मध्य प्रदेशच्या राजभवनात तत्कालीन राज्यपाल डॉ. बलराम जाखड यांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येणार होत्या. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री होते. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख मला भेटायला येत आहेत; त्यामुळे त्यांच्या स्वागताला तुम्हीही या, असा निरोप राजभवनातून जाखड यांनी चौहान यांना पाठवला होता. चौहान आलेदेखील.. सोनिया गांधी यांच्या स्वागताला भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याने राजभवनात यावे, हा भारतीय राजकारणातील एकमेव प्रसंग! अजातशत्रू बलराम जाखड यांनी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यावर सत्ताधाऱ्यांना जाहीरपणे सांगितले होते- ‘मी काँग्रेसचा नव्हे; राज्याचा राज्यपाल आहे. आपल्यासाठी राज्यघटनाच सर्वोच्च आहे. व्यक्ती साऱ्या गौण आहेत.’ अरुणाचल प्रदेशच्या ताज्या उदाहरणानंतर, डॉ. जाखड यांच्यासारख्या नेत्याची ही आठवण महत्त्वाची ठरते.
डॉ. जाखड यांच्या निधनामुळे राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही मातीशी नाळ जुळलेल्यांमधील एक नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. मुत्सद्दी संसदपटू, कृषितज्ज्ञ, पूर्णवेळ राजकारणी अशा बहुविध भूमिकांत वावरल्यानंतरही लोकसभाध्यक्ष म्हणून ते सर्वाधिक प्रभावी राहिले. संसदीय वाचनालयाचे आधुनिकीकरण, संग्रहालय, संगणकाचा जास्तीत जास्त वापर व संसदीय कामकाजात सहजता व सरलता येण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा आग्रह जाखड यांनी लोकसभा अध्यक्ष असताना धरला होता.
लाहोरमध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या बलराम जाखड फाळणीच्या विषयावर नेहमीच संवेदनशील राहिले. २००४ साली जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय युवा महोत्सवात अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘फाळणीची जखम देशाने अनुभवली आहे; तेव्हा वैविध्याने नटलेली आपली सांस्कृतिक परंपरा वाढवा’, असे भावुक आवाहन केले होते. त्यांनी राजकारणात सदैव शेतकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानले. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांची अंतिमत: ओळख शेतकरी अशीच होती. शेतीत विविध प्रयोग राबवणारे बलराम जाखड हे ‘उद्यान पंडित’ या पदवीने सन्मानित झालेले पहिले मोठे राजकीय नेते होते. ‘कृषिदर्शना’साठी परदेश दौरे केले. ‘आज धूप बहोत है. मेरा बस चलता तो मैं छाँव कर देता. क्यों कि पेड-खेत-खलिहान मुझ से बात करते है!’, अशा सहज गप्पाहीशेतकऱ्यांशी ते करीत. भारतीय कृषक् समाजाच्या कामकाजात त्यांचे योगदान याच भावनेतून होते. राष्ट्रकुल संसदीय कार्यकारी मंचाच्या अध्यक्षपदी पोहोचलेले ते पहिले आशियाई होते.
शाकाहारी जेवण, शुद्ध विहार-विचार व आचार हे त्यांच्या शिस्तबद्ध जीवनाचे श्रेय आणि प्रेय होते. ‘शिवार व संसदेतही आपला ठसा उमटवणारे स्वच्छंदी राजकारणी’ असे त्यांचे वर्णन समकालीन राजकारणी करतात. त्यांची राजकीय स्वीकारार्हता पक्षभेदांपल्याडची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about dr balram jakhar
First published on: 04-02-2016 at 03:58 IST