‘धर्म’ आणि ‘जीवनपद्धती’ यांवरील काथ्याकूट संपणारा नाही. परंतु खरे धर्म अभ्यासक असा फरक करतात का? जोवर जीवनपद्धतींशी धर्माचे अद्वैत टिकून असते तोवरच धर्म ‘जिवंत’ असतात, हे ज्यांना केवळ हिंदुत्वच नव्हे तर तिबेटी हीनयान बौद्धत्वासह अनेक धर्माच्या अभ्यासातून कळले, अशांपैकी एक गाढे विद्वान अमेरिकेत राहत. आयुष्यभर विविध धर्मग्रंथ आणि धर्मशास्त्राचा अफाट व्यासंग असलेले हे विद्वान म्हणजे प्रा. ह्य़ूस्टन स्मिथ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मिथ यांचा जन्म १९१९ मध्ये चीनमधील एका ख्रिश्चन परिवारात झाला. १७ वर्षे तेथे राहिल्यानंतर ते शिक्षणासाठी अमेरिकेत आले. शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले.  नंतर त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वेदान्त तसेच बौद्ध आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला. डेन्व्हर विद्यापीठात स्मिथ यांनी १९४४ ते ४९ असे अध्यापन केले. तेथून ते वॉशिंग्टन विद्यापीठात गेले. तेथे दहा वर्षे शिकवण्याचे काम केल्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रा. टिमोथी लेरी आणि रिचर्ड अल्पर्ट यांनी मानवी मनाचा शोध घेण्यासाठी जे नानाविध प्रयोग केले त्यात प्रा. स्मिथ यांचाही सहभाग होता. येथून  कॅलिफोर्निया, बर्कले आदी विद्यापीठांतून त्यांनी धर्मशास्त्र आणि त्याचे महत्त्व या विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  वॉशिंग्टन विद्यापीठात असतानाच राष्ट्रीय शिक्षणावर दूरचित्रवाणीसाठी दोन मालिका त्यांनी तयार केल्या. ‘रिलिजन्स ऑफ मॅन्स’ आणि ‘सर्च फॉर अमेरिका’ या दोन मालिकांची अभ्यासकांनी खूप प्रशंसा केली होती. यामुळे मग त्यांना आर्थर क्रॉम्टन यांच्यासमवेत ‘सायन्स अ‍ॅण्ड ह्य़ूमन रिस्पॉन्सिबिलिटी’ या अन्य एका चित्रवाणी मालिकेची निर्मिती करण्याची संधी मिळाली. हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९९६ मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला.

प्रा. स्मिथ १९६४ मध्ये प्रथम भारतात आले होते. त्या वेळी ते एका तिबेटी बौद्ध मठात राहत होते. बौद्ध भिख्खू जो जप करत होते त्याचे ध्वनिमुद्रण त्यांनी करून घेतले. तेथून मायदेशी परतल्यानंतर ते ध्वनिमुद्रण एमआयटीतील आपल्या विद्यार्थ्यांना दिले व त्याचे विश्लेषण करण्याची सूचना त्यांनी केली. त्यातून त्यांनी आगळ्यावेगळ्या संगीत शैलीचा शोध लावला.

परस्पर सामंजस्य, सामाजिक न्याय आणि शांततेसाठी जगभरातील धर्म एकत्र यावेत यासाठी आयुष्यभर निष्ठेने आणि तळमळीने कार्यरत राहिल्याबद्दल मॅसेच्युसेट्स येथे त्यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  त्यांच्या ‘द वर्ल्ड्स रिलिजन्स’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाच्या २० लाख प्रती खपल्या होत्या. ‘भगवद्गीतेला अनुसरणारे हिंदू हे कर्मसिद्धान्त मानणारे असल्यानेच ते (पाश्चात्त्य जग ज्या संन्यासालाच भारतीय अध्यात्म समजते अशा) वैराग्यमार्गाकडे वळत नाहीत. रोजच्या जगण्यातूनच त्यांना कर्माचे मर्म अधिक सखोलपणे कळते’ अशा सुलभ-सोप्या शब्दांत हिंदू धर्मग्रंथांविषयीचे कुतूहल जागविण्याची हातोटी त्यांच्यात होती. वेदान्त आणि धर्मशास्त्राच्या या आंतरराष्ट्रीय विद्वानाचे वृद्धापकाळाने गेल्या शुक्रवारी निधन झाले.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huston smith
First published on: 06-01-2017 at 05:54 IST