस्कर्त्यांनी वाऱ्यावर सोडले. अपवाद केवळ ‘नायके’चा. आज टायगर वूड्स ४४ वर्षांचा आहे आणि पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये आला आहे. त्याच्याइतक्या लहान वयात आणि अल्प काळात आजवर कोणत्याही गोल्फपटूने यशोशिखर पाहिले नव्हते. आणि अक्षरश रसातळाला जाऊनही पुन्हा उमेदीने आणि सन्मानाने पुनरागमन करणाराही त्याच्यासारखा दुसरा गोल्फपटू नाही!

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golf player tiger woods profile
First published on: 18-04-2019 at 03:28 IST