चंद्रावरील मोहिमांत आतापर्यंत १२ माणसे सहभागी झाली, त्यात एडगर मिशेल सहावे होते, त्यांच्या निधनाने आता सात चांद्रवीर उरले आहेत. चौदाव्या अपोलो मोहिमेत अ‍ॅलन शेफर्ड यांनी मिशेल यांची निवड केली होती. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी १९७१ ही मोहीम झाली, विशेष म्हणजे या मोहिमेच्या ४५व्या वर्धापनदिनी मिशेल आपल्यात नाहीत.
माणूस चंद्रावर गेलाच नव्हता असा एक प्रवाद सुरू करण्यात आघाडीवर असलेले सायब्रेल हे एकदा मिशेल यांच्या घरी वेगळे कारण काढून गेले व नंतर खरे रूप दाखवत ‘तू चंद्रावर गेलाच नव्हता व तेथे चालण्याचा तर प्रश्नच नाही,’ असे सांगून त्यांच्याशी वाद घालू लागले. ‘बायबलवर हात ठेवून सांग. चंद्रावर तू चालला होतास,’ असा आग्रह सायब्रेल यांनी धरला. मिशेल यांनी बायबलवर हात ठेवून सांगितले, ‘मी चंद्रावर खरोखर चाललो होतो.’ नंतर त्यांनी सायब्रेल महाशयांना बाहेरचा रस्ता दाखवला. याच सायब्रेलला पहिल्या यशस्वी मोहिमेतील चांद्रवीर बझ आल्ड्रिन यांनी असा आचरटपणा केल्याबद्दल मुस्कटातही दिली होती. एडगर डीन मिशेल यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी टेक्सासमधील हेरफोर्ड येथे झाला. न्यू मेक्सिकोच्या रोसवेल येथे त्यांचे बालपण गेले. वयाच्या चौथ्या वर्षी पहिले पण अपयशी उड्डाण. वयाच्या तेराव्या वर्षी विमाने धुण्याचे काम करून हवाई प्रशिक्षण. सोळाव्या वर्षी विमान चालवण्याचा परवाना असे त्यांचे साहसी जीवन.
औद्योगिक व्यवस्थापनातून त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हवाई प्रशिक्षण संस्थेतून डॉक्टरेट केले. १९५३ मध्ये अमेरिकी नौदलात दाखल झाले. १९५७ मध्ये रशियाने पहिला उपग्रह सोडला तेव्हापासून अवकाशात जाण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले. १९६६ मध्ये ते नासात संशोधक झाले. १९६९च्या पहिल्या चांद्रमोहिमेतील अनेक उपकरणांची चाचणी त्यांनी केली होती. अपोलो १३ मोहिमेतील अवकाशवीरांना वाचवण्यात मिशेल यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे त्यांना १९७० मध्ये अध्यक्षांचे पदकमिळाले. १९७२ मध्ये त्यांनी नासातून निवृत्त झाल्यानंतर इन्स्टिटय़ूट ऑफ नोएटिक सायन्सेस ही मानवी मन व विश्वाचे गूढ उकलण्याचे संशोधन करणारी संस्था स्थापन केली होती. चंद्रावर नेलेला कॅमेरा त्यांना लिलावात विकायचा होता, पण नासाने तो विकू दिला नाही. अखेर तो एका संग्रहालयाला देण्यात आला. परग्रहवासीय खरोखर अस्तित्वात आहेत, उडत्या तबकडय़ाही आहेत. शांतताप्रिय परग्रहवासीयांनी अमेरिका व रशिया यांच्यातील अणुयद्ध टाळले होते अशी त्यांची ठाम धारणा होती, पण त्यांच्या सांगण्यावर कुणी विश्वास ठेवला नाही.
ते चंद्रावर नऊ तासांत दोन मल चालले, ९५ पौंड वजनाचे खडक गोळा केले. त्या मोहिमेत शेफर्ड चंद्रावर गोल्फ खेळले होते, तर मिशेल यांनी एक नको असलेला धातूचा गज फेकून पहिली भालाफेक केली होती. या साहसकथेतील नायक आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about edgar mitchell
First published on: 12-02-2016 at 03:48 IST