गोव्याच्या भूमीतला निसर्ग आधुनिक चित्रशैलीच्या जोरकसपणातून मांडणारे चित्रकार लक्ष्मण पै यांना या वर्षी गोवा सरकारतर्फे ‘गोमंत विभूषण’ पुरस्कार मिळणार आहे. लवकरच होणारा तो समारंभ पै यांच्या नव्वदीचा उशिराने होणारा, पण हृद्य सोहळाही ठरेल.. १९८५ साली ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या या गोमंतकीय कलावंताला गोव्यात मिळणारा हा बहुमान, त्यांना अनिल काकोडकर, चार्ल्स कोरिया यांच्या पंक्तीत बसविणाराही ठरेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातल्या अनेक ठिकाणी कलाप्रदर्शनांच्या निमित्ताने जाऊनही गोव्याचेच असणाऱ्या पै यांची ओळख या निमित्ताने पुन्हा नव्याने होईल. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘मेयो मेडल’ १९४७ सालीच मिळवणारे पै हे पुढे ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ म्हणून इतिहास घडविणाऱ्या कलावंतांपैकी काहींच्या- विशेषत: सदानंद बाकरे, हरि अंबादास गाडे आणि फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या – संपर्कात आले होते. अर्थात, या तिघा ‘प्रोग्रेसिव्हां’शी मैत्री झाली तेव्हा तो ‘ग्रुप’ जवळपास विरूनच गेला होता. सूझा आणि बाकरे पॅरिसमध्ये होते. पै हेदेखील पॅरिसच्या ‘इकोल द बोझ्आर्ट’ (ब्यू आर्ट्स) या प्रख्यात कलासंस्थेत शिकत होते. त्या वेळीच ‘निसर्ग की मानवी समाजजीवन?’ हा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी निसर्गाच्या बाजूने कौल दिला. अर्थात, पै यांच्या चित्रांमध्ये मानवाकृतीही असत, पण त्या निसर्गाशी या ना त्या प्रकारे नाते सांगणाऱ्या असत. उतारवयात तर, निसर्गाच्या मूलतत्त्वांशी मानवी अवयवांची सांगड घालून मानव-निसर्गाचे अद्वैत दाखवणारी काही चित्रे त्यांनी केली.

स्वधामात, स्वग्रामात राहण्यासाठी ‘गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य’ ही कारकीर्दही त्यांनी सुमारे दशकभर स्वीकारली. विद्यार्थ्यांनी स्वत:हून शिकावे, असे मानणारे लक्ष्मण पै ‘माझा कोणीही गुरू नाही’ हे निक्षून सांगत.. पण या कलावंताच्या प्रभावाचे वलय असे की, अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनात तरी त्यांचे भक्तच असल्याप्रमाणे, त्यांच्यासारखीच चित्रे काढत. चित्रकारांची पिढी घडवूनही पै मागेच राहिले, याचे एक कारण त्यांचा अबोल आणि बोलतील तेव्हा स्पष्टवक्ता स्वभाव!

गोव्यातून मुंबईला गेलेल्या अनेक चित्रकारांनी त्यांच्याकडे जवळपास पाठच फिरविली होती. त्या वेळचे – १९६० वा ७०च्या दशकांतले- चित्रकला क्षेत्रातले अभावग्रस्त वातावरणही एकमेकांशी विनाकारण राजकारण करण्यास उद्युक्त करणारे होते, परंतु तसल्या फंदात लक्ष्मण पै कधीही पडले नाहीत. ‘मला कुचाळक्याही आवडत नसत. कुणाच्याही कंपूत मी नव्हतो’ हे पै सर आजही सांगतात. ‘ललित कला अकादमी’ची १९६१ व ६३ची पारितोषिके त्यांना मिळाली होती. ‘कांग्रा व्यक्तिचित्रण प्रदर्शना’त त्यांच्या चित्रास १९७२ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गोवा सरकारने १९८७ साली त्यांना गौरविले आणि १९९५ मध्ये ‘नेहरू पुरस्कार (गोवा)’ दिला. यानंतर दोन दशकांनी या चित्रकाराचा पुरस्कार-सोहळा गोव्यात होणार आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman pai
First published on: 23-09-2016 at 03:24 IST