तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या क्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर करण्याची शैली. अशाच प्रकारच्या शैली तबलावादनातही निर्माण झाल्या. बनारस हे त्यातील एक नामांकित घराणे. पंडित लच्छू महाराज हे या घराण्यातील सध्याच्या काळातील आदरणीय कलावंत. यापूर्वी निवर्तलेले पं. किशन महाराज हेही याच घराण्याचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लच्छू महाराज यांनी आयुष्यभर तालाची साधना केली. त्यांचे मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंह. त्यांचे वडील वासुदेव नारायण सिंह यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. संगीताच्या क्षेत्रात बनारस या शहराचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे असे. उस्ताद बिस्मिल्ला खाँ, गिरिजा देवी यांच्यासारख्या अनेक कलावंतांनी याच शहरात साधना केली आणि ते रसिकप्रिय झाले. लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले, मात्र ते लोकप्रिय झाले ते चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. तिथे त्यांनी अनेक गीतांसाठी तबलावादन केले. सामान्यत: चित्रपट संगीतातील साथीदार कलावंतांची नावेही माहीत होत नाहीत. लच्छू महाराज यांच्यासारख्या अनेक गुणी कलावंतांनी या संगीतात आपल्या कलेने अतिशय मोलाची भर घातली आहे. तबला हे वाद्य वाजवण्यास अवघड आणि त्यावर हुकमत मिळवणे तर त्याहूनही असाध्य. आयुष्यभर साधना केल्यानंतर येणारे प्रभुत्व लयीच्या अथांग दुनियेत मोलाची भर घालणाऱ्या सर्जनशीलतेची वाट दाखवत असते. लच्छू महाराजांसारख्या कलावंतांनी ही अपार साधना तर केलीच; पण त्यामध्ये नवसर्जनही केले. गणिती पद्धतीने तालाच्या मात्रांचा हिशेब करता करता, त्यातून लयीचा देखणा ताजमहाल उभा करणे, ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी परिश्रमांबरोबरच प्रज्ञेचीही आवश्यकता असते. लच्छू महाराज यांच्याकडे ती होती. त्यामुळेच केवळ ते रसिकांचे प्रेम मिळवू शकले. तालाच्या अगाध दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना आणि त्याच्या बरोबरीने अंगी असलेली सर्जनशीलता कुणालाही हेवा वाटावी अशीच होती. अलीकडील संगीत मैफलींमध्ये वाद्यवादनात तबल्याबरोबरच्या जुगलबंदीचे प्रस्थ वाढते आहे. तबलावादक आणि वाद्यवादक यांच्यातील सवाल-जवाबला रसिकांकडून वाहवाही मिळत असते. वाद्यवादनात तबलावादकास स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे खरे असले तरीही गायनाच्या वेळी तबलजीने केलेली नम्र संगत गायकाला नवसर्जनाची ताकदच देत असते. लच्छू महाराज यांनी हे नेमके ओळखले होते आणि त्यामुळेच ते आपल्या कलेशी इमान राखू शकले. त्यांच्या निधनाने तालाच्या दुनियेतील एक हिरा निखळला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lachhu maharaj
First published on: 30-07-2016 at 03:04 IST