‘ऑफ गिफ्टेड व्हॉइस – द लाइफ अ‍ॅण्ड आर्ट ऑफ एम. एस. सुब्बलक्ष्मी’ हे पुस्तक सांगीतिक महत्तेला लोकाभिमुखतेची जोड देणाऱ्या सुब्बलक्ष्मींच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारे आहे. तर ‘हीलर्स ऑर प्रिडेटर्स? – हेल्थकेअर करप्शन इन इंडिया’ हे पुस्तक आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड करताना डॉक्टरांनाही नैतिक जाब विचारणारे. केशव देसिराजु हे त्यापैकी पहिल्या पुस्तकाचे लेखक; तर दुसऱ्याचे सहसंपादक. या दोन पुस्तकांच्या पलीकडे त्यांचे व्यक्तित्व, पद, कर्तृत्व. हे सारेच किती महत्त्वाचे, काहीसे दुर्मीळ आणि म्हणून मौल्यवानही होते, याच्या आठवणी देसिराजु यांच्या निधनानंतर, गेल्या तीन दिवसांत निघाल्या. मनोरुग्ण, अपंग तसेच गरीब रुग्ण यांच्यासाठी किती काम देसिराजु यांनी केले होते आणि ते करताना  लालफितीचा अडथळा कसा येऊ दिला नव्हता, अशा अनेक आठवणींतून उलगडला तो देसिराजु यांचा निकोपपणाचा ध्यास!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट या संस्थेतून केशव देसिराजु यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आणि वयाच्या २३ व्या वर्षी, १९७८ च्या बॅचचे, उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे केशव यांचे आजोबा. केशव यांची आई शकुंतला ही राधाकृष्णन यांची द्वितीय कन्या. घराण्यातील अनेक जण, जिथे रीतसर परीक्षा द्यावीच लागते अशा ‘भाप्रसे’मध्ये. तेव्हा तिथे जाणे ही यशाची वा प्रयासाची परमावधी नसून खरी परीक्षा पुढेच असते, याची पुरेपूर जाणीव देसिराजुंना होती. म्हणूनच बहुधा, उत्तर प्रदेशसारखे अतिमागास राज्य त्यांनी स्वीकारले आणि मिळालेल्या पदांनुसार, आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित केले. उत्तराखंड निर्मितीपासून (सन २०००) ते त्या राज्याचे आरोग्य सचिव होते. सरकारी पदाच्या चौकटीत राहून आपण व्यवस्था बदलू शकत नसलो, तरी बदल हवा असलेल्या ‘ना-नफा’ संस्थांना ही चौकट पाळून मदत करू शकतो, हे त्यांच्या कामाचे सूत्र ठरले. जन स्वास्थ्य अभियान, अपंगांसाठी कार्य करणारे लतिका राय फाऊंडेशन, अशा अनेक संस्थांना देसिराजु हे प्रशासनाचा मानवी चेहरा वाटत. पुढे केंद्रातही ते आरोग्य सचिव झाले; परंतु दोन कोटींच्या लाचखोरीचे आरोप झालेल्या केतन देसाईंची नियुक्ती गुजरातने भारतीय वैद्यकीय परिषदेवर केल्याच्या विरोधात चढा सूर लावल्यावर त्यांची बदली ग्राहक-व्यवहार विभागात झाली. यावर इन्फोसिसच्या नारायण मूर्तीपासून अनेकांनी सरकारला धिक्कारले होते. अवघे ११ महिने केंद्रीय आरोग्य सचिवपदावर असताना, मनोविकारविषयक राष्ट्रीय धोरणाची आखणी त्यांनी केली. निवृत्तीनंतरची त्यांची लेखकीय कारकीर्द आणखीही पुस्तकांतून बहरली असती; पण हृदयविकाराने अवघ्या ६६ व्या वर्षी अविवाहित देसिराजु निवर्तले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav desiraju profile zws
First published on: 08-09-2021 at 01:40 IST