जिम्नॅस्टिक्स हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमधील अतिशय विलोभनीय क्रीडा प्रकार; त्यात पदके मिळविण्याच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. मात्र आपल्या देशास या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदक  मिळविता आलेले नाही. अरुणा रेड्डी हिने ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट! आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे हे पहिलेच पदक आहे. तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. अरुणा २२ वर्षांची आहे आणि जिम्नॅस्टिक्समधील कारकीर्द १५ व्या वर्षी सुरू होत असल्याचे मानले जात असूनही तिने ही कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर वडील कराटेपटू असल्याने तिलाही कराटेमध्ये करिअर करायचे होते. मात्र वडिलांनीच अरुणाला जिम्नॅस्टिक्स सरावास भाग पाडले. राष्ट्रीय स्तरावर पहिले पदक मिळाल्यानंतर तिने जिम्नॅस्टिक्समध्येच स्पर्धात्मक कारकीर्द करण्यास कौल दिला. रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्मकार हिला कांस्यपदकापासून वंचित व्हावे लागले होते. दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या अकादमीत अरुणा सराव करते. ब्रिजकिशोर हे तिचे वैयक्तिक प्रशिक्षक असले तरी या दोन्ही प्रशिक्षकांमुळे अरुणाच्या कौशल्यात खूप सुधारणा झाली आहे. ती दीपाबरोबरच सराव करते. दोन्ही खेळाडू एकाच क्रीडा प्रकारात असल्या तरीही त्यांच्यात स्पर्धा नसते. किंबहुना अरुणा ही दीपास मोठी बहीण मानते.  दुखापतीमुळे दीपास जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्या वेळी दीपापेक्षाही जास्त दु:ख अरुणास झाले. स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी अरुणाने दीपाशी प्रदीर्घ चर्चा केली. त्याचा फायदा पदक मिळविण्यासाठी झाला असल्याचे अरुणा आवर्जून सांगते.

यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आदी महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. अरुणास आपल्या शिरपेचात आणखी पदकांची मोहोर नोंदविण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. दीपा हिला रिओ ऑलिम्पिकपूर्वी काही महत्त्वाच्या स्पर्धामध्ये भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटकांमधील मतभेदांमुळे भाग घेता आला नव्हता. २०२० मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत अरुणा हिला कसे पदक मिळविता येईल याचा विचार आपल्या संघटकांनी केला पाहिजे. जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर असलेल्या गटबाजीमुळे काही वर्षे विविध वयोगटांच्या राष्ट्रीय स्पर्धाच झाल्या नव्हत्या. जर स्पर्धा होत नसतील तर खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी तरी कशी मिळणार याबाबत जिम्नॅस्टिक्स संघटकांनी त्वरित हालचाली करून आपले खेळाडू स्पर्धापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gymnast aruna reddy
First published on: 28-02-2018 at 01:53 IST