‘खेळाडू हा चांगला प्रशासक होऊ शकत नाही’. संघटनेचा गाडा हाकणाऱ्यांनी काळ्या दगडावर लिहिलेल्या या वाक्याला जोआओ हॅवलँग यांनी चुकीचे ठरवले. माजी ऑलिम्पिक जलतरणपटू असलेल्या हॅवलँग यांनी जवळपास २४ वष्रे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा (फिफा) कारभार चोखपणे पाहिला. शतायुषी ठरलेल्या हॅवलँग यांचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाल्याची वार्ता आल्यावर, अनेक जाणकारांनी त्यांना ‘फुटबॉलमधील स्थित्यंतरांचा साक्षीदार आणि कर्तादेखील’ ठरविले! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॅवलँग यांनी फुटबॉलच्या विकासासाठी उचललेल्या पावलावर आजही चालले जात आहे. त्यांनी फिफाची आर्थिक प्रगती केली आणि मोठमोठय़ा प्रायोजकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटनेमध्ये फिफाचे नाव घेतले जाऊ लागले. तळागळापर्यंत हा खेळ पोहोचावा आणि त्याचा विस्तार अधिकाधिक वाढावा यासाठी त्यांनी १७ व २० वर्षांखालील फुटबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धा, कॉन्फेडरेशन चषक स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला. तसेच विश्वचषक स्पध्रेतील संघसंख्या १६ वरून ३४ करण्याचा निर्णयही त्यांचाच होता. त्यामुळे अधिकाधिक देश या संघटनेशी जोडले गेले आणि संघटनेचा आर्थिक डोलाराही मजबूत झाला.

हॅवलँग यांचा जन्म ८ मे १९१६ साली रिओ दी जानिरो येथे झाला.  तरुण वयात हॅवलँग यांनाही फुटबॉलने मोहित केले, परंतु त्यांचा कल जलतरणाकडे होता. १९३६च्या बर्लिन आणि १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पध्रेत त्यांनी ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले. १९५१च्या पॅन अमेरिकन स्पध्रेत हॅवलँग यांनी ‘वॉटर पोलो’ प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्यांनी वाहतूक व्यवसायात स्वत:चे नशीब अजमावले, परंतु त्यांना क्रीडा प्रशासक म्हणून ओळख मिळाली. मेलबर्न ऑलिम्पिक स्पध्रेत ते ब्राझीलच्या पथकासह होते आणि १९६३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यत्व मिळवले. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. क्रीडा संघटनेतील कारभार कशा पद्धतीने चालतो, याचा अभ्यास त्यांनी  सुरू केला. मग त्यांनी ब्राझील फुटबॉल असोसिएशनकडे मोर्चा वळवला. फुटबॉलला चालना देण्यासाठी त्यांनी अधिकाधिक स्पर्धा आयोजनांचा सपाटा लावला. विश्वचषक स्पध्रेचे आयोजन असो किंवा अन्य महत्त्वांच्या स्पर्धा असो, त्यांनी आर्थिक गणिताची योग्य जुळवाजुळव करून फिफाला फायदा करून दिला. युरोपीय महासंघाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नांत त्यांनी अनेक गैरकृत्यांचाही आधार घेतल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पैसे वाटप करणे, विश्वचषक स्पध्रेच्या प्रसारण हक्कांमध्ये गैरव्यवहार, असे हे आरोप होते. अखेर १९९८ मध्ये त्यांनी फिफाचे अध्यक्षपद सोडले, पण २४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी फुटबॉलसाठी दिलेले योगदान विसरून चालणार नाही.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joao havelange
First published on: 19-08-2016 at 03:16 IST