विसाव्या शतकात अर्थशास्त्रात अतिशय वेगळे स्थान निर्माण करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्या सिद्धांतांनी विमा, वैद्यकीय सुविधा, शेअर बाजार या संकल्पनांतील अर्थकारण बदलून गेले, त्यांचे नाव केनेथ जोसेफ अ‍ॅरो. या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली काही दशके त्यांनी अर्थशास्त्रात मोठे काम केले. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२१ रोजी  झाला. घडणीच्या काळात त्यांनी दारिद्रय़ जवळून पाहिले होते, त्यामुळे नंतर अर्थशास्त्रात संशोधन करताना त्यांनी सामाजिक न्याय व त्याबाबतचे पर्यायी मार्ग यावर भर दिला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून गणितात एम.ए. पदवी घेतली. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १९. पदवी अभ्यास करीत असताना त्यांनी युद्धकाळात हवामान संशोधक म्हणून व एअर कोअर कॅप्टन म्हणून काम केले. काही काळ त्यांनी रॅण्ड कॉर्पोरेशनमध्ये व नंतर हार्वर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून काम केले. अर्थशास्त्रातील अमेरिकेचे पहिले नोबेल विजेते पॉल सॅम्युअलसन यांनी अ‍ॅरो हे विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते. अ‍ॅरो यांची कारकीर्द घडली ती स्टॅनफर्ड विद्यापीठात. ११ वर्षे त्यांनी या विद्यापीठात काम केले. १९५१ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली होती, त्यात त्यांनी समाजाने निवडलेले पर्याय व व्यक्ती निवडत असलेले पर्याय यांचा संबंध दाखवला आहे. मतदान पद्धतीत नेहमी अनपेक्षित निकाल सामोरे येतात त्यावर अ‍ॅरो यांनी असे म्हटले होते की, समाज जे पर्याय निवडत असतो, ते विसंगत असतात. त्यामुळे योग्य सामाजिक पर्यायांसाठी चार घटकांची पूर्तता आवश्यक असते. कुठल्याही व्यवस्थेत ती होऊ शकत नाही. मागणी आणि पुरवठा या प्रश्नावर त्यांनी संशोधन केले होते. समजा, सफरचंद ही एक वस्तू घेतली तर त्याची किंमत व त्यांची मागणी संख्या जर सुसंगत असेल तर अंतिम भावाच्या माध्यमातील फलश्रुती चांगली असते असे त्यांनी म्हटले होते. हे केवळ एक वस्तूचे उदाहरण झाले, पण जर कृषी जमीन, शेतमजूर, बँक कर्ज अशा अनेक बाजारपेठांचा विचार केला तर त्या एकमेकांवर परिणाम करीत असतात.  कुठल्या विशिष्ट परिस्थितीत बाजारपेठा कोसळत नाहीत तर यशस्वी होतात याचे विवेचन त्यांनी केले होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kenneth arrow
First published on: 25-02-2017 at 02:36 IST